1. धर्म
  2. »
  3. हिंदू
  4. »
  5. सण

पूर्वजांच्या प्रेरणादायी स्मृतींसाठी सागर पूजन

- पूज्य पांडूरंगशास्त्री आठवले

पूर्वजांच्या प्रेरणादायी स्मृतींसाठी सागर पूजन
NDND
श्रावणी अर्थातच नारळी पौर्णिमेला व्यापारी आणि कोळी लोकांच्या दृष्टीकोनातून अतिशय महत्त्व आहे. समुद्रावर सत्ता चालविणारा वरूणदेव प्रसन्न व्हावा आणि समुद्रातून मालवाहतूक करणाऱ्या जहाजांना नुकसान करू नये अशी व्यापाऱ्यांची भावना असते. तर सागरावरच अवलंबून असलेल्या कोळी लोकांना आपल्यावर तो सतत प्रसन्न रहावा असे वाटते.

हा उत्सव भारतीय व्यापार-उद्योग करणाऱ्या समाजाच्या समृद्ध वारशाचीही महती गातो. त्याकाळात फारशा सोयी नसतानासुद्धा समुद्रावर स्वार होऊनच भारतीय व्यापारी इजिप्त, ग्रीस, श्रीलंका, ब्रह्मदेश, चीन, जावा या देशात गेले. आपला व्यापार वाढविला. त्याचबरोबर कलाकौशल्ये, तत्वज्ञान, धर्म, देवदेवतांचा प्रचार केला. त्यामुळे हे लोक भारताचे सांस्कृतिक राजदूतच म्हटले पाहिजेत. अशा या आपल्या पूर्वजांच्या प्रेरणादायी स्मृतींना अभिवादन करण्यासाठी समुद्राला नाऱळ अर्पण केला जातो.

सागरे सर्व तीर्थानि..... नदीपेक्षा संगम आणि संगमापेक्षा सागर अधिक पवित्र आहे, असे ऋषी-मुनींनी म्हटले आहे. गीतेत तर स्थितप्रज्ञाची तुलना समुद्राशी केली आहे. नदीत ठिकठिकाणचा वेगवेगळ्या प्रकारचा कचरा मिसळून वाहत वाहत समुद्राला जाऊन मिळतो. पण त्या कचऱ्यामुळे समुद्रावर काहीही परिणाम होत नाही. त्याचप्रमाणे स्थितप्रज्ञाच्या आंतरिक शांती व वैचारीक स्थैर्यामुळे वेगवेगळ्या वाईट विचारांचा मनात प्रवेश होऊनही त्याच्यावर काहीही परिणाम होत नाही.

सर्व संपत्ती मिळाल्यानंतर सागर कधीच उन्मत्त होत नाही. गर्विष्ठ होत नाही. आपल्या मर्यादेचे उल्लंघन करीत नाही. चार पैसे हातात आल्यानंतर आपलं घराणं, समाज, राष्ट्र, धर्म आणि संस्कृतीची थट्टा उडविणाऱ्या यकश्चित मानवाला सागराकडून त्याची ही नम्रता शिकायला हवी. मित्राची कसोटी आपत्कालिन प्रसंगात लागते, शूराची कसोटी रणांगणावर होते, तशीच व्यापाऱ्याची कसोटी त्याच्याकडे किती संपत्ती आहे, यावर होते. आणि हे वैभव मिळवूनही तो जगापुढे विनम्र असतो, या संपत्तीला तो परमेश्वराचा प्रसाद समजतो, तो व्यापारी या परीक्षेत उत्तीर्ण होतो.

SmitaWD
खारट असलेला समुद्र अशा अर्थाने गोड आहे. चंद्राला पाहिल्यानंतर त्याच्या अंतर्यामी खळबळ माजते. समुद्रपूजन करणाऱ्यांनी ही बाब लक्षात ठेवली पाहिजे. ज्याला पाहिल्यानंतर अंतर्यामी खळबळ माजेल असा कोणी संत-महात्मा आपल्या जीवनात आहे? चंद्राला पाहून सागराला जशी भरती ओहोटी येते, तशी भावनांची आंदोलने एखाद्या महापुरूषाला पाहून आपल्याही मनात आली पाहिजे. चंद्र ज्याकडून प्रसाद घेतो, त्या सूर्याला सागर आपली संपत्ती देतो. सागराच्या पाण्याची सूर्यामुळे वाफ होऊन त्यातील खारटपणा निघून जातो आणि पुढे या वाफेचे ढग पावसाच्या रूपात रिते होऊन मधुर पाण्याचा वर्षाव करतात. संत ज्याचे कार्य करतात, ज्याच्याकडून प्रकाश आणि प्रेरणा घेतात, त्या परमेश्वराच्या चरणी आपली संपत्ती व्यापाऱ्याने वाहिली पाहिजे. तरच त्याच्या जीवनातील खारटपणा म्हणजे दुःख, वेदना, निराशा ही वावटळ निघून जाईल.

म्हणूनच वेदनिष्ठा व वेदरक्षणाच्या प्रतिज्ञेची आठवण करणारा, ध्येयाचे स्मरण करणारा, भावनिक आयुष्याला समृद्ध करणारा आणि संपत्ती इश्वराला अर्पण करण्याचा संदेश देणारी ही श्रावणी पौर्णिमा भारतीय जनमानसासाठी महत्त्वाचा उत्सव आहे.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा