1. वृत्त-जगत
  2. »
  3. आज-काल
  4. »
  5. मंथन

महाराष्ट्राविषयी अनादर? कदापि नाहीः अमिताभ

IFMIFM
अभिनेत्री व खासदार जया बच्चन यांच्या मराठी विरोधातील कथित वक्तव्यावरून उठलेल्या गदारोळावर अभिनेते महानायक अमिताभ बच्चन यांनी आपल्या ब्लॉगवरही टिप्पणी केली. ब्लॉगवरील त्यांच्या नोंदीतील काही भाग वेबदुनियाच्या वाचकांसाठी अनुवादित स्वरूपात......


जया प्रकरणावर मला पत्रकारांचे एसएमएस आले. पण नेमके प्रकरण काय आहे, हे माहित नसल्याने मग मी मेलचा आधार घेतला. त्यावरील व्हिडीओ, बातम्या पाहिल्या. त्यानंतर तातडीने जयाला एसएमएस केला. त्यात लिहिले की, ''द्रोणच्या सीडीचे अनावरण करताना तिच्याकडून केले गेलेले विधान अनाहूतपणे झाले. त्यामागे महाराष्ट्राच्या आणि महाराष्ट्रीय लोकांच्या आणि मुंबईकरांच्या भावना दुखावण्याचा कोणताही हेतू नव्हता. तिने यासंदर्भात माफी मागितली पाहिजे. आता आपल्याकडे जे काही आहे ते या महान राज्याने आणि या शहराने दिले आहे. त्यामुळे महाराष्ट्राचा अवमान होईल, असे काहीही आमच्याकडून होणार नाही. पण यावेळी चुकीच्या पद्धतीने काही बोलले गेले असल्यास आम्ही माफी मागतो आणि या विधानामुळे कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर क्षमायाचना करतो, असे तिने सांगावे असे त्यात लिहिले''

हा एसएमएस पाठवल्यानंतरही रात्रभर माझ्या डोळ्याला डोळा लागला नाही.

दुसर्‍या दिवशी सकाळी लंडन एअरपोर्टवर गेलो. तिथे मी पेपरमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्यांची कात्रणे फॅक्सवर पाठवली होती, ती घेतली. 'मुंबई मिरर' पाहून मला समाधान वाटले. त्यात जयाने स्पष्टपणे माफी मागितलेली होती आणि मी जे तिला कळवले तेच तिने सांगितल्याचे वाचून मला बरे वाटले.

आम्ही सर्व भारतीय आहोत, याचा आम्हाला अभिमान आहे. आम्ही आपल्या देशावर प्रेम करतो. आपल्या जन्मभूमीवर प्रेम करतो. त्याचप्रमाणे आपल्या कर्मभूमीवरही तितकेच प्रेम करतो. मुंबई आणि महाराष्ट्राने आम्हाला कीर्ती आणि ओळख दिली. माझे वय आज ६६ आहे, त्यातली ४० वर्षे मी मुंबईत घालवली. त्यामुळे आम्हाला सगळे काही देणार्‍या आमच्या कर्मभूमीचा आमच्याकडून अनादार होणार नाही. कदापि नाही.

जयाचे तर शिक्षणही पुण्याच्या फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये झाले आहे. तिने तिचे पदवीपर्यंतचे शिक्षण तिथेच पूर्ण केले. ती अतिशय अस्खलित मराठी बोलते. आमच्या घरातील बहुतांश कर्मचारी वर्गही मराठीच आहे. जयाची वैयक्तिक सहाय्यकही गेल्या चाळीस वर्षापासून आमच्याबरोबर आहे. तिच्याशी ती मराठीतच बोलते.

असे असेल तर आम्ही स्थानिक भाषेचा अनादर कसा करू?

माझे मेकअपमन दीपक सावंत हेही मराठीच आहे, आणि गेल्या ३५ वर्षांपासून ते माझ्याबरोबर आहेत. त्यांनी निर्मित केलेल्या एका मराठी चित्रपटात मी आणि जयानेही काम केले आहे. त्यांनी नुकतेच दोन भोजपुरी चित्रपटही केले. त्यातही मी कोणताही मोबदला न घेता काम केले.

'श्वास' या मराठी चित्रपटाची निवड ऑस्कर पुरस्काराला पाठविण्यासाठी झाली त्यावेळी निर्मात्यांना लॉस एंजिल्सला जाऊन चित्रपटाचा प्रचार करण्यासाठी पैशांची चणचण जाणवत होती. त्यावेळी मी त्यांना अकरा लाख रूपयांची मदत केली.

आमच्या एबीसीएल कॉर्पोरेशनमध्येही आम्ही मराठी गुणवंतांना आणि चित्रपटकर्मींना प्रोत्साहन देतो. यातीलच एक प्रकल्प सध्या प्रगतीपथावर आहे. त्याला आम्ही वित्तीय पुरवठा करत आहोत. विशेष म्हणजे हा प्रकल्प जयाच्या कल्पनेतून आकाराला येतो आहे.

नुकतेच एक प्रतिभावंत मराठी लेखक अत्यवस्थ अवस्थेत रूग्णालयात होते. त्यांच्या उपचारांसाठी आणि पुढील उपजिविकेसाठी पुरेसे पैसे त्यांच्याकडे नव्हते. त्यावेळी त्यांना मी अकरा लाख रूपयांची मदत केली. आणि मला सांगायला आनंद वाटतो की ते या आजारातून बरे झाले आहेत. त्यांच्या पत्नीचे आभार मानणारे अतिशय भावनाप्रधान पत्र आजही माझ्याकडे आहे.

IFMIFM
अत्यंत कुशल ह्रदयरोगतज्ज्ञ डॉ. नीतू मांडके यांचे अकाली निधन झाले. तेही दुर्देवाने ह्रदयविकारानेच. उपनगरात चारशे खाटांचे रूग्णालय उभारण्याचा त्यांचा मानस होता. त्यांच्या पत्नीला त्यांचे हे स्वप्न पूर्ण करायचे होते. त्यावेळी मी माझे मित्र अनिल अंबानी यांना शब्द टाकला. मला सांगायला आनंद वाटतोय, की हे हॉस्पिटल आता जवळपास पूर्ण होत आले आहे आणि लवकरच त्यात कामही सुरू होईल.

श्रीमती मांडके यांचे हे स्वप्न माझ्यापर्यंत पोहोचविले ते आमचे फॅमिली डॉक्टर डॉ. बर्वे यांनी. होय, तेही महाराष्ट्रीयच आहेत. शिवाय माझ्या कुटुंबातील असल्यासारखेच आहेत. वैद्यकिय बाबतीत त्यांचा शब्द आमच्या कुटुंबासाठी अंतिम असतो.

असे असताना आम्ही महाराष्ट्राविषयी अनादर दाखवू?

माझ्या वडिलांचे साहित्य प्रादेशिक भाषेत पहिल्यांदा मराठीतच अनुवादीत झाले. विशेष म्हणजे ते राज्याच्या अभ्यासक्रमातही आहे. आजही वडिलांचे साहित्य विशेषतः त्यांचे आत्मचरित्र मराठीत अनुवादित करण्यासंदर्भात मराठी लेखकांकडून मला सातत्याने विचारणा होत असते. मी कॉपीराईटचा कोणताही विचार न करता त्याला परवानगी दिली आहे.

जया अनेक विधायक कामात सहभागी आहे, हे अनेकांना माहित नाही. हाजी अली येथील अपंगांसाठी काम करणार्‍या संस्थेशी ती संबंधित आहे. मुक व बधीर मुलांचे नाट्यप्रयोग आयोजित करण्यात तिने पुढाकार घेतला आहे. शिवाय या मुलांना मुंबईबाहेर प्रयोग करण्यासाठी मदतही आम्ही केली आहे. या अनेक कार्यक्रमांना मी उपस्थित राहिलो आहे. माझ्यासह माझ्या मुलांनी या कार्यक्रमाचा प्रसार व्हावा यासाठी आमचा आवाज दिला आहे.

बर्‍याच जणांना हे माहित नाही की जया युवक बिरादरी या स्वयंसेवी संस्थेशीही संबधित आहे. ही संस्था मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात विधायक काम करत असते. नैसर्गिक आपत्ती, रक्तपेढी, समाज सेवा यासह विविध क्षेत्रात ती काम करते. राज्य सरकारकडूनही या कामाचे कौतुक झाले आहे. विशेष उल्लेख करायचा झाला तर लातूरमध्ये झालेल्या भूकंपानंतरच्या पुनर्वसनाच्या कामाचा करावा लागेल. आम्ही या पुनर्वसन कार्याला आर्थिक मदत केली होती. एका गावाची तब्बल महिनाभराची जेवणाची तरतूद केली होती.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांच्या मतदारसंघाचा काही भाग तीव्र दुष्काळाचा सामना करतो आहे. युवक बिरादरीच्या कार्यकर्त्यांनी तेथे जाऊन दुष्काळग्रस्तांना मदत करावी यासाठीही आम्ही आर्थिक सहाय्य केले.
याशिवायही आम्ही हिंदुजा आणि माहिम, ब्रीच कॅंडी या हॉस्पिटल्सना आणि अंधांसाठी व गरजूंसाठी काम करणार्‍या बर्‍याच संस्थांना मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत करतो. पण त्याच्या तपशीलात जाणे शक्य नाही.

याशिवाय आम्ही अनेक मुलांच्या शिक्षणासाठी मदत करतो. प्रत्येक वर्षी मुंबईतील २ ते ३ मुलांना त्यांच्या शिक्षणासाठी मदत केली जाते. तसेच आमचे जुने आणि न वापरलेले कपडे आम्ही 'होम' या संस्थेला दान देतो. त्यांच्यातर्फे ते गरीबांना वाटप केले जातात.

या सगळ्यांतून आमचा महाराष्ट्र व महाराष्ट्रीय लोकांबद्दल अनादर प्रकट होतो का?

हे सगळं मी अतिशय मानवी संवेदनेतून सांगतो आहे. यातून माझ्या कृत्याचे समर्थन करण्याचा कुठेही प्रयत्न नाही. पण आम्ही शांत आहोत याचा अर्थ आमच्यावर अपराधीत्वाचे लेबल लावले तरी चालेल असे करणेही योग्य ठरणार नाही.

आम्ही या देशाचे कायदे पाळणारे नागरिक आहोत. मी कधीही चुकीचे वागलो असेल तर ते मी मान्य केले आहे. मी दोषी ठरलो तर शिक्षेची जबाबदीरीही मी स्वीकारतो आहे. पण चुकीचा आरोप करून मला शिक्षा ठोठावता येणार नाही.

जयाची टिप्पणी मराठीविरोधी वाटत नाही. हे म्हणजे कोणतीही जबाबदारी टाळण्याचा प्रकार नाहीये. पण शब्द अशा पद्धतीने उच्चारले गेले की त्यातून त्याचा विपरीत अर्थ लोकांसमोर जावा. खरे तर ते अधिक राष्ट्रीय भावनेशी नाते सांगणारे आहेत. पण हल्ली सातत्याने राष्ट्रीय भावना ही मनाच्या कोतेपणामुळे छोटी होत गेली आहे.

(अमिताभ बच्चन यांच्या ब्लॉगवरील नोंदीचे संक्षिप्त भाषांतर)
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा