मंथन | बाबा आमटे | मराठी दिन | गांधी जयंती | सावरकर | ब्लॉग-कॉर्नर
मुख्य पृष्ठ » वृत्त-जगत » आज-काल » मंथन » ध्येयवेडा अधिकारी 'श्रीधरन'
Feedback Print Bookmark and Share
 
भारताचे दिवंगत पंतप्रधान लालबहादूर शास्त्री हे रेल्वे मंत्री असताना त्यांनी रेल्वे अपघाताची नैतिक जबाबदारी स्वीकारत आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. या घटनेची आठवण भारतीयांच्या मनात पुन्हा ताजी झाली आहे. दिल्लीत 'मेट्रो' प्रकल्पाचा पुल कोसळल्यानंतर मेट्रोची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर होती त्या डॉ श्रीधरन यांनी आपल्या पदाचा लगेच राजीनामा दिला.

वास्तविक पाहता श्रीधरन यांच्यासारख्या वरिष्ठ पदावरील अधिकार्‍याला या प्रकरणातून अंग काढून घेणे सहज शक्य होते. परंतु, त्यांनी याची जबाबदारी स्वीकारत आपला राजीनामा दिला.

श्रीधरन यांनी आतापर्यंत अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण केले आहेत. अशक्यप्राय मानला जाणारा कोकण रेल्वेचा प्रकल्पही त्यांनीच पूर्णत्वाला नेला. 'मला सत्ता अथवा पदाची लालसा नाही, मला देशाचा विकास करायचा आहे', असे त्यांनी कोकण रेल्वेच्या उद्घाटनानंतर केलेल्या भाषणात स्पष्ट केले होते. अशा या ध्येयवेड्या सरकारी अधिकार्‍याने आपल्या जीवनात अनेक चढ-उतार पाहिलेत.

डॉक्टर इलेतुवालापल्ली श्रीधरन यांचा जन्म केरळमधील पल्लकड जिल्ह्यात 12 जुलै 1932 रोजी झाला. त्यांनी केरळमध्येच आपले प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. माजी निवडणूक आयुक्त टी एन शेषन हे त्यांचे वर्गमित्र. पालघाटच्या व्हिक्टोरिया महाविद्यालयानंतर त्यांनी अभियांत्रिकीची पदवी प्राप्त केली. काकिनाडा येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून त्यांनी आपले इंजिनियरींगचे शिक्षण पूर्ण केले. सध्या जेएनटीयू या नावाने हे कॉलेज ओळखले जाते.

शिक्षण पूर्ण केल्यानंतर श्रीधरन यांनी कोझिकोडे (केरळ) येथील शासकीय पॉलेटेक्निक महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काही दिवस काम केले. यानंतर त्यांनी 1954 मध्ये रेल्वे खात्यात प्रवेश केला. दक्षिण रेल्वेचे सहाय्यक अभियंते म्हणून त्यांना जबाबदारी सोपवण्यात आली होती. ही रेल्वे खात्यातील त्यांची पहिलीच जबाबदारी होती. यानंतर त्यांच्यावर तमिळनाडूला जोडणार्‍या पंबन पुलाचे काम सोपवण्यात आले. हे काम अत्यंत कठिण होते, आणि त्यांना केवळ सहा महिन्यात हे काम पूर्ण करायचे होते.
 
संबंधित माहिती शोधा