राजीनाम्याने ''स्वतः'' सुटले, प्रश्न नाही
-सुश्रुत जळूकर
|
|
घटना मोठी असो किंवा छोटी...कोणत्याही हल्ल्यात देशाचा एक नागरिक जरी ठार झाला, एखादा अधिकारी जरी शहीद झाला तरीसुध्दा घटना गंभीर असते, दिल्लीहून पथक मुंबईत दाखल होण्यास लागलेला विलंब, सुरक्षा यंत्रणांनी आपली जबाबदारी चोख बजावून अगोदर सरकारला दिलेली सूचना, या सूचनेकडे झालेले दुर्लक्ष या बाबींकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. परिणामी धीरगंभीर असणार्या नागरिकांचा संयम सुटला. शासन दरवेळी केवळ "आमच्या सहनशक्तीचा अंत पाहू नये, आता काहीही झाले तरी देशद्रोह्यांना सोडणार नाही" अशा प्रकारच्या घोषणा करून नागरिकांना शांत करत असल्याचे आता नागरिकांना सुध्दा चांगल्या प्रकारे माहिती झाले आहे.
इतकी मोठी गंभीर आणि अक्षम्य घटना घडून देखील केवळ पाकिस्तानकडे मिळमिळीत विचारणा करणार्या सरकारच्या या धोरणाला काय म्हणावे? महाराष्ट्रात लवकरच निवडणुका होऊ घातल्या आहेत. सत्ताधार्यांनी बहुदा तो मुद्दा विचारात घेऊन सुध्दा राजीनाम्याचा निर्णय घेतला असावा. प्रचाराच्या वेळी, आम्ही नागरिकांच्या मागणीला प्रतिसाद देऊन राजीनामा दिला...आमच्या पक्षाने कायम नागरिकांचाच विचार केला आहे, देशाच्या हिताचाच विचार केला आहे... अशी वाक्य नक्की ऐकायला मिळतील.
राजीनामा दिला ठिकच झालं, आजपर्यंत देशाच्या तिजोरीच्या चाव्या ज्यांच्या हातात होत्या अशा अर्थमंत्री पी. चिदंबरम् यांच्या हातात केंद्रीय गृहमंत्रालयाची सूत्रं देण्यात आली आहेत. बघू या ते काय निर्णय घेताहेत ते... तसं या देशात काहीही झालं, तरीसुध्दा "वरून" जो निर्णय होतो, त्यालाच महत्व असतं.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री आर. आर. पाटील खरंतर एक हुशार व्यक्तिमत्व म्हणून त्यांचा नावलौकिक आहे. परंतु त्यांनी मुंबई घटनेला छोटी घटना म्हटल्याचे ऐकिवात आहे, त्यांचं असं विधान खऱच असेल, तर का बोलले हे विचार करण्यासारखं आहे. देशाच्या सुरक्षिततेला मोठी बाधा निर्माण झाली आहे. नागरीक तर आता संबंधितांसाठी 'नतद्रष्ट' हाच शब्दप्रयोग करू लागले आहेत. संबंधितांनी आतातरी यापासून बोध घ्यावा. देशाच्या सुरक्षेसाठी कोणतीही तडजोड करू नये. मतांचे राजकारण बाजूला ठेऊन, विरोधी पक्षातल्यांना आणि देशातल्या संरक्षण तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाने आता देशाच्या सुरक्षेचा प्रश्न सोडवला गेलाच पाहिजे, तरच खर्या अर्थाने देशात शांतता प्रस्थापित होईल.
