धार्मिक यात्रा या सदरात आज आपण उज्जैन येथील मंगलनाथ मंदिराची माहिती घेणार आहोत. मध्यप्रदेशाची धार्मिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणार्या उज्जैन येथे हे मंदिर आहे.
याशिवाय उज्जैन मंगळाची जननी म्हणूनही ओळखले जाते. कुंडलीत मंगळ असलेल्या व्यक्ती शांती आणि पूजा करण्यासाठी येथे येतात. देशात मंगलनाथाची अनेक मंदिरे आहेत. परंतु, उज्जैन त्यांचे जन्मस्थळ असल्यामुळे येथे केलेली पूजा विशेष महत्त्वाची असते.
फोटो गॅलरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
हे अति प्राचीन मंदिर असून शिंदे घराण्याने याची पुनर्स्थापना केली होती. भगवान महाकालेश्वराची नगरी म्हणूनही उज्जैन ओळखले जाते. भगवान मंगलनाथाच्या शिवरूपी प्रतिमेचे पूजन करण्यासाठी प्रत्येक मंगळवारी भक्तांची रांग लागलेली असते. मंगळ ग्रहाचा जन्म कसा झाला याची कहाणी अशा प्रकारे आहे. अंधकासुर नावाच्या राक्षसाच्या रक्तापासून अनेक राक्षस जन्म घेतील असे वरदान भगवान शिवाने त्याला दिले होते. शंकराचे वरदान मिळाल्यानंतर अंधकासुराने अवंतिकेत धुमाकूळ घालण्यास सुरवात केली.
त्याच्या त्रासाला कंटाळून लोकांनी शंकराची प्रार्थना केली. तेव्हा शंकराने स्वत: अंधकासुराशी युद्ध केले.
दोघांत घनघोर युद्ध चालू असताना शंकराच्या अंगातून घामाच्या धारा वाहू लागल्या. घामाच्या गरम धारांमुळे उज्जैनला तडा गेला आणि ते विभक्त झाले. यामधून मंगळ ग्रहाचा जन्म झाला. शंकराने अंधकासुराचा संहार केला आणि त्याच्या रक्ताच्या थेंबाला मंगळ ग्रहाने आपल्यामध्ये सामावून घेतल्यामुळे मंगळ भूमी लाल रंगाची आहे असे स्कंद पुराणात सांगितले आहे.
|