हरभजनवरील आरोप फेटाळल्याने भारतीय क्रिकेट मंडळाने (बीसीसीआय) घेतलेल्या भूमिकेचा विजय झाला आहे, त्याचबरोबर वर्णद्वेषाविरोधातील भारताच्या आतापर्यंतच्या लढ्यावर लागलेला डागही निघून गेला आहे. पण त्याचवेळी खोटे बोलून तेच रेटून नेणाऱ्या ऑस्ट्रेलियन खेळाडूंचा खोटारडेपणाही उघडा पडला आहे. हरभजनला झालेला मॅच फीचा दंड हा शेरेबाजीबद्दल झाला असला तरी आता ऑस्ट्रेलियन खेळाडू जी शेरेबाजी करतात, त्यानाही आता असाच दंड लागू केला पाहिजे, अशी मागणी झाल्यास नवल नाही. यात हरभजन निर्दोष सुटला याही पेक्षा ऑस्ट्रेलियन खेळाडूंचा खोटारडेपणा उघड झाला ही बाब जास्त महत्त्वाची आहे. अन्यथा न्यायाधीशही आम्हीच आणि साक्षीदारही आम्हीच आणि आम्ही देऊ तो न्याय असे मानणाऱ्या ऑस्ट्रेलियाला चांगलीच चपराक बसली आहे.
दुसरी कसोटी वादग्रस्त या साऱ्याची सुरवात दुसऱ्या कसोटीत झाली. दुसऱ्या कसोटीत चांगला खेळणाऱ्या हरभजनचे लक्ष अँड्र्यू सायमंड्सने काही तरी करून विचलित केले. त्यामुळे चिडलेला हरभजन त्याला काही तरी बोलला. पण कागारूंचा कुटील नीतीत माहीर असलेला कर्णधार रिकी पॉंटीगने भारतीयांचे मनोधैर्य खच्ची करण्याची ही संधी साधली. त्याने याची तक्रार सामनाधिकाऱ्यांकडे केली. या तक्रारीत हरभजनने वर्णद्वेषी शेरेबाजी केल्याचे त्याने म्हटले. हरभजनने केलेल्या शेरेबाजासाठी कुठलाही तटस्थ साक्षीदार न शोधता आपण व स्टुअर्ट क्लार्क याचे साक्षीदार असल्याचे त्याने सांगितले. थोडक्यात काय तर उंदराला मांजर साक्षी. त्याचवेळी खेळपट्टीवर असलेल्या सचिन तेंडूलकरने हरभजनने काहीही वर्णद्वेषी शेरेबाजी केली नसल्याचे निक्षून सांगितले. पण भारतविरोधाने आंधळे झालेले सामनाधिकारी माईक प्रॉक्टर यांना काहीही ऐकू आले नाही. त्यांनी धडकपणे निर्णय घेऊन हरभजनविरोधात तीन सामन्यांची बंदी घातली.
भारतीय खवळले यानंतर मात्र, भारतीयांच्या संतापाचा कडेलोट झाला. वर्णद्वेषाचा आरोप आणि वर तीन सामन्यांची बंदी. हे सहन होण्यासारखेच नव्हते. इकडे भारतात याची तीव्र प्रतिक्रिया उमटली. लोकांनी आयसीसीच्या विरोधात निदर्शने केली. त्याची धग ऑस्ट्रेलियात असलेल्या भारतीय संघालाही बसली आणि तेही आक्रमक झाले. त्यांनीही हरभजनविरोधातील आरोप मागे न घेतल्यास दौऱ्यावर बहिष्कार घालण्याचा इशारा दिला. हे होत असताना सुस्त झोपलेले बीसीसीआयही जागे झाले. त्यांनीही मग शड्डू ठोकत आयसीसीला आव्हान दिले. हरभनजवर बंदी घातल्यास आम्ही दौऱ्यावर बहिष्कार घालू असे त्यांनी सांगितले.
आयसीसीला धोक्याची जाणीव बीसीसीआयने आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर मग आयसीसी खड़बडून जागी झाली. कारण जगातील सर्वांत श्रीमंत क्रिकेट संघटना असलेल्या बीसीसीआयला दुखवून चालणार नाही, याची जाणीव त्यांनाही झाली. त्यानंतर मग या आरोपांच्या चौकशीसाठी न्यूझीलंडचे न्यायाधीश जॉन हेसन यांच्या नेतृत्वाखाली एक समिती नेमण्यात आली. तिच्यासमोर या प्रकरणाची सुनावणी करण्याचे ठऱले. तोपर्यंत बीसीसीआयचे दबाव सुरूच होता. दरम्यानच्या काळात समिती नियुक्त झाल्याने भारतीय संघ तिसऱ्या कसोटीत सहभागी झाला. पण आरोप पूर्णपणे मागे घेतल्याशिवाय तिरंगी मालिका खेळणार नाही, यावर बीसीसीआय ठाम होते.
शेवटपर्यंत कट कारस्थाने या प्रकरणाची मंगळवारी सुनावणी होणार होती. त्याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. पण या सुनावणीत स्टंपमध्ये बसविण्यात आलेला मायक्रोफोनचा पुरावा ग्राह्य धरला जाणार असल्याचे आयसीसीतर्फे जाहीर करण्यात आल्यानंतर पुन्हा एकदा संतापाची लाट उसळली. आरोप घडल्यानंतर सर्व साक्षीपुरावे झाल्यानंतर पंधरा दिवसांनी मायक्रोफोन हा पुरावा कसा काय होऊ शकतो, असा सवाल करून बीसीसीआयने हा पुरावा ग्राह्य धरू नये असे स्पष्ट केले.
या सगळ्या घडामोडीतच अखेर मंगळवारी सुनावणी झाली. पण सायमंड्स हरभजनविरोधात केलेले आरोप सिद्ध करू शकला नाही. रिकी पॉंटींग आणि मंडळींचे कारस्थान अखेर त्यांच्याच अंगलट आले. न्यायाधीश जॉन हेसन यांनी हरभजनला वर्णद्वेषाच्या आरोपातून निर्दोष मुक्त करत त्याच्यावर घातलेली तीन सामन्यांची बंदीही उठवली. फक्त शेरेबाजी केल्याबद्दल मानधनातून पन्नास टक्के रक्कम कापण्याचा दंड तेवढा केला.
या प्रकरणातून भारताला मनस्ताप पुष्कळ झाला असला तरी सामूहिक दबावातून आयसीसीसारख्या बलाढ्य संघटनेलाही झुकवता येते, हे बीसीसीआयने दाखवून दिले. शिवाय साऱ्या जगाला सहिष्णुतेची, सौहार्दाची शिकवण देणाऱ्या देशातील लोक वर्णद्वेषी शेरेबाजी करत नाहीत, उलट ज्यांची परंपराच ती आहे, तेच लोक असले उद्योग करतात, हेही स्पष्ट झाले. आता पाळी ऑस्ट्रेलियाची आहे. क्रिकेट जगतात शेरेबाजी हा प्रकार ऑस्ट्रेलियाने रूजविला. त्याला खतपाणीही घातले. आता त्यांनी यानंतर कधी शेरेबाजी केल्यास त्यांना शिक्षा केली जाईल का हा प्रश्न आहे.
हरभजनवरील वर्णद्वेषाचा आरोप मागे
|