ब्लॅक होल अर्थात कृष्णविवरांची चर्चा आता पुन्हा एकदा सुरू झाली आहे. वास्तविक याआधीही एकदा अशी चर्चा झाली होती. ३० जून १९०८ रोजी झालेल्या एका घटनेने ही चर्चा सुरू केली. आता जिनिव्हात जमिनीखाली पुन्हा एकदा स्फोट घडवून आणण्यात येत आहे. त्यानिमित्ताने काय घडले होते त्याचा आढावा घेऊन काय घडणार याचाही वेध घेऊया.
काय झाले होते? सायबेरीयात ३० जून १९०८ रोजी तुंगुस्का या अतिदूर असलेल्या भागातील जंगलात एक आगीचा गोळा येऊन पडला. त्यामुळे वीस मैल परिसरातील झाडे जळून गेली. या गोळ्याच्या आदळण्याने निघालेल्या लहरी अनेक देशांना जाणवल्या.
जगभरातील शास्त्रज्ञ या जागी गेले. त्यांनी मग त्याची कारणमीमांसा सुरू केली. काहींच्या मते उल्कापातामुळे हे घडले. काहींच्या मते तो धुमकेतू होता. अर्थात या दोन्हीच्या पुष्ट्यर्थ पुरावे मिळाले नाहीत. धुमकेतू असावा हे सांगणार्यांनुसार, आकाशात कसला तरी स्फोट झाला आणि त्याचा तुकडा जमिनीवर पडला असावा. काही शास्त्रज्ञांच्या मते हा गोळा म्हणजे दुसर्या एखाद्या ग्रहाचा तुटलेला भाग असावा. अवकाशात तीव्र गतीमुळे जोरदार घर्षण होऊन हे घडले असावे. या सर्व शास्त्रज्ञांनी आपापल्या मतांप्रमाणे या गोळ्याचे रहस्य उलगडण्याचा प्रयत्न केला. पण नेमके काय घडले ते पुराव्यानिशी कोणीही सांगू शकले नाही. या गोळ्याचे रहस्य आज इतक्या वर्षांनंतरही कायम आहे.
ब्लॅक होलचे रहस्य आता प्रश्न आहे तो जिनिव्हात निर्माण होणार्या ब्लॅक होलचा. टेक्सॉस (अमेरिका) विद्यापीठातील भौतिकशास्त्राचे अभ्यास अल्बर्ट ए. जॅक्सन व मायकल पी. रायल ज्युनियर यांनी एक संशोधन मांडले आहे. यासंदर्भात त्यांनी मांडलेले संशोधन अधिक विश्वासार्ह मानले जाते. त्यांच्या म्हणण्यानुसार ब्लॅक होलच्या निर्मितीमुळे ही परिस्थिती उत्पन्न झाली आहे. (ब्लॅक होल अर्थात कृष्णविवर म्हणजे अवकाशातील पोकळ अवस्था) पण हे कसे घडले हे दोन्ही शास्त्रज्ञ सिद्ध करू शकले नाहीत.
आता धोका जास्त त्यांच्या मते ब्लॅक होल निर्माण झाल्यास सायबेरीयात झालेल्या नुकसानीपेक्षा मोठा धोका आहे. अंतराळात धुळीच्या कणाच्या आकाराइतके ब्लॅक होल्स आहेत. सृष्टीच्या उत्पत्तीवेळी झालेल्या महास्फोटातून त्यांची निर्मिती झाली आहे. या महास्फोटानंतर म्हणजे १० ते १५ अब्ज वर्षांपूर्वी सृष्टीची निर्मिती झाली.
जॅक्सन व रायन यांच्या मते अडीच हजार मैल प्रतितास या वेगाने एखादी वस्तू पृथ्वीच्या परिघात आल्यास सायबेरीयात झालेल्या विध्वंसापेक्षा मोठा विध्वंस होऊ श कतो. यातून निघणारी उर्जा दहा मेगाटन हायड्रोजन बॉम्बपेक्षा भयानक असू शकते.
या सार्या पार्श्वभूमीवर दहा सप्टेंबरला फ्रान्स व स्वित्झर्लंड यांच्या सीमेवर जमिनीखाली शंभराहून जास्त मीटरवर लार्ज हेड्रान कोलायजरची (एलएचसी) प्रक्रिया सुरू केली जामार आहे. एलएचसी नावाचे हे यंत्र या प्रयोगासाठी ठेवण्यात आले आहे. जगातील हे सर्वांत मोठे त्वरक (पार्टिकल एक्सलेटर) आहे. याच्या माध्यमातून प्रोटॉनचे विखंडन केले जाणार आहे.
या माध्यमातून बिग बॅंग अर्थात महाविस्फोटवेळी तयार झालेली परिस्थिती निर्माण करण्याचा शास्त्रज्ञांचा इरादा आहे. या प्रकल्पावर गेल्या १४ वर्षांपासून काम सुरू होते. त्यासाठी आठ अब्ज डॉलर्स खर्च करण्यात आले आहेत. पण शास्त्रज्ञांच्या एका गटाच्या मते हा प्रयोग पृथ्वीसाठी घातक ठरू शकतो. त्यांच्या मते या प्रयोगामुळे ब्लॅक होल निर्माण होऊन पृथ्वीलाही ते गिळून टाकतील.