1. वृत्त-जगत
  2. »
  3. आज-काल
  4. »
  5. मंथन

लिट्टेचा उदय-अस्‍त

ND
लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ ईलमचा जन्मदाता वेलुपिल्लई प्रभाकरन अखेर संपला. जगभरात दहशतवादी म्हणून ओळखला जाणारा हा क्रुरकर्मा श्रीलंकेतील तमिळींसाठी मात्र स्वातंत्र्ययोद्धाच होता. पण त्याला स्वातंत्र्य तरी का हवं होतं? हा संघर्ष त्याने का उभारला होता? त्यासाठी थोडं इतिहासात डोकवावं लागेल.....

श्रीलंकेत सुरू असलेल्या तमिळी विरूद्ध सिंहली या गृहयुद्धाला 26 वर्षांचा इतिहास आहे. बहुसंख्‍य सिंहलींकडून अल्‍पसंख्‍य तमिळींवर होणारा अन्‍याय आणि त्यातून निर्माण झालेल्‍या दीर्घ संघर्षातूनच वेलुपिल्‍लई प्रभाकरन आणि त्याच्‍या लिट्टेचा जन्‍म झाला. त्याने स्वीकारलेल्या मार्गाविषयी मतभेद असू शकतील, पण श्रीलंकेतील तमिळींच्या अस्मितेला फुंकर घालत त्यानेच वेगळ्या तमिळ राष्‍ट्राचे स्‍वप्‍न दाखविले त्यासाठी सातत्यपूर्ण संघर्षही केला.

लिट्टेच्या उभारणीची पार्श्वभूमी
ब्रिटिशांनी 1948 मध्‍ये श्रीलंकेला स्वातंत्र्य दिले खरे, पण त्यानंतर सिंहली आणि तमिळी अशी फूटही त्यानंतर पडली. स्वातंत्र्यानंतर तेथे लागू करण्‍यात आलेल्‍या नागरिकत्‍वाच्‍या कायद्यापासून या संघर्षास सुरूवात झाली. 1956 साली सरकारने देशातील बहुसंख्यकांच्या सिंहलीला राष्‍ट्रभाषेचा दर्जा दिला. भाषक संघर्षाची बीजे पेरली जाऊन श्रीलंकेत 1958 च्‍या सुमारास पहिल्‍यांदा तमिळविरोधी दंगल घडली. त्यात शेकडो लोक ठार झाले. अनेक तमिळींना घरे सोडून दुसरीकडे आश्रय घ्‍यावा लागला. सरकारनेही तेथील तमिळींची मुस्‍कटदाबी करताना बहुसंख्य सिंहली समुदायाला देशाच्‍या पूर्व प्रांतात स्‍थायिक केले. ही जागा परंपरागतरित्या तमिळींची मातृभूमी समजली जात होती. येथून संघर्ष अधिकच तीव्र झाला.

तमिळींची मुस्कटदाब
सत्तरच्‍या दशकात भारतातून श्रीलंकेत जाणार्‍या तमिळ पुस्तकांवर, वृत्तपत्रांवर आणि तमिलनाडूतील राजकीय पक्षांच्‍या श्रीलंकेतील संघटनांवरही बंदी आणली गेली. तमिळ विद्यार्थ्‍यांना भारतात येऊन शिक्षण घेण्‍यावरही निर्बंध घालण्यात आले. 1972 च्‍या सुमारास तत्‍कालीन सीलोनचे नाव बदलून श्रीलंका ठेवण्‍याचा आणि बौद्ध हा राष्‍ट्रीय धर्म जाहीर करण्‍याचा निर्णय घेण्यात आला. त्‍यामुळे तमिळींच्या नाराजीत भर पडली. सरकारमध्‍ये असलेले सिंहलींचे वर्चस्‍व आणि तमिळींना मिळणारी दुय्यम वागणूक यामुळे 1973 च्‍या सुमारास स्‍वतंत्र तमिळ राष्‍ट्राची मागणी समोर आली. त्‍यावेळच्‍या तमिळ राष्ट्रवादी पार्टीने इतर तमिळ पक्षांना सोबत घेऊन तमिळ युनायटेड लिबरेशन फ्रंटची उभारणी केली. त्‍यानंतर ही मागणी जोर धरू लागली आणि त्यासाठी संघर्ष वाढू लागला.

प्रभाकरनचा उदय
या पार्श्‍वभूमीवर ईशान्‍य श्रीलंकेच्‍या पूर्वोत्तर भागातील एका छोट्याशा गावातील वेलुपिल्‍लई प्रभाकरन नावाच्‍या तरुणाचा उदय झाला. आपल्‍या साथीदारांमध्‍ये थंबी (लहान भाऊ) या नावाने परिचित असलेल्‍या प्रभाकरनने 1972 मध्‍ये स्‍वतंत्र तमिळ राष्‍ट्रासाठी 'तमिळ न्यू टायगर'ची स्‍थापना केली. प्रभाकरनच त्याचा नेता होता. सिंहलींविरोधात सशस्‍त्र लढा हे त्यांचे उद्दिष्ट्य होते. 1975 मध्‍ये या संघटनेचे नाव बदलून 'लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ ईलम' (लिट्टे) असे करण्‍यात आले. नंतरच्‍या काळात काही साथीदारांना सैन्‍याने ठार केल्‍याच्‍या निषेधार्थ या गटाने सिंहलींवर हल्‍ले सुरू केले.

नेपोलियन व अलेक्झांडर यांना आदर्श मानणार्‍या प्रभाकरनवर सुभाषचंद्र बोस आणि भगतसिंह यांच्‍या विचारांचाही प्रभाव होता. विशेषतः जपान व जर्मनीच्या मदतीने सुभाषबाबूंनी इंग्रज सत्तेशी लढा त्याला फारच भावला होता. सुरवातीच्‍या काळात तमिळींवरील अन्‍याय दूर करण्‍याच्‍या उद्देशाने स्‍थापन झालेली ही संघटना नंतरच्‍या काळात अधिक हिंसक आणि क्रुर झाली.
ND
मानवी बॉम्बचा जन्मदात
तमिळ वंशजांवर होत असलेल्‍या अन्‍यायाचा बदला घेण्‍याच्‍या नावाखाली प्रभाकरनने अनेक सिंहलींना ठार केले. नवनवीन दहशतवादी तंत्राची जगाला ओळख करण्यात प्रभाकरनचे योगदान (?) मोठे आहे. जगातील पहिला आत्मघाती हल्लाही त्यानेच घडवून आणला. या हल्ल्याचे लक्ष्य होते, भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी.

लिट्टेची सेन
नंतरच्‍या काळात जगभरातील तमिळींच्‍या आर्थिक समर्थनाच्‍या बळावर प्रभाकरनने लिट्टेची भूमी, जल (सी टायगर्स) आणि हवाई (एअर टायगर्स) सेना उभी केली. नेहमी शस्‍त्रांनी सज्ज असलेला आणि लिट्टेच्‍या वेषातील प्रभाकरन तमिळींचा आदर्श मानला जातो. आपल्‍या समर्थकांमध्‍ये स्वातंत्र्य योध्‍दा अशी त्याची ओळख असली तरी जग मात्र त्याला दहशतवादी म्हणूनच ओळखते. भारतानेही राजीव गांधी यांच्या हत्येनंतर लिट्टेला दहशतवादी संघटना असे जाहीर करून बंदी घातली होती. दहशतवादी घटना, हत्या आणि संघटीत गुन्‍हेगारीसाठी तो इंटरपोलसह अन्‍य संस्‍थांमध्‍ये 'वॉन्‍टेड' होता. हल्ला करण्याचीही त्याची पद्धतही पारंपरिक दहशतवादापेक्षा वेगळी होती. त्याचे साथीदार नेहमी जवळ साईनाईडच्या गोळ्या ठेवत. पकडले गेल्यास ती गोळी चावून स्वतःला संपवून टाकण्याची ही पद्धत होती. खुद्द प्रभाकरनही स्वतःकडे सायनाईड बाळगून होता. त्याच्या गळ्यात ही गोळी अडकवलेली असायची. मात्र, आत्महत्या करण्याच्या बाबतीत तो तितका धाडसी नव्हता. आपण पकडले जाण्याची शक्यता असेल स्वतःला तर आपल्याला गोळी झाडून ठार करावे अशी त्याची सहकार्‍यांना 'आज्ञा' होती.

लिट्टेचे बळ
भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी, श्रीलंकेचे राष्ट्रपती प्रेमदासा(1993), श्रीलंकेचे परराष्‍ट्र मंत्री लक्ष्मण कादिरगमार (२००५) या हत्यांचा कलंक लिट्टेच्या नावावर आहे. माजी राष्‍ट्रपती चंद्रिका कुमारतुंगा यांच्या हत्येचा प्रयत्नही त्याने केला. याशिवाय अनेक हल्ल्यांतही त्याचा हात आहे. श्रीलंकन नौदलाच्या युध्‍दनौकेवर हल्‍ला चढविण्यापर्यंत त्याची मजल गेली होती. श्रीलंकेच्या सेंट्रल बँकेवर आत्मघाती हल्‍ला करून सुमारे 100 लोकांना मृत्युमुखी धाडण्यातही त्याचाच हात होता. हत्‍या, खंडणी आणि लूट असे शेकडो गुन्हे गुन्‍हे लिट्टेच्या नावावर आहेत.

शांतता करा
या सगळ्या दहशतवादी घटनांमुळे श्रीलंकेत शांतता नांदण्यासाठी श्रीलंकेच्या सरकारने अनेकदा शांतता चर्चा केली. तसा पहिला प्रयत्न चंद्रिका कुमारतुंगे यांच्या काळात प्रामुख्याने झाला. पण या शांतता काळाचा वापर लिट्टेने स्‍वतःला अधिक ताकदवान बनविण्‍यासाठीच केला. मधल्या काळात नॉर्वेनेही मध्यस्थीचा प्रयत्न केला, पण तोही अपयशी ठरला. श्रीलंकेच्या राष्ट्राध्यक्षपदी महिंदा राजपक्षे आल्यानंतर मात्र, त्यांनी लिट्टेसोबतचा युध्‍दविराम रद्द करून त्याविरोधात ठोस कारवाईला सुरवात केली. जगाची पर्वा न करता त्यांनी ही कारवाई चालूच ठेवली. सुमारे 30 महिने चाललेल्‍या या संघर्षाची सांगता अखेर प्रभाकरनच्या मृत्यूने झाली. 17 मे 2009 या दिवशी लिट्टेने पराभव मान्‍य केला. या युध्‍दात प्रभाकरन पलायन न करता शेवटपर्यंत आपल्यालोकांसमवेत राहिला. प्रसंगी ज्या लोकांसाठी तो लढता, त्यांचीच ढाल करत तो लढत राहिला. पण लष्कराने त्याला कोणतीही दयामाया न दाखविता कारवाई सुरूच ठेवली, म्हणूनच त्यासह त्‍याचा मुलगा चा‌र्ल्स एंथनी आणि लिट्टेचे सात आघाडीचे नेते कारवाईत मारले गेले.

पुढे काय?
श्रीलंकन सरकारने लिट्टेविरुध्‍दचे युध्‍द संपल्‍याची घोषणा करून तमिळींना पूर्ण संरक्षण देण्‍याची घोषणा केली आहे. मात्र, असे असले तरीही जगभरातील तमिळींमध्‍ये राजपक्षे यांच्‍या विरोधात प्रचंड राग आहे. आज प्रभाकरन आणि लिट्टे संपले असल्‍याचे दिसत असले तरीही जगभरातील अनेक भागात याच पध्‍दतीच्‍या नव्‍या हिंसक संघर्षाची सुरूवात झाली आहे. मुळात ज्या कारणांनी लिट्टेची उभारणी झाली, ती समस्‍या अजूनही तशीच आहे. प्रभाकरनची प्रेरणा घेऊन यांच्यापैकी कुणी दुसरा प्रभाकरन बनला तर आश्चर्य वाटायला नको. अन्यथा, पाचूचे हे बेट रक्तरंजित संघर्षातच बुडून राहिलेले असेल.