सामान्य सामान्य राहिले म्हणून...
डॉ. द. भि. कुलकर्णी
| |
संस्कृती म्हणजे काय तर मानवनिर्मित प्रत्येक घटक संस्कृतीचा अंश असतो. निसर्गातली झाडं, पाणी, नद्या, डोंगर वगैरे म्हणजे संस्कृती नाही. कारण ही मानवाची निर्मिती नाही. तर मानवानं निर्माण केलेला प्रत्येक घटक म्हणजे भाषा, साहित्य, संगीत, पोषाख, खाद्यपदार्थ हे सारं म्हणजे संस्कृती होय. महाराष्ट्रातल्या गेल्या पन्नास वर्षांतल्या स्कृतीचा लेखाजोखा घेताना पुढील काही मुद्यांचा प्रकर्षानं समावेश करावासा वाटतो. आता, साठ सालापासून आजपर्यंत महाराष्ट्राचं सांस्कृतिक अवलोकन केलं तर हा हेतू सफल झाला आहे का हा महत्त्वाचा प्रश्न आहे. शासनात मराठी आली आहे, शिक्षणसंस्थांमध्ये आली आहे; पण या प्रक्रियेमुळे सामान्य माणसाची सांस्कृतिक जागृती आणि सहभाग यामुळे भाषा संपन्न होणं हे किती झालेलं आहे? माझं अवलोकन असं आहे की या दोन्ही गोष्टी घडलेल्या नाहीत. त्या घडल्या असत्या तर अनेक अण्णा हजारे निर्माण झाले असते. त्या जर घडल्या असत्या तर इंग्रजी माध्यमांच्या शाळांऐवजी मराठी माध्यमांच्या शाळा वृद्धिंगत झाल्या असत्या. ते घडलं असतं तर महाराष्ट्रातली वाचनसंस्कृती समृद्ध झाली असती. ते घडलं असतं तर पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, विदर्भ, मराठवाडा दक्षिण महाराष्ट्र आणि कोकण हे जे महाराष्ट्राचे 'उपविभाग' आहेत, हे शब्दही नाहीसे झाले असते आणि मग पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र म्हणतो तसं आपण विदर्भाला पूर्व महाराष्ट्र म्हटलं असतं. महाराष्ट्राचे हे जे पोटविभाग आहेत, त्या सगळ्या पोटविभागांचं विभागीकरण झालं असतं.
| |
दुसरा आणखी महत्त्वाचा मुद्दा असा, की मुख्य राष्ट्रीय प्रवाहाशी मराठी अस्मिता सुसंगत करण्याचा एक मार्ग- ज्याच्याकडे आपल्या सगळ्यांचं दुर्लक्ष झालं आहे तो मार्ग- म्हणजे बृहन्महाराष्ट्राकडे लक्ष देणं. महाराष्ट्राचं भौगोलिक स्थान असं आहे की, त्याच्या तीन बाजूंना वेगवेगळी भाषिक राज्यं आहेत. खानदेशच्या जवळ गुजरात आहे, विदर्भाला लागून हिंदी भाषिक मध्यप्रदेश आणि छत्तीसगड आहे, जवळपासच ओरिसा आहे, दक्षिणेकडे आंध्रप्रदेश आणि कर्नाटक आहे. या भाषांबद्दल आपल्या मनामध्ये आस्था असली पाहिजे. इंग्रजी, फ्रेंच, रशियन भाषांमध्ये काय चाललं आहे, त्यांच्या वाङ्मयामध्ये काय चाललं आहे ते आपण समजून घेतो, पण कन्नडमध्ये काय चाललं आहे, तेलुगूमध्ये काय चाललं आहे, उडियामध्ये काय चाललं आहे, हिंदीत काय चाललं आहे, गुजरातीमध्ये काय चाललं आहे इकडे आपण पुरेसं लक्ष देत नाही. त्यामुळे बृहन्महाराष्ट्रात जो मराठी समाज आहे, तो हे काम करू शकतो.
| |
| |
सामान्य माणूस भ्रष्टाचारी नाही. नाइलाजानं त्याला भ्रष्टाचारात ओढलं जातं. तो स्वतःहून करत नाही. सामान्य माणूस हा अंतरंगानं शुद्ध, नीती आणि कायदे, शिष्टाचार यांचा सत्कार करणारा आहे. तथाकथित मोठा माणसांपेक्षा तो निह्नस्वार्थी आहे. फक्त त्याला आपल्या शक्तीची जाणीव नाही. ती जाणीव त्याला कोणी करून दिली तर हा सामान्य माणूस या समाजाला दूरवर प्रगतिपथावर घेऊन जाऊ शकतो. इतिहासकाळात असं सतत घडलेलं आहे. वारकरीपंथानं सामान्यांची अस्मिता जागृत केली. शिवाजी महाराजांनी केली.म्हणून असं म्हणतात की नामदेव महाराजांनी तेराव्या शतकात आध्यात्मिक लोकशाही आणली. रामदासस्वामींनी समाजाला संघटित करून शक्तिमान केलं. अगदी तमासगीर, शाहीर यांच्यातही भिन्न जातिधर्माचे लोक होते. राम जोशी, अनंत फंदी ब्राह्मण होते, सगन- भाऊ मुस्लीम होते, परशुराम शिंपी होते. ''शब्द शक्तीची तरफ आमुच्या करी विधीने दिली असे, टेकुनिया ती जनता शिरशावरी जग उलथुनिया देऊ कसे '' हा विश्वास आधुनिक काळातील केशवसुतांनी व्यक्त केला आहे. मराठीतले दुसरे केशवसुत म्हणजे बा.सी.मर्ढेकर.यांनीसुद्धा हा विश्वास आपल्या काव्यातून प्रगट केलेला आहे, 'अखेर जरी मग टक्कर घेता, युगायुगाचे फुटेल भाल अशाश्वताच्या शमशेरीवर, शाश्वताचीही तुटेल ढाल'.इथेही सामान्य माणसाचा गौरव मर्ढेकरांनी केलेला आहे.
| |
दूरदर्शनवर तुम्ही करमणुकीचा कार्यक्रम पाहत असाल तर त्याचा आनंद घेणं बरोबर आहे, मग ते नृत्य, संगीत असो किंवा नाटक, सिनेमा, क्रिकेटची मॅच काहीही. पण भूकंप, अवर्षण, अपघात, दहशती हल्ले यांची दृश्यंही तुम्ही करमणूक म्हणून पाहत असाल तर तुमची संवेदना बोथट झाली आहे, असं मी समजतो. मालिकांमधील प्रेमप्रकरण ज्या भूमिकांमधून पाहायचं त्याच भूमिकेतून तुम्ही मुंबईवरील हल्ल्याची दृश्यं पाहणं ही संवेदनहीनतेची वृत्ती आहे. सामान्य माणसाला फार पद्धतशीरपणे करमणूकवादी, संवेदनाशून्य, विचारशून्य आणि भावनाशून्य केलेलं आहे. पद्धतशीरपणे ही प्रक्रिया सुरू आहे.
मार्क्सवादी ज्याप्रमाणे धर्म ही अफूची गोळी आहे असं म्हणत त्याचप्रमाणे प्रसारमाध्यमं सर्वसामान्यांना मनोरंजनाची अफूची गोळी देत आहेत. या सामान्य माणसाची केवळ भाषाच व्यवहारात येऊन चालणार नाही तर या सामान्य माणसाचं वर्चस्व सगळ्या जीवनव्यवहारात आलं पाहिजे. १९४८ पासून महाराष्ट्राबद्दल उर्वरित भारतामध्ये फार मोठे गैरसमज आहेत. म्हणूनच मराठी माणूस पंतप्रधान होऊ शकत नाही. यशवंतरावांसारखा कर्तबगार माणूसही पंतप्रधान झाला नाही, याचं एक कारण म्हणजे मराठी समाजाबद्दल उर्वरित देशात असलेले गैरसमज. आपण ही मराठी अस्मिता विकसित करत असताना महाराष्ट्राच्या उपप्रवाहांकडे लक्ष दिलं, राष्ट्रीय प्रवाहांशी संधान ठेवलं, बृहन्महाराष्ट्रातील समाजाला प्रोत्साहन दिलं आणि सामान्य माणसाला विचारप्रवृत्त केलं तर महाराष्ट्र ही भारतीय राजकारणातील महासत्ता होईल.
(शब्दांकन : ममता क्षेमकल्याणी)
(ग्रंथाली वाचक चळवळीचे मासिक 'रूची'मधून साभार)

