बजरंग दलावर बंदीबाबत एवढी चर्चा का?
-महेंद्र तिवारी
| |
तिकडे इलेक्ट्रॉनिक मीडीयाही भलताच पेटला आहे. प्रत्येक चॅनेल्सवर हाच विषय चर्चिला जातो आहे. बातम्याही अशाच दिल्या जातात की बजरंग दल एखादी अतिरेकी संघटना असावी. या न्यूज चॅनेल्सने आपला निष्पक्षपातीपणाही गमावल्याचे या बातम्यांवरून दिसून येते. एंकर अशा पद्धतीने बातमी सादर करून त्यावर कॉमेंट करतो की जणू तो या क्षेत्रातला तज्ज्ञ असावा. बातमी तो अशी सांगतो, की बजरंग दलावर बंदी घातली गेलीच पाहिजे. जणू त्याच्या हातात असतं तर त्याने लगेच बंदी घातली असती.
खरं तर या दोन्ही राज्यातील हिंसाचारावर कारवाई होते आहे. प्रकरण न्यायालयातही गेले आहे. असे असताना त्यावर असे मतप्रदर्शन करणे कितपत योग्य आहे? जणू आपणच सरन्यायाधीश आहोत, अशा अविर्भावत या विषयावर टिप्पणी केली जाते.
मीडीया याबाबतीत पक्षपाती का आहे, तेच समजत नाही. लालू प्रसाद यादव, रामविलास पासवान यांच्यासारखे नेते सीमीचे समर्थन करणारी जाहीर वक्तव्ये करतात. त्यावेळी या विषयावर चर्चा घडवून आणावी असे या चॅनेल्सना वाटत नाही. अनेक बॉम्बस्फोटात सीमीचा हात असल्याचे लक्षात येऊनही या नेत्यांच्या मते सीमी ही सांस्कृतिक संघटना ठरते.
| |
अमरसिंहांसारखे वाचाळ नेते तर बजरंग दलाला सीमीपेक्षा भयंकर मानतात. हे सगळे होत असताना आपले पंतप्रधान आणि सोनिया गांधी सहकारी पक्षांच्या नेत्यांच्या वाचाळगिरीबाबत मौन पाळतात. अमरसिंह तर सुपारी घेतल्यासारखे बोलतात. दिल्लीतील चकमकीत शहिद झालेले पोलिस अधिकारी ए.एम.सी. शर्मा यांच्या मृत्यूवरही त्यांनी संशय व्यक्त केला. ही चकमक घडवून आणलेली असावी असे मत त्यांनी व्यक्त केले. अखेर गृहमंत्रालयाने त्यांचे विधान खोडून काढले.
सिमीच्या माथ्यावर अनेक लोकांच्या हत्येचा कलंक आहे. असे असताना या संघटनेच्या समर्थनार्थ बोलणार्यांवर देशद्रोहाचा खटला चालवायला नको काय? पोलिस जीव काढत सीमीच्या कारस्थानी नेत्यांना पकडतात आणि देशाचे नेतृत्व करणारी नेतेमंडळी मात्र या संघटनेचे समर्थन करतात. काय दैवदुर्विलास आहे हा.
केवळ मतांच्या राजकारणासाठी नेतेमंडळी इतकी खाली येऊ शकतात? देशहितही त्यांच्या दृष्टिने सर्वोच्च ठरत नाही? पण या देशाचा मीडीया या बाबींकडे जनतेचे लक्ष वळवत नाही. पहिल्या राष्ट्रीय एकता परिषदेत तर सरकारने दहशतवादाचा मुद्दाही घेतला नव्हता. भाजपच्या मुख्यमंत्र्यांनी दबाव आणल्यानंतर त्याचा समावेश केला गेला. या बैठकीत अल्पसंख्याकांच्या आर्थिक स्थितीवर व त्याच्याशी निगडीत इतर मुद्यांवर विचार केला जाणार होता. मग दहशतवाद हा भेडसावणारा प्रश्न त्या बैठकीत का सामील केला गेला नाही?
| |
अर्थात, ओरीसा व कर्नाटकात झालेल्या हिंसाचाराकडेही दुर्लक्ष करता येणार नाही. बलात्कार व हिंसाचार याचे कधीही समर्थन करता येणार नाही. मग तो कोणत्याही धर्माच्या संघटनेने केलेला का असेना. या सगळ्या घटनांसाठी जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केलीच पाहिजे. पण त्याचवेळी केवळ मतांच्या राजकारणासाठी विशिष्ट समाजाला कुरवाळण्याचे प्रकारही थांबवले पाहिजे. शेवटी गुन्हेगाराला कोणतीही जात, पात, धर्म नसतो हे लक्षात ठेवले पाहिजे.
