आनंदाची उधळण करणारा सण 'गुढीपाडवा'
ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर
गुढीपाडवा हा सण चैतन्यहीन मानवात चेतना निर्माण करून त्याच्या अस्मिता जागृत करण्याचा सण आहे. मनातील सर्व वैरभाव विसरून, अशांतता, अस्वस्थता यांवर विजय मिळवून देणारा आनंदाची उधळण करणारा हा सण आहे, असे ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर यांनी एका मुलाखतीत म्हटले आहे.
प्रश्न- गुढीपाडव्याचा काय अर्थ आहे. हा सण कशाचे प्रतिक आहे? उत्तर - चैत्र महिन्यातील शुक्ल प्रतिपदेला महाराष्ट्रात साजरा होणारा गुढीपाडवा साडेतीन मुहुर्तांपैकी एक आहे. शालिवहन शकाचा प्रारंभ याच दिवसापासून होतो. शालिवहनाने मातीच्या सैन्यातही प्राणांचा संचार केला ही लाक्षणिक कथा आहे. याच दिवशी श्रीरामाने वालीच्या त्रासातून दक्षिणेच्या प्रजेला मुक्त केले होते. या मुक्त झालेल्या प्रजेने उत्सव साजरा करत गुढया उभारल्या होत्या. त्यामुळेच या दिवसाला गुढीपाडवा हे नाव मिळाले आहे. नवसंवत्सराचा प्रारंभ भारतात चैत्र शुक्ल प्रतिपदेपासून होतो. नववर्षाचा हा पहिला दिवस अतिशय पवित्र आणि महत्वाचा मानला जातो. आपणा मराठी माणसांच्या दृष्टीने गुढी पाडव्याला आणखी एक महत्वाची बाजू आहे. गुढी पाडव्याला पंचांगपूजन केले जाते. पंचांग ह्या विषयात महाराष्ट्रातील विद्वानांनी लक्षात घेण्यासारखी कामगिरी केली आहे. प्रश्न - नवीन वर्षाचे स्वागत करताना आपण घराच्या दारासमोर गुढी उभारतो ही गुढी कशाचे प्रतिक आहे?
उत्तर - नवीन वर्षाचे स्वागत करताना आपण घराच्या दारासमोर गुढी उभारतो. ही गुढी उभारण्याची परंपरा फार प्राचीन आहे. आपली ही गुढी अनेक गोष्टींचे द्योतक आहे. गुढीसाठी महाराष्ट्रातील बहुसंख्य ठिकाणी बांबूची किंवा कळकाची काठी वापरली जाते. ही काठी वापरण्याची परंपरा एकापरीने पर्यावरणाचे, वृक्षवेलींचे अस्तित्व टिकविण्याचे साधन आहे. आपण गुढी आकाशाच्या दिशेने उभारतो. आपली महत्त्वाकांक्षा आकाशाएवढी उत्तुंग आणि अथांग असावी, असा संदेश जणू ही गुढी देत असते. ही गुढी विजयाचे, केलेल्या तपाच्या साफल्याचे प्रतीक आहे, गुढीत वापरलं जाणारे कडुनिंब, साखरेची माळ आणि रेशमी वस्त्र ही मानवाच्या तीनही गरजांची प्रतिके आहेत. चैत्रपालवीत नटणार्या महिन्याच्या पहिल्या दिवशी रम्य वातावरणात, उगवत्या सूर्याच्या साक्षीने गुढी उभारुन करण्याची आपली परंपरा अभिमानास्पद आहे
प्रश्न- गुढीमध्ये वापरण्यात येणार्या कडुनिंबाचे महत्व काय आहे?
उत्तर - कडुनिंब हा आरोग्यदृष्टया फार महत्वाचा आहे. कडुनिंबांच्या पानांचा वापर अन्नमार्गाच्या संरक्षणासाठी, खोडाच्या सालीचा धूर श्वसनमार्गाच्या संरक्षणासाठी तर काढयाचा वापर हा त्वचेच्या संरक्षणासाठी मोठया प्रमाणावर करण्यात येतो या सर्व बाबींचा विचार करण्यात आला आहे.
प्रश्न - गुढीपाडवा पर्यावरण संवर्धनाचे प्रतिक का मानले जाते?उत्तर - गुढीपाडवा म्हणजे चैत्र शुध्द प्रतिपदा. हा संवत्सराचा पहिला दिवस आहे. या दिवशी ब्रम्हदेवाने विश्वाची निर्मिती केली त्यामुळे हा सण निर्मितीचा सृजणाचा आहे. या दिवसांमध्ये निर्सगात चैतन्य फुललेले असते. प्राणी, सृष्टी यामध्ये एक उत्साह सळसळत असतो. यानिमित्ताने पर्यावरण संवर्धन होते. पर्यावरणाचा समतोल साधला जातो. आपल्या सणांमध्ये पत्री, पाने, फुले यांना महत्व दिले आहे. या पत्रींना किंवा वृक्षांना महत्व देण्यामागे मुख्य उद्देश हा त्यांचे संवर्धन करणे हा आहे. या वृक्षवेलींचे संवर्धन व्हावे या दुरदृष्टीने त्यांचा समावेश केला आहे.
प्रश्न - गुढीपाडवा या सणाकडे कोणत्या दृष्टीकोनातून पाहिले पाहिजे?
उत्तर - सध्या संस्कृतीरक्षणाचे, सद्गुण संवर्धनाचे महत्व वारंवार सांगितले जात आहे. कारण जीवन अधिक यांत्रिक बनले आहे. आपले आचरण कसे असावे हा सर्वांना प्रश्न निर्माण होतो आहे. यावेळी हे सण संस्कृतीचे महत्व, धर्माचा अर्थ आपल्यापर्यंत पोहोचवितात. आपल्या इतिहास, परंपरा यांच्याकडे चालू जमान्यातील संदर्भ घेवून पाहिले पाहिजे. त्याचा आपल्या आचरणात समावेश करणे आवश्यक आहे. आज मोठया प्रमाणावर आपआपसात मतभेद वाद वाढले आहेत. या सर्वाना टाळून सामाजिक प्रगतीसाठी सर्वांनी एकत्र येणे आवश्यक आहे. गुढीपाडवा हा सण एकात्मतेला, स्नेह वाढविण्याला चालना देणारा आहे. तरी या निमित्ताने सर्व भेदभाव विसरून एक होवूया आणि सामाजिक विकास साधूया.