1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. आंतरराष्ट्रीय
Written By भाषा|

ओबामांना नोबेल केवळ अकरा दिवसांच्‍या कामावरून

अमेरिकेचे राष्‍ट्राध्‍यक्ष बराक ओबामा यांना देण्‍यात आलेले शांतता नोबेल वादाच्‍या भोव-यात सापडण्‍याची शक्यता असून जगभरातील बुध्‍दीवाद्यांनी या पुरस्‍काराबद्दल आश्‍चर्य व्‍यक्त केले आहे. केवळ 11 दिवसांच्‍या कारकिर्दीच्‍या आधारे ओबामा यांना हा पुरस्‍कार देण्‍यात आल्‍यानेही त्‍याबद्दल नाराजी व्‍यक्त होत आहे.

नोबेल पुरस्‍काराचे नामांकन दरवर्षी 1 फेब्रुवारीपर्यंतच्‍या कामावर ठरविले जाते. ओबामा यांनी 20 जानेवारी रोजी शपथ घेतली. त्‍या दृष्‍टीने विचार करता ओबामा यांना केवळ 11 दिवसांच्‍या कारकिर्दीच्‍या आधारे नोबेल पुरस्‍कार देण्‍यात आला आहे. त्‍यांनी सुरूवातीच्‍या 11 दिवसांत असे काय भरीव कार्य केले की त्‍यांना नोबेल सारखा प्रतिष्‍ठेचा पुरस्कार दिला जावा, असा सवालही उपस्थित केला जात आहे.

यंदाच्‍या नोबेल पुरस्‍कारासाठी 205 प्रतिस्‍पर्धी रिंगणात होते. त्‍या सर्वांवर मात करून ओबामा यांनी हा पुरस्‍कार पटकाविला असला तरीही राष्‍ट्रपिता महात्मा गांधींनाही त्‍यांनी केलेल्‍या कार्याबद्दलही त्‍यांना अद्यापही हा पुरस्‍कार मिळाला नसताना ओबामा यांनी असे काय काम केले की त्‍यांना हा पुरस्‍कार देण्‍यात आला याबद्दलही प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

खुद्द बराक ओबामा यांनीही हा पुरस्‍कार मिळाल्‍याबद्दल आश्‍चर्य व्‍यक्त केले असून आपण या पुरस्‍कारासाठी लायक नसल्‍याचे म्हणत हा पुरस्‍कार अमेरिकन नागरिकांचा बहुमान असल्‍याचे म्हटले आहे.