नक्षलवाद्यांचे 'लाड' आणखी किती दिवस?
|
कधी चंद्रपूर, कधी राजनांदगाव तर कधी लालगढ... सुरक्षा दलावर सारखे हल्ले होतच आहेत. आणि सरकार मूग गिळून प्रत्येक वेळला शहीद जवानांची आकडेवारी जाहीर करणे आणि त्यांना श्रध्दांजली अर्पण करण्याव्यतिरिक्त भरीव असे काहीही करीत नाही. हे लज्जास्पद आहे.
| |
वंचितांच्या आणि शोषितांच्या हक्कासाठी भूमिहीनांनी सुरू केलेला हा संघर्ष आज आपला मूळ उद्देश विसरून दहशतवादी मार्गाकडे वळला आहे. पश्चिम बंगालमध्ये सुरू झालेल्या या संघर्षाने आज देशातील 15 राज्यांमध्ये आपली पाळेमुळे घट्ट रोवली आहेत. कधी छत्तीसगढ तर कधी चंद्रपूर, गडचिरोली आणि कधी झारखंड, ओरीसा.... रोजच हे नक्षलवादी रक्तरंजित होळी खेळत आहेत आणि सरकारी यंत्रणांना वेठीस धरत आहेत.
|
झारखंडच्या धमतारी जिल्ह्यात 12 पोलीस कर्मचा-यासह एक बस चालकाची हत्या झाल्याच्या घटनेस 16 तास उलटल्यानंतरही पोलीस मुख्यालयाला याची साधी कल्पनाच असू नये म्हणजे काय. हीच का आपली संपर्क यंत्रणा आणि सुरक्षा व्यवस्था?
|
भर शहरात 200 ते 500 नक्षलवादी केंद्रीय सुरक्षा दलाच्या 10 जवानांची हत्या करतात. नंतर या घटनेच्या आणि तपासासाठी गेलेल्या पोलीस पथकाला नक्षलवादी घेराव घालून शरीराची चाळण होईपर्यंत गोळ्या घालतात. एकाच दिवसांत 39 पोलीस जवानांची हत्या केली जाते. हा काही लहान-सहान विषय नव्हता. मात्र, यावर गृहमंत्री, पंतप्रधान, राष्ट्रपती किंवा संरक्षण मंत्री कुणाहीकडून साधी प्रतिक्रियाही उमटू नये हा आश्चर्याचा विषय आहे.
| |
सैफ-करीनाचं काय चाललंय या पुचाट बातम्या दाखवण्यातच धन्यता मानतात हे पाहून आपल्या बोथट व्यवस्थेची चीड येते. मुंबईसारख्या दहशतवादी हल्ल्याच्या घटनेचेही पेज थ्री पार्ट्यांसारखे लाईव्ह प्रक्षेपण दाखविण्याचा मुर्खपणा करणा-या या चॅनल्सकडून आणखी काय अपेक्षा करता येईल. मुंबईत चार लोक गेले तरी ही चॅनेल्स केवढा गहजब माजवतात, कारण काय तर मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे. पण त्याचवेळी ग्रामीण भागात ३९ जण, तेही पोलिस मेले तर त्याचे किती कव्हरेज हवे? या हल्ल्यात ठार झालेले पोलीस अधीक्षक विनोद चौबे आणि त्यांचे साथीदार यांचे बलिदानही मुंबई हल्ल्यात शहीद झालेल्या हेमंत करकरेंइतकेच महत्वाचे आहे. मात्र, ही बातमी तितकीशी महत्वाची वाटली नाही, हे अधिक वेदना देणारे आहे.
टास्क फोर्सचे काय?
नक्षलवादाचा मुकाबला करण्यासाठी स्पेशल टास्क फोर्सची उभारणी करण्याची भाषा करणारे सरकार प्रत्यक्षात मात्र काहीही करताना दिसत नाही. दहशतवादापेक्षा देशांतर्गत नक्षलवाद अधिक धोकेदायक आहे हे नाकारून चालणार नाही. नक्षलवाद्यांना त्यांच्याच पध्दतीने उतर द्यावे लागणार आहे.
|
आमचे सरकार हे सर्व बदलण्याचा विचार करणार आहे की नाही. की रोज जवानांच्या मृत्यूचे आकडे सांगणा-या बातम्या आणि श्रध्दांजलीचे चार शब्द हेच ऐकवले जाणार? या देशाच्या घटनेला आणि येथील शासन व्यवस्थेला न मानणारे व देशा विरोधात युध्द पुकारणा-यांशी आणखी किती जणांचे बळी जाईपर्यंत आम्ही नरमाईने वागणार आहोत?
हे चित्र आता बदलायला हवे अशीच सर्वांची अपेक्षा आहे. मात्र आमच्या राजकारण्यांना ज्या दिवशी हे उमजेल तो सुदिनच म्हणावा लागेल.
[email protected]
(09713039145)

