भारत आणि चीनमध्ये युद्ध होण्याची शक्यता आहे काय? आंतरराष्ट्रीय अभ्यासकांची मते लक्षात घेता अशी शक्यता आहे, पण ती अंधुक. अभ्यासकांच्या मते, भारत-पाकिस्तान संबंधात चीनचा हस्तक्षेप, तिबेटमध्ये चीनचा वाढता हस्तक्षेप आणि उभय देशातील अद्यापही न मिटलेला सीमाप्रश्न या तिन्ही किंवा यापैकी एका मुद्यावरूनही दोन्ही देशांत युद्ध होऊ शकते. भारत-पाक युद्ध झाल्यास चीन यात हस्तक्षेप करेल हे उघड आहे. कारण दक्षिण आशियात भारत आणि पाक असा सत्तेचा समतोल राखणे हे चीनचे उद्दिष्ट आहे. म्हणूनच पाकचे पारडे कमी पडतेय हे लक्षात आले की त्याला आधार द्यायचे चिनी धोरण आहे. भारत चीनकडे व्यूहात्मक दृष्ट्या लक्ष देतोय असं म्हटल्यावर ते लक्ष दूर करण्यासाठी पाकिस्तान सक्षम आहे. म्हणूनच चीनला भिडलेल्या पूर्व सीमांवरून भारताला पश्चिम सीमांकडे लक्ष केंद्रीत करण्यासाठी लागणार्या आगळिकीही या देशाकडून सातत्याने केल्या जात आहेत. म्हणूनच आपण नेहमीच चीनपेक्षा पाकिस्तानकडे जास्त लक्ष देत आहोत. दुर्देवाने चीनकडे दुर्लक्ष करत आहोत. आपले परराष्ट्रधोरण पाकिस्तानभोवतीच घुटमळत राहिल्याने भारताची शक्तीही मर्यादीत झाली आहे. किंबहूना भारताला दक्षिण आशियापुरताच तेही उपखंडापुरताच मर्यादीत ठेवण्याचा चीनचा मनसुबाही यशस्वी ठरला आहे. चीनप्रमाणेच आशियाई किंवा जागतिक पातळीवर एक बडा खेळाडू म्हणून पुढे येण्याचे भारतीय मनसुबे पाकिस्तानी कारवायांनी हाणून पाडले आहेत. त्यामुळे आशियातील चीन हीच एकमेव शक्ती म्हणून पुढे येते आहे. भारताला डोकं वर काढू देऊ नये म्हणून चीनने कायम पाकिस्तानला मोठे करण्याचा मार्ग अंगीकारला. पाकच्या लष्करी विकासाला, क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमाला आणि अंतिमतः अण्वस्त्रसज्ज होण्याला चीननेच सहकार्य केले. १९७४ मध्ये भारताने अणू चाचणी केल्यानंतर चीनने पाकला त्यासाठी प्रेरीत केले. त्यासाठी लागणारी सर्व मदत पुरवली. आता भारताबरोबर पाकही अण्वस्त्रसज्ज देश बनला आहे. त्यामुळे चीनला अपेक्षित दक्षिण आशियातील सत्तासमतोलही साधला गेला आहे. अशा वेळी भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्द झाल्यास चीन हस्तक्षेप करेल काय? याची शक्यता कमीच वाटते. त्याऐवजी चीन पाकला लष्करी साहित्य आणि राजकीय पाठिंबा देईल. शिवाय अमेरिका, फ्रान्स, इंग्लंड, रशिया, जपान आणि इतर देशांच्या मदतीने भारतावर पाकविरोधातील युद्ध थांबविण्यासाठी दबाव आणेल. त्यामुळे उपखंडातील परिस्थिती 'जैसे थे' राहू शकेल.