1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. राष्ट्रीय
Written By वेबदुनिया|

कमलनाथही आता 'राज'मार्गावर

ND
ND
केंद्रीय भूपृष्ठ परिवहन व राज्यमार्ग मंत्री कमलनाथ यांनीही मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या म्हणण्याचीच री ओढत राज्यातील नव्या उद्योगांत स्थानिकांनाच नोकरीत प्राधान्य मिळायला हवे असे मत मांडले.

इंदूरमध्ये एका कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले, की विविधतेत एकता ही मध्य प्रदेशाची ओळख आहे. मात्र, येथील नोकर्‍यांत स्थानिकांनाच प्राधान्य मिळायला हवे असे मला वाटते. अर्थात, स्थानिक म्हणजे तेथील स्थानिक रहिवासी हा यामागचा अर्थ आहे. माझ्या छिंदवाडा या मंतदारसंघात एखादा नवा उद्योग आल्यास इतर मध्य प्रदेशऐवजी छिंदवाड्यातील लोकांना प्राधान्याने रोजगार मिळायला हवा.

दोनच दिवसांपूर्वी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी राज्यातील उद्योगात स्थानिकांनाच नोकरी दिली जाईल. बिहारींना नोकरी दिली जाणार नाही, असे म्हटले होते. त्यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठल्यानंतर त्यांनी आपल्या विधानावर घुमजाव केले होते. अनेक कॉंग्रेसी नेत्यांनीही त्यांच्यावर टीका केली होती. मात्र, आता कॉंग्रेसचेच एक नेते शिवराज यांच्याच विधानाची पाठराखण करणारी विधाने करत असल्याबद्दल आश्चर्य वाटत आहे. मध्य प्रदेशातही राज ठाकरे यांचे नवनिर्माणाचे आंदोलन पोहोचल्याची ही खूण तर नव्हे अशी चर्चाही होत आहे.