फराह खान आधी कोरीयोग्राफर होती. नंतर दिग्दर्शनात पदार्पण केले. त्यातही ती यशस्वी ठरली. आता ती बॉलीवूडमधल्या टॉप दिग्दर्शकांत गणली जाते. तिचे पती शिरीष कुंडर हे नाव मात्र कुणाला फारसे माहित नाही. पण तेही याच क्षेत्राशी संबंधित आहेत. ते आधी संपादक होते. नंतर दिग्दर्शक झाले. पण फराह खान इतके ते यशस्वी झालेले नाहीत. पण म्हणून बायकोच्या यशाने त्यांचा जळफळाट झालेला नाही. अतिशय समजूतदारपणे ते फराहच्या यशाकडे बघतात. सर्वसाधारणपणे नवरा-बायकोत होणारी भांडणे त्यांच्यातही होतात. पण त्याचा संबंध करीयरच्या यशाशी कधीच नसतो. उलट फराहला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा ती पतीसोबत असते.
मंदिरा बेदीचेही तसेच आहे. अभिनेत्री आणि टिव्ही एंकर म्हणून ती प्रसिद्ध आहे. पण तिचा नवरा राज कौशल मात्र अजूनही यशाच्या शोधात आहे. पण राजही समजूतदार आहे. तो म्हणातो, 'आम्ही एक दुसर्याला भरपूर 'स्पेस' देतो. आमचे कार्यक्षेत्र एकच असले तरीही त्याची अडचण होत नाही. अनेकदा मंदिराला नको त्या वेळी कामासाठी जावे लागते. पण त्यावेळी मी समजून घेतो.' नवरा बायकोच्या यशाची तुलना करणेच मुळी राजला मान्य नाही. पत्नी यशस्वी झाली तर पतीच्या पोटात दुखण्याचे काहीच कारण नाही, असेही तो स्पष्टपणे सांगतो.
मलाईका अरोराने बॉलीवूडमध्ये आपली वेगळी ओळख बनवली आहे. तिचा नवरा अरबाझ खान अभिनेता म्हणून सगळ्यांना माहित आहे आणि दिर सलमान खानची प्रसिद्धी तर विचारायला नको. पण मलाईकाच्या तुलनेत अरबाझ मागे पडला आहे. पण तरीही त्याला त्याचे दुःख नाही. पत्नीची कारकिर्द वेगाने वाढतेय याचा त्यालाही आनंद आहे. तो म्हणतो, 'मी मलाईकावर अत्यंत प्रेम करतो. ती मोठी अभिनेत्री बनावी अशीच माझी इच्छा आहे. एका प्रसिद्ध अभिनेत्रीचा पती म्हणवून घेण्यात मला कोणतीही लाज वाटत नाही.' लग्नापूर्वी प्रेयसीशी अतिशय प्रेमाने वागायचे, तिला सगळे स्वातंत्र्य आहे असे म्हणायचे आणि लग्नानंतर तिला घरात बंद करून ठेवायचे, अशा मानसिकतेचा मी नाही, हेही तो स्पष्टपणे सांगतो.
दिग्दर्शक कबीर खान स्वतःची ओळख बनविण्यासाठी धडपडत आहेत. त्याचवेळी त्यांची पत्नी मिनी माथूर टिव्हीवरील प्रसिद्ध एंकर आहे. ते म्हणतात, 'आम्ही सुरवातीला भेटलो तेव्हा ती प्रसिद्ध व्हीजे होती. तिचे करीयर भरभराटीला यावे अशीच माझी इच्छा होती. त्यासाठी मी तिला पुरेपूर स्वातंत्र्य दिले. मिनीने त्यानंतर टिव्हीवर जे स्थान मिळविले त्याचा मला अभिमान आहे.' मिनीला कामाच्या निमित्ताने बाहेर जावे लागते, तेव्हा कबीर मुलांना सांभाळतात.