1. वृत्त-जगत
  2. »
  3. आज-काल
  4. »
  5. मंथन

ध्येयवेडा अधिकारी ''श्रीधरन''

-नितीन फलटणकर

भारताचे दिवंगत पंतप्रधान लालबहादूर शास्त्री हे रेल्वे मंत्री असताना त्यांनी रेल्वे अपघाताची नैतिक जबाबदारी स्वीकारत आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. या घटनेची आठवण भारतीयांच्या मनात पुन्हा ताजी झाली आहे. दिल्लीत 'मेट्रो' प्रकल्पाचा पुल कोसळल्यानंतर मेट्रोची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर होती त्या डॉ श्रीधरन यांनी आपल्या पदाचा लगेच राजीनामा दिला.

वास्तविक पाहता श्रीधरन यांच्यासारख्या वरिष्ठ पदावरील अधिकार्‍याला या प्रकरणातून अंग काढून घेणे सहज शक्य होते. परंतु, त्यांनी याची जबाबदारी स्वीकारत आपला राजीनामा दिला.

श्रीधरन यांनी आतापर्यंत अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण केले आहेत. अशक्यप्राय मानला जाणारा कोकण रेल्वेचा प्रकल्पही त्यांनीच पूर्णत्वाला नेला. 'मला सत्ता अथवा पदाची लालसा नाही, मला देशाचा विकास करायचा आहे', असे त्यांनी कोकण रेल्वेच्या उद्घाटनानंतर केलेल्या भाषणात स्पष्ट केले होते. अशा या ध्येयवेड्या सरकारी अधिकार्‍याने आपल्या जीवनात अनेक चढ-उतार पाहिलेत.

डॉक्टर इलेतुवालापल्ली श्रीधरन यांचा जन्म केरळमधील पल्लकड जिल्ह्यात 12 जुलै 1932 रोजी झाला. त्यांनी केरळमध्येच आपले प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. माजी निवडणूक आयुक्त टी एन शेषन हे त्यांचे वर्गमित्र. पालघाटच्या व्हिक्टोरिया महाविद्यालयानंतर त्यांनी अभियांत्रिकीची पदवी प्राप्त केली. काकिनाडा येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून त्यांनी आपले इंजिनियरींगचे शिक्षण पूर्ण केले. सध्या जेएनटीयू या नावाने हे कॉलेज ओळखले जाते.

शिक्षण पूर्ण केल्यानंतर श्रीधरन यांनी कोझिकोडे (केरळ) येथील शासकीय पॉलेटेक्निक महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काही दिवस काम केले. यानंतर त्यांनी 1954 मध्ये रेल्वे खात्यात प्रवेश केला. दक्षिण रेल्वेचे सहाय्यक अभियंते म्हणून त्यांना जबाबदारी सोपवण्यात आली होती. ही रेल्वे खात्यातील त्यांची पहिलीच जबाबदारी होती. यानंतर त्यांच्यावर तमिळनाडूला जोडणार्‍या पंबन पुलाचे काम सोपवण्यात आले. हे काम अत्यंत कठिण होते, आणि त्यांना केवळ सहा महिन्यात हे काम पूर्ण करायचे होते.
श्रीधरन यांनी हे काम तीन महिन्यात पूर्ण करून दाखवत आपली वेगळी छाप उमटवली. येथूनच श्रीधरन यांच्या यशस्वितेची खरी वाटचाल सुरू झाली. यानंतर त्यांना सरकारतर्फे 'रेल्वे मंत्री' पुरस्कार देण्यात आला आणि त्यांना मुख्य अभियंता म्हणून बढतीही देण्यात आली.

या काळात त्यांच्या नवनवीन कल्पनांनी सरकारमधील अनेक अधिकारी प्रभावित होत असत. भारतात पहिल्यांदा मेट्रो धावली ते कोलकात्यात. या मेट्रोचे कामही श्रीधरन यांच्याच खांद्यावर सोपवण्यात आले होते.

देशासाठी हा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प होता. भारतात प्रथमच मेट्रो धावणार असल्याने सार्‍यांच्या नजरा या प्रकल्पाकडे लागल्या होत्या. श्रीधरन यांच्या नेतृत्वाखाली रेल्वेने हा प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण केला आणि कोलकत्यात पहिल्यांदा मेट्रो धावली.

यानंतर 1990 मध्ये श्रीधरन यांनी रेल्वेतून निवृत्ती स्वीकारली. त्यांनी केलेल्या अतुलनीय कामामुळे त्यांच्याइतक्या ताकदीचा आणि धडाडीचा अधिकारी निवृत्त होणे म्हणजे रेल्वेच्या बौद्धिक संपत्तीत घट होण्यासारखेच होते. म्हणूनच रेल्वेने त्यांना पुन्हा एकदा आपल्या सेवेत येण्याची विनंती केली. आता त्यांच्यावर कोकण रेल्वेची जबाबदारी सोपवण्यात आली होती.

कोकण रेल्वे हा अत्यंत कठिण प्रकल्प होता. निसर्ग पूर्णतः प्रतिकूल असलेल्या भागात रेल्वेचे जाळे मांडणे अवघड होते. प्रचंड पाऊस, खचणारी जमिन आणि दरडी कोसळणारा प्रदेश असलेल्या कोकणात रेल्वे यावी हे स्वप्न जुने होते आणि हा प्रकल्प यशस्वी होणार नाही हे मतही तितकेच जुने होते.

इंग्रजांनीही हा प्रकल्प सुरू करण्याचा प्रयत्न केला होता. पण आलेल्या अनुभवानंतर इंग्रज अभियंत्यांनीही हात वर केले होते. हा प्रकल्प पूर्ण होणे अशक्य असल्याचे मत त्या काळातील इंग्रज अभियंत्यांनी व्यक्त केल्याचा उल्लेख आजही गॅझेटमध्ये पाहायला मिळतो. परंतु, श्रीधरन यांना आव्हान स्वीकारण्याची सवय असल्याने त्यांनी कोकण रेल्वेचे प्रमुख म्हणून शिवधनुष्य हातात घेतले, आणि ते यशस्वीरित्या पेललेही.

कोकण रेल्वेच्या 760 किलोमीटरच्या या टप्प्यात 93 बोगदे आहेत तर 150 पुल. त्यांच्या या प्रकल्पाच्या यशस्वीतेनंतर केंद्र सरकारने पद्मश्री पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला.यानंतर त्यांच्याकडे दिल्ली मेट्रोची जबाबदारी सोपवण्यात आली. तीही त्यांनी पार पाडली. त्यांच्या या अतुलनीय कामगिरीमुळेच 2008 मध्ये त्यांना पद्मविभूषण आणि पद्मश्री पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

आता दिल्लीतील मेट्रोचाच विस्तार करण्याचे काम सुरू असताना अपघात झाला. लगेचच नैतिक जबाबदारी स्वीकारून या प्रामाणिक अधिकार्‍याने राजीनामा दिला. हल्ली पैसा, सत्ता हीच दैवते बनलेल्या समजात नैतिकतेची अशी चाड अभावानेच आढळते.

वास्तविक या घटनेत थेट त्यांचा संबंध नसला तरीही त्यांनी हे पाऊल उचलले हे त्यांच्यातील प्रखर नैतिकतेचे उदाहरण मानावे लागेल. दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनीही त्यांचा राजीनामा नामंजूर करून राजकारणात अभावानेच दिसणारी 'गुणग्राहकता' दाखवली आहे.
About Writer
नितिन फलटणकर