शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: दुबई , शुक्रवार, 20 नोव्हेंबर 2020 (16:01 IST)

2022 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत महिला क्रिकेटचा समावेश

इंग्लंडशिवाय आयसीसी रँकिंगमध्ये पहिल्या सहा स्थानावर असलेले संघ थेट पात्र
 
क्वालालम्पूर येथे 1998 साली झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पुरुष क्रिकेटचा समावेश केल्यानंतर आता 2022 च्या बर्मीघम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या टी-20 प्रकारासाठी महिला क्रिकेटचा समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
 
यजमान इंग्लंडशिवाय आयसीसी रँकिंगमध्ये पहिल्या सहा स्थानावर असलेले संघ या स्पर्धेसाठी थेट पात्र ठरतील. उर्वरित एका संघाचा निर्णय पात्रता स्पर्धेच्या आधारे होईल. 28 जुलै ते 8 ऑगस्ट या कालावधीत बर्मीघम येथे स्पर्धेचे आयोजन होणार असून क्रिकेटचे आयोजन एजबस्टन मैदानावर होईल.
 
चार वर्षांत एकदा होणार्याद या स्पर्धेसाठी आयसीसी आणि सीजीएफने पात्रता प्रक्रिया जाहीर केली. स्पर्धेत आठ संघांचा समावेश असून यजमान इंग्लंडशिवाय यंदा एक एप्रिलपर्यंत आयसीसी क्रमवारीत पहिल्या सहा स्थानांवर असलेल्या अन्य संघांना थेट प्रवेश मिळेल. भारतीय संघ आयसीसी क्रमवारीत तिसर्या स्थानावर आहे.
 
स्पर्धेच्या आठव्या संघाचा निर्णय पात्रता फेरीद्वारे होईल. 31 जानेवारी 2022 पर्यंत पात्रता फेरीचा विजेता घोषित होणे अनिवार्य असेल. पात्रता फेरीचे वेळापत्रक नंतर जाहीर केले जाईल. आयसीसीचे सीईओ मनू साहनी यांनी राष्ट्रकुलमध्ये क्रिकेटचा समावेश ही आमच्यासाठी आनंददायी बाब असल्याचे म्हटले आहे. महिला क्रिकेटची लोकप्रियता झपाट्याने वाढत असून जागतिक स्तरावर याचा प्रसार करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत, असे साहनी म्हणाले. भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर म्हणाली, राष्ट्रकुलमध्ये क्रिकेटचा समावेश ही महिला खेळाडूंसाठी पर्वणी आहे. सर्व खेळाडू आणि खेळासाठी हे मोठे व्यासपीठ ठरेल. मी या स्पर्धेत नक्की खेळू शकेन, अशी आशा आहे. या स्पर्धेतील सामने शानदार होतील, यात शंका नाही. मला व्यक्तिश: आनंद झाला आहे.