शनिवार, 16 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. धर्मयात्रा
  3. धर्मयात्रा लेख
Written By श्रुति अग्रवाल|

ओम त्र्यंबकम यजामहे...

त्र्यंबकेश्वराचे त्रिनेत्र रूप ‍

Shruti WD  
शंकराच्या बारा ज्योतिर्लिंगांमध्ये त्र्यंबकेश्वरचा समावेश होतो. दक्षिणेची काशी मानले जाणार्‍या नाशिकपासून हे ज्योतिर्लिंग 35 किलोमीटरवर आहे. ज्योतिर्लिंग स्तोत्रातही त्र्यंबकम गौतमी तटे असे म्हणून त्र्यंबकेश्वराचा उल्लेख केला आहे.त्र्यंबकेश्वर ब्रह्मगिरी या पर्वताच्या पायथ्याशी वसले आहे. हा पर्वत म्हणजे शिवाचे एक रूप मानले जाते. याच पर्वतावर पवित्र गोदावरी नदी उगम पावते.
 

गावात पाऊल ठेवताच मन आपोआप शिवमय होऊन जाते. उतरल्यानंतर लांबूनच मंदिराचा कळस दिसू लागतो. त्या दिशेने चालून गेले की मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार दिसू लागते. महामृत्युंजय मंत्राच्या आवाजाने मनातही सात्विक भाव उत्पन्न होतात. या मंदिराची इमारत सिंधू-आर्य शैलीचा उत्तम नमूना आहे. मंदिराच्या सभोवताली दगडी भिंतींचा मजबूत कोट आहे. या कोटाच्या आत हे मंदिर वसले आहे. वैशिष्ट्यपूर्ण बांधणीचे हे मंदिर नानासाहेब पेशवे यांनी १७५५ ते १७८६ या काळात बांधले. मंदिर बांधायला तब्ब्ल 31 वर्षे लागली. त्यासाठी सोळा लाख रूपये खर्च आला.

मुख्य प्रवेशद्वारातून आत प्रवेश केल्यानंतर समो
Shruti WD  
मंदिर दिसते. मुख्य मंदिराच्या समोनंदीचे स्वतंत्र मंदिर आहे. या नंदीच्या शिंगातून पाहिल्यानंतरही शिवलिंगाचे दर्शन होते. तेथून मुख्य मंदिरात जाण्याचा रिवाज आहे. मुख्य मंदिरात आल्यानंतर गर्भगृहातूनच शिवलिंगाचे दर्शन घ्यावे लागते. गाभाऱ्यात जाता येत नाही. येथे शिवलिंगाच्या ठिकाणी एक खड्डा आहे. त्यात एक एक इंचाची छोटी छोटी तीन लिंगे आहेत. त्यांना ब्रह्मा विष्णू महेश असे मानले जाते.

पहाटेच्या वेळी होणाऱ्या पूजेनंतर त्यावर चांदीचा पंचमुखी मुकूट चढविला जातो. त्र्यंबकेश्वर गौतम ऋषींच्या पदस्पर्शाने पावन झाले आहे. प्राचीन काळी गोहत्येचे पाप लागल्याने त्यातून मुक्ती मिळविण्यासाठी गौतम ऋषींनी येथेच तपश्चर्या केली होती. गंगेला येथे प्रवाहित करावे असा वर त्यांनी शंकराकडे मागितला. शंकराने तथास्तू म्हटले आणि येथे गंगा अर्थात गोदावरी अवतरली. अशी दंतकथा सांगीतली जाते.

Shruti WD  
गोदावरीच्या उगमाबरोबरच गौतम ऋषींच्या विनंतीनुसार शंकराने येथे कायमचा वास करण्याचे मान्य केले. शंकराचे एक रूप त्रिनेत्र आहे. या त्रिनेत्राने येथे रहाण्याचे मान्य केले म्हणून त्र्यंबकेश्वर (तीन नेत्रांचा ईश्वर) असे नाव पडले. उज्जैन आणि ओंकारेश्वराप्रमाणेच त्र्यंबकेश्वरला गावचा राजा मानण्यात येते. त्यामुळे प्रत्येक सोमवारी प्रजेची हालहवाल पाहण्यासाठी त्र्यंबकेश्वराची स्वारी नगर भ्रमणासाठी निघते.

अर्थात पालखीतून त्र्यंबकेश्वराचा पंचमुखी सोन्याचा मुखवटा मिरवत ठरवलेल्या मार्गाने कुशावर्त या येथील पवित्र तीर्थावर नेला जातो. तेथे मुखवट्याला स्नान घातले जाते. त्यानंतर मुखवटा परत मंदिरात नेण्यात येतो. त्याला हिरेजडीत सुवर्णाचा मुकूट चढविण्यात येतो. ही पालखी पाहणे हा अतिशय पवित्र आणि अलौकीक अनुभव आहे.

कुशावर्त या पवित्र तीर्थाची कथाही रोचक आहे. ब्रह्मगिरी पर्वतावरून गोदावरी नदी
Shruti WD  
वारंवार लुप्त होत असे. गोदावरीच्या पलायनाला रोखण्यासाठी गौतम ऋषींनी गोदावरीला बांध घातला आणि एका कुंडात हा प्रवाह उतरवला. त्यालाच कुशावर्त तीर्थ असे म्हणतात, अशी दंतकथा सांगितली जाते. कुंभमेळ्यात शैव आखाडे याच कुंडात पवित्र शाही स्नान करतात. शिवरात्र आणि श्रावणी सोमवारी त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी असते. प्रत्येक श्रावणी सोमवारी ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा घातली जाते. तिसऱ्या सोमवारी तर मोठी गर्दी असते.

कुशावर्तात स्नान करणे फार पवित्र मानले जाते. त्र्यंबकेश्वरमध्ये कालसर्प योग आणि नारायण नागबलीची पूजासुद्धा होती. त्यामुळे वर्षभर येथे लोकांची गर्दी असते. याशिवाय नाथपंथीयांसाठीही त्र्यंबकेश्वराचे आगळे महत्त्व आहे. ज्ञानेश्वरांचे मोठे बंधू निवृत्तीनाथांची समाधी येथेच आहे. येथेच निवृत्तीनाथांनी तपश्चर्या केली होती. त्यामुळे वारकरी संप्रदाय येथे मोठ्या भक्तीभावाने येत असतो.