शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. आज-काल
  4. »
  5. मंथन
Written By सौ. भाग्यश्री कुलकर्णी|

जाहिरात की संस्कारांची वासलात?

एखाद्या उत्पादनाचा खप त्याच्या गुणवत्तेवर आधारीत असायला हवा हे खरे पण आजकाल त्या उत्पादनाची जाहिरात कशा प्रकारे केली जाते यावर त्याचा खप अवलंबून असतो.

PRPR
पूर्वी सुरेल आवाजात दोन-चार ओळींची जिंगल्स, 'गृहिणी' टाईप बाई असणार्‍या जाहिरातीत आजकाल माकडे, खारूताई यायला लागलीयेत. म्हणजे बघा आदिम काळापासून सगळीकडे मुक्त संचार करणारे माकडोबा आता चड्डीत दिसू लागले तर सौ. माकडीण काकू ओठ रंगवलेल्या स्थितीत. खारूताईला तर तिचे यजमान पाहून येण्यापूर्वी घर टापटीप सुगंधी ठेवण्यासाठी रूम फ्रेशनर लागतंय.

काही जाहिराती खरोखरच फार सुंदर बनवलेल्या असतात. आता 'दाग अच्छे है' म्हणणारी बहीण-भावाची जोडी बोलणं दिसणं किती गोड. म्हणून काय वर बघत चालणाऱ्या बहिणीचा ड्रेस घाण झाल्याबद्दल भावानं डबक्यातल्या पाण्याला मारायचं की वर तोंड करून चालणारीला चार समजुतीचे शब्द सांगायचे?.... (असं केलं तर त्याचं प्रॉडक्ट कसं खपेल हो! )

इथवरही सगळं बरं म्हणावं अशा प्रकारच्या काही 'बोल्ड' जाहिराती मध्यंतरी टिव्हीवर चालू होत्या. (आठवा 'स्प्रे' शिंपडणार्‍या तरूणाच्या मागाने धावणार्‍या तरूणी) 'स्प्रे'च्या वासाने समस्त महिला वर्गाचे डोके फिरते हे माहीत नव्हतं बुवा! पण त्याकडे न वळता मला दुसर्‍याच मुद्दाकडे तुमचं लक्ष वळवायचे आहे.

पूर्वी वडिलांच्या समोर बोलण्याची बिशाद नसण्याच्या काळात जन्मलेल्या आम्हाला वडील-मुलगा मित्र असतात हे पचवायला ही अंमळ जडच गेलं. पण आताची पिढी त्याच्या पुढे आहे. एका जाहिरातींतला मुलगा 'हाफ हाफ' म्हणत बापाला मोठी पोळी देताना पाहून धन्य वाटतानाच पुढे मात्र त्यालाच विचारतो ' वुईच स्कूल'' पुढची मुक्ताफळे ऐकण्यासारखी आहेत. 'टीचरने नही सिखाया? शेअरींग!' (काढलीना अक्कल बापाची! ) आता या परिस्थितीत पूर्वीचे तीर्थरूप असते तर...... आपली टाप होती का असं काही बोलायची. तोंड उघडल्यावरच श्रीमुखाची लाली वाढली असती.

विनोदाचा मुद्दा सोडता या प्रकारच्या जाहिराती आजच्या मुलांना काय संस्कार देणार? हेच की वडलांना असे बोला किंवा 'Tuesday' आणि मंगळवार वेगवेगळे आहेत असं बिंबवणार. मलाही पटतंय प्रॉडक्ट खपवण्यासाठी जाहिरात गरजेची आहे. पण त्या अशा?

'आईसारखे दुसरे दैवत सार्‍या जगतावर नाही' या संस्कारातले आम्ही. पण एका जाहिरातीत तर आईला चक्क चेटकोणच केलंय हे कसं पचवणार? चॉकलेट वेफर्स न देता आपल्या मुलासाठी इडली बनवणारी आई ही 'व्हिलन' कशी असू शकते? स्वत: आपली 'बचपनची स्टाइल' बदलवण्याची भाषा करणार्‍या मुलांच्या तोंडी मोठ्यांची टर उडवणारी भाषा शोभत नाही. 'टॉलर', 'स्मार्टर', 'शार्पर' बनताना आपल्या वरिष्ठांचा आदर राखण्याचे संस्कार विसरावे लागत नाहीत.

अन्य एका जाहिरातीत नाचणार्‍या लल्लाला पैसे मिळाल्यावर 'अब लल्ला नाचेगा नाही जायेगा' हे तोंड वेंगाडून सांगायची वेळ का यावी? या अन अशा बर्‍याच जाहिरातींची जंत्री देता येईल पण वानगीदाखल तूर्तास इतकेच पुरेसे आहे.