धुमसते बर्फ...

-विकास शिरपूरकर
रविवार, 29 जून 2008( 17:14 IST )
यंदाची अमरनाथ यात्रा दरवर्षीप्रमाणे पुन्हा एकदा अडचणीत आली आहे. कधी दहशतवाद़यांच्या हल्ल्यामुळे तर कधी नैसर्गिक आपत्तीमुळे गाजणारी ही यात्रा यंदा मात्र वेगळ्याच सत्ता संघर्षाच्या फार्समध्ये अडकून पडली आहे. यामुळे सर्वसामान्य यात्रेकरू मात्र अडचणीत सापडला आहे.
यंदाच्या यात्रेला सुरुवात झाली आणि केवळ जम्मू-काश्मीरच्या खो-यांमध्येच नव्हे तर राजकारणातही वादळी घडामोडी घडू लागल्या. हे वादळ इतके जोरदार आहे, की त्याने सुमारे दोन वर्षांपासून निर्विघ्नपणे चाललेले येथील गुलाम नबी आझाद सरकारलाच खिळखिळे करून टाकले आहे.
अमरनाथ देवस्थान समितीला (श्राईन बोर्ड) वनजमीन देण्याच्या वादातून सुरू झालेल्या या वादाने सरकारचा बळी घेतला आहे. अमरनाथ यात्रेचा प्रवास अतिशय खडतर असून येथे जाण्यासाठी पहेलगाम व बत्तान हे दोन पारंपरिक मार्ग आहेत.
या मार्गांमध्ये सुधारणा करण्यासाठी आणि भाविकांना सोयी उपलब्ध करून देण्यासाठी गुलाम नबी आझाद सरकारने बोर्डाला वनजमीन देण्याचा निर्णय घेतला आणि येथूनच वाद सुरू झाला. बोर्डास वनजमीन देण्यात येऊ नये यासाठी खो-यात
जोरदार विरोध आणि निदर्शने केली जात असून यामुळे यात्रा अनेकदा सुरक्षेच्या कारणास्तव स्थगित करण्यात आली आहे. राज्यभर आझाद सरकारच्या या निर्णयास जोरदार विरोध केला जात आहे. तर निदर्शक व पोलिसांमध्ये झालेल्या झटापटीत अनेक जण जखमी झाले आहेत.
या निर्णयाला विरोध असलेल्या राज्यसरकारमधील प्रमुख घटक पक्ष असलेल्या पिपल्स डेमोक्रॅटीक पार्टीच्या नेत्या (पीडीपी) महेबुबा मुफ्ती यांनी सरकारचा पाठिंबा काढून घेतला. परिणामी कॉग्रेसचे 21, पीडीपीचे 18, माकपचे 2 व 8 अपक्षांच्या मदतीने उभारलेले हे घटक पक्षांचे सरकार अल्पमतात आले आहे.
आपल्या पक्षातील कार्यकर्त्यांचे या घटनेत बळी जात असल्याचा आरोप त्यांनी केला असून राज्यपालांना पाठिंबा काढून घेतल्याचे पत्र सादर केल्याने परिस्थिती हाताबाहेर गेली आहे.
दरवर्षी यात्रा जवळ आली की कधी मानव निर्मित तर कधी नैसर्गिक कोणते ना कोणते संकट या यात्रेसमोर 'आ' वासून उभेच असते. कुठल्या तरी दहशतवादी संघटनेकडून हल्ल्याची धमकी दिली जाते. किंबहुना कधीतरी एखादं दुसरा हल्ला किंवा बॉम्बस्फोटही घडवला जातो. यात्रेकरूंच्या सुरक्षेसाठी लष्कर तैनात असतेच. यात सरकारचे कोट्यवधी रुपये खर्च होतात.
सातत्याने पडणारा बर्फ, अधून-मधून अचानक सुरू होणारा जोरदार पाऊस, तीव्र हिमवादळे या सर्व संकटांचा सामना करत भाविक जीव मुठीत घेऊन यात्रा पूर्ण करतात. इतक्या संकटांनंतरही यात्रेत सहभागी होणा-या भाविकांची संख्या वाढत चालली आहे, हे विशेष.
आपल्याला परमेश्वराची प्राप्ती व्हावी यासाठी हिंदुधर्मीय आयुष्यभर वेगवेगळी व्रत-वैकल्ये करीत असतो. आपल्या ईष्टदेवतेच्या प्राप्तीसाठी जितका जास्त त्रास आणि त्याग करू तितक्या लवकर आपल्याला परमेश्वराची प्राप्ती होईल अशी हिंदू समाजात सर्वसाधारण धारणा आहे.
म्हणूनच की काय हिंदू देवतांची मंदिरे ही अतिदुर्गम भागात व उंच ठिकाणी असतात. 'देव सहजच मिळत नाही' हे वाक्य कदाचित त्यातूनच रूढ झाले असावे.
जम्मू-काश्मीरमध्ये असलेले हिंदूंची पवित्र अमरनाथ देवस्थान हे कदाचित त्याचे एक उदाहरण. अतिशय दुर्गम पहाडांमध्ये वसलेल्या आणि आपल्या भक्तांची कसोटी पाहणा-या बाबा अमरनाथची ही गुंफा. प्रत्यक्ष भगवान शिव आणि माता पार्वती या ठिकाणी एकांताच्या शोधासाठी आले असल्याचे आणि येथेच परमेश्वराने देवीला सृष्टीच्या निर्मितीमागील गुपित उलगडून सांगितले, असा समज असलेली ही पवित्र जागा. जीवनात एकदा तरी अमरनाथ यात्रा करावी असे हिंदू धर्मात मानले जाते.
जनतेच्या श्रद्धेचा आणि भावनांचा प्रश्न असल्याने, आणि धर्मनिरपेक्ष भारतात याच गोष्टीला जास्त महत्त्व असल्याने सरकारकडूनही ही यात्रा निर्विघ्न पार पडावी यासाठी दरवर्षी विशेष प्रयत्न केले जातात.
सध्या काश्मीरमध्ये निर्माण झालेल्या अस्थिर परिस्थितीमुळे काश्मीर खो-यात लाखो भाविक अडकून पडले आहेत. यात्रा सुरळीत सुरू ठेवण्यास सरकार सक्षम असल्याचा दावा आझाद यांनी केला आहे. तर या गंभीर प्रसंगी खो-यातील परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी केंद्र सरकारला हस्तक्षेप करून यात्रा सुरळीत पार पाडून जम्मू-काश्मीरमध्ये कायदा सुव्यवस्था कायम राहण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे.