रविवार, 12 जुलैचा दिवस छत्तीसगढ पोलिसांसाठी जणू कर्दनकाळ बनून अवतरला. येथील राजनांदगाव जिल्ह्यातील पोलिसांना 'टार्गेट' करून नक्षलींनी डाव रचला आणि एखाद्या मुरलेल्या शिकार्याच्या जाळ्यात गरीब प्राणी सहज अडकावा तसे पोलीस त्यात अडकत गेले. यानंतर अपुर्या शस्त्र आणि मनुष्यबळाच्या आधारे नक्षलींच्या शोधार्थ जंगलात गेलेल्या 39 पोलीस जवान व पोलिस अधिक्षकावर अक्षरशः गोळ्यांचा पाऊस पडला.
कधी चंद्रपूर, कधी राजनांदगाव तर कधी लालगढ... सुरक्षा दलावर सारखे हल्ले होतच आहेत. आणि सरकार मूग गिळून प्रत्येक वेळला शहीद जवानांची आकडेवारी जाहीर करणे आणि त्यांना श्रध्दांजली अर्पण करण्याव्यतिरिक्त भरीव असे काहीही करीत नाही. हे लज्जास्पद आहे.
कधी छत्तीसगढ तर कधी चंद्रपूर, गडचिरोली आणि कधी झारखंड, ओरीसा.... रोजच हे नक्षलवादी रक्तरंजित होळी खेळत आहेत आणि सरकारी यंत्रणांना वेठीस धरत आहेत.
पश्चिम बंगालच्या लालगढमध्ये माओवाद्यांविरोधात झालेल्या सशस्त्र कारवाईनंतर आणि माओवादी ही दहशतवादी संघटना असल्याचे जाहीर केल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून देशभर नक्षली कारवाया वाढल्या आहेत. एकट्या लालगढवर ताबा प्रस्थापित करण्यासाठी सुरक्षा यंत्रणा आणि सरकारला किती अडचणीचा सामना करावा लागला हे सर्वश्रुतच आहे. या लढ्याच्या माध्यमातून या भागात त्यांची ताकदही किती वाढली हे समोर आले आहे. सरकारी कारवाई झाल्यानंतर गेल्या महिन्याभरात सुमारे शंभरपेक्षा जास्त पोलीस कर्मचार्यांवर नक्षलवादी हल्ले झाले असून ते वाढतच चालले आहेत.
वंचितांच्या आणि शोषितांच्या हक्कासाठी भूमिहीनांनी सुरू केलेला हा संघर्ष आज आपला मूळ उद्देश विसरून दहशतवादी मार्गाकडे वळला आहे. पश्चिम बंगालमध्ये सुरू झालेल्या या संघर्षाने आज देशातील 15 राज्यांमध्ये आपली पाळेमुळे घट्ट रोवली आहेत. कधी छत्तीसगढ तर कधी चंद्रपूर, गडचिरोली आणि कधी झारखंड, ओरीसा.... रोजच हे नक्षलवादी रक्तरंजित होळी खेळत आहेत आणि सरकारी यंत्रणांना वेठीस धरत आहेत.
PTI
गनिमी कावा पध्दतीने लपून-छपून आणि भू-सुरुंगांचे स्फोट घडवून केले जाणारे हल्ले आता सरळ समोरासमोर केले जाऊ लागले आहे. कधी न्यायालयावर तर कधी जेलवर हल्ला करून नक्षलवादी सरकारला आव्हान देत आहेत. गेल्या चार वर्षांत नक्षलवाद्यांनी असे हल्ले करून आपल्या 680 साथीदारांना सोडवून नेल्याचा सरकारी आकडा आहे. एवढे असून आमचे सरकार षंढासारखे त्यांच्या विरोधात केवळ कारवाईसाठी टास्क फोर्सची भाषाच बोलते आहे. नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात प्रत्येक वेळी सुरक्षा यंत्रणांनाच टार्गेट केले असून देशाच्या सुरक्षेलाच यामुळे आव्हान दिले जात आहे.
झारखंडच्या धमतारी जिल्ह्यात 12 पोलीस कर्मचा-यासह एक बस चालकाची हत्या झाल्याच्या घटनेस 16 तास उलटल्यानंतरही पोलीस मुख्यालयाला याची साधी कल्पनाच असू नये म्हणजे काय. हीच का आपली संपर्क यंत्रणा आणि सुरक्षा व्यवस्था?