गुड फ्रायडे म्हणजे ज्या दिवशी येशू ख्रिस्तांना सुळावर देण्यात आले होते. आजही अनेक ठिकाणी प्रतीकात्मकरीत्या सुळावर देण्याची प्रथा दाखवली जाते.
असं म्हटलं जातं येशू ख्रिस्तांना सुळावर दिल्यानंतर जगाला या क्रूर प्रथेबद्दलची माहिती तीव्र वेगाने झाली पण येशू ख्रिस्तांच्या आधी देखील अनेक जणांना सुळावर चढवण्यात आले होते. त्यांच्या जन्माच्या काही शतकं आधी ही प्रथा सुरू होती असं म्हटलं जातं. या विषयी अधिक समजून घेण्यासाठी बीबीसी न्यूज मुंडोने युनिव्हर्सिटी ऑफ फ्री स्टेटचे रिसर्च फेलो आणि लेखक सिलियर्स यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी सांगितले की प्राचीन काळ मृत्यू देण्याचे तीन अतिशय निर्घृण प्रकारे होते त्यात सुळावर लटकवणे हे सर्वांत भयंकर मानले जात असे. इतर दोन प्रकार होते ते म्हणेज जाळून मारणे आणि मुंडके छाटणे. स्पेनच्या नवारा युनिव्हर्सिटीतील धर्मशास्त्राचे सहाय्यक प्राध्यापक डिएगो पेरेज गोंडार सांगतात की लोकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण करण्यासाठी क्रौर्य आणि त्याच्या प्रदर्शनाचा हा एक संयुक्त प्रकार होता. कित्येक वेळा तर पीडित व्यक्तीचा मृत्यू सुळीवर चढवण्यात आल्याच्या अनेक दिवसांनी होत असे. सुळावर लटकवण्यात आलेल्या व्यक्तीचा मृत्यू शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होणे, रक्त किंवा पाण्याची कमी होणे, किंवा एक एक अवय निकामी होणे यामुळे होत असे.
येशू ख्रिस्तांच्या 500 वर्षांआधीपासून सुरू होती ही शिक्षा
डॉ. सिलियर्स यांचं म्हणणं आहे की सुळावर चढवण्याची प्रथा असेरिया आणि बेबिलॉन या ठिकाणी सुरू झाली असावी. या दोन पुरानत संस्कृतीचं नातं आजच्या पश्चिम आशियाशी आहे. त्यांचं म्हणणं आहे की अशा प्रकारची शिक्षा देण्याची प्रथा ही इ. पू. सहाव्या शतकात पर्शियात सुरू असावी. प्रा. पेरेज सांगतात की याबाबतचे सर्वांत जुने पुरावे हे असेरियन लोकांच्या महलांवर असलेल्या चित्रातून मिळतात. सुळावर देण्याचे चित्रे रेखाटलेली आपल्याला दिसतात. 2003 मध्ये सिलियर्स यांनी साउथ अफ्रिकन मेडिकल जर्नलमध्ये एक लेख प्रकाशित केला होता. त्यात सुळावर देण्याबाबतचा इतिहास सांगण्यात आला होता. त्यांनी त्यात हे सांगितले होते की पर्शियात लोकांना क्रॉस ऐवजी झाडं किंवा स्तंभावर लटकवले जात असे. पेरेज यांच्यामते, गुन्हेगाराला किंवा दोषीचा अपमान करणे त्याचबरोबर त्याला अत्यंत क्रूर शिक्षा देण्यासाठी या प्रकारचा प्रयोग केला जात असे. त्यामुळे झाडाला लटकावून एखाद्या व्यक्तीचा दम कोंडून मृत्यू होत असे किंवा ती व्यक्ती थकव्याने मृत्युमुखी पडत असे.
ही शिक्षा इतर ठिकाणी कशी पोहोचली
ई. पू. चौथ्या शतकात अलेक्झांडरने भूमध्यसागराच्या पूर्वेकडील देशांमध्ये या शिक्षेचा वापर केला होता. सिलियर्स सांगतात की अलेक्झांडर आणि त्याच्या सैनिकांना सोर ( आजचे लेबनॉन) ला चहूबाजूंने घेरले. हे शहर एखाद्या अभेद्य किल्ल्याप्रमाणे होते. ते हाती आल्यावर अलेक्झांडरने अंदाजे 2000 नागरिकांना सुळावर लटकवले होते. अलेक्झांडरच्या उत्तराधिकाऱ्यांनी इजिप्त आणि सीरियाबरोबरच फोनिशिया द्वारे स्थापन आणि उत्तर आफ्रिकेत स्थित असलेल्या कार्थेज शहरातील अनेकांना सुळावर चढवले होते. सिलियर्स यांच्यानुसार पुनिक यांच्या लढाई दरम्यान (264-146 ई. पू. ) रोमन लोकांना या प्रकारची ओळख झाली आणि त्यांनी पुढील 500 वर्षं ही प्रथा सुरू ठेवली. ते पुढे सांगतात रोमचे योद्धे जिथेही गेले तिथे त्यांनी सुळावर चढवण्याची शिक्षा दिली. त्याच वेळी असे देखील घडले ज्या-ज्या ठिकाणी त्यांनी ही शिक्षा दिली त्यानंतर आलेल्या राज्यकर्त्यांनी देखील ही प्रथा पाहून पुढे सुरू ठेवली. इ. स. 9 मध्ये जर्मनीचा जनरल आर्मिनियसने ट्युटोबर्ग फॉरेस्ट लढाईत विजय मिळवल्यानंतर रोमच्या सैनिकांना सुळावर चढवण्यात यावे असे आदेश दिले होते.
इ. स. 60 मध्ये इकेनी नावाच्या ब्रिटिश जनजातीच्या समुदायातील राणी बौदिकाकाने हल्लेखोर रोमन लोकांविरोधात झालेल्या उठावाचे नेतृत्व केले होते. त्यांनी रोमच्या अनेक सेनापतींना सुळावर चढवले होते.
पवित्र भूमी
पुरातन इस्रायलमध्ये रोम लोकांच्या आगमनापूर्वीपासूनच ही शिक्षा दिली जात असे. प्रा. पेरेज सांगतात की आमच्याकडे अशी साधनं आहेत ज्यामुळे हे समजतं की या पवित्र भूमीवर रोम लोकांच्या आगमनाआधीपासूनच ही शिक्षा दिली जात असल्याचे पुरावे आहेत. असं मानणाऱ्यांपैकी रोमन-ज्यू इतिहासकार, नेते आणि सैनिक फ्लेवियस जोसेफ्स यांचा देखील समावेश होतो. त्यांचा जन्म पहिल्या शतकात जेरुसलेम या ठिकाणी झाला होता.
अलेक्झांडर जैनियस (125 ई पू-76 ई पू) च्या शासन काळात इ. पू. 88 मध्ये अंदाजे 800 लोकांना सुळावर चढवण्यात आल्याची नोंद आहे. सिलियर्स सांगतात सुळावर चढवण्याच्या शिक्षेची अंमलबजावणी करण्यासाठी विविध प्रकारचे क्रॉस वापरण्याची प्रथा रोमन लोकांनीच सुरू केले. अशा क्रॉस पैकी एक क्रॉस हा एक्स ( x) आकाराचा देखील होता. ते सांगतात बहुतांश वेळा लॅटिन क्रॉस किंवा टी आकाराच्या क्रॉसचा वापर केला जात असे. हे क्रॉस उंच देखील करता येत असत पण कमी उंचीचेच क्रॉस अधिक प्रचलित होते. मृत्यूची शिक्षा ज्या व्यक्तीला ठोठावली आहे त्याला क्रॉसच्या टोकावर चढवले जात असे. जर ती व्यक्ती नग्न नसेल तर त्या व्यक्तीला नग्न केलं जात असे आणि हाथ खेचून पाठीवर झोपवलं जात असे.
पुढे ते सांगतात की त्यानंतर हाथांना एका दोरीने करकचून बांधले जात असे आणि नंतर मनगटात खिळे ठोकले जात. पीडित व्यक्तीच्या तळव्यांवर खिळे ठोकले जात नव्हते. कारण शरीराचे वजन तळव्यांवर सांभाळले गेले नसते, त्यामुळे मनगट किंवा हाताच्या इतर भागात हे खिळे ठोकले जात असत. हे खिळे 18 सेमी लांब आणि 1 सेमी रुंद असत. ज्या व्यक्तीला शिक्षा ठोठावली आहे त्या व्यक्तीला क्रॉससकट नंतर टोकापासून वर उचलले जात असे आणि मग ते एका खांबाच्या आधाराने उभे केले जात. हा खांब आधीपासूनच जमिनीत गाडलेला असे. पायांना देखील क्रॉसच्या खालील भागाला बांधले जात असे आणि त्यात खिळे ठोकले जात असत. या शिक्षेतून होणाऱ्या त्रासाची कल्पना करणे देखील मानवी कल्पनाशक्तीच्या पुढे आहे. प्रा.पॅरेज सांगतात की यामुळे शरीरातील अनेक नसांवर प्रभाव पडत असे. श्वास घेण्यासाठी किंवा थोडा आधार घेण्यासाठी पायांवर अवलंबून राहावे लागत असे. त्यातून अनेकांना खूप जास्त रक्तस्रावाचा सामना करावा लागत असे. यामुळे खूप त्रास होत असे. पण जर त्याने पायांचा आधार घेतला नाहीतर श्वास कोंडून ती व्यक्ती मृत्युमुखी पडत असे.
अनेकांसाठी तर हे संथगतीने मरण ठरत असे. यात त्या लोकांच्या शरीरातील एक एक अवयव निकामी होत आणि नंतर मृत्यू होत असे. सिलियर्स सांगतात बहुतांश लोकांचा मृत्यू सारखाच असे. श्वास कोंडून, अतिरक्तस्राव किंवा शरीरातील पाणी संपणे, यामुळे शरीरातील अवयव निकामी होत जातात आणि मृत्यू येतो. ही शिक्षा अधिक निर्घृण होण्याचे कारण म्हणजे सुळावर चढवल्यानंतर अनेक दिवसांनी त्या व्यक्तीचा मृत्यू होत असे. काही लोकांचा मृत्यू लवकर होत असे. बायबलमध्ये म्हटलं आहे की येशू ख्रिस्त हे सुळावर चढवण्यात आल्यानंतर सहा तास जिवंत होते. प्रो. पॅरेज सांगतात की काही प्रकरणात लवकर मृत्यू व्हावा म्हणून गुडघ्यांवर वार करून ते तोडले जात. सुळावर चढवण्यात आलेल्या व्यक्तीला श्वास घेण्यासाठी आपल्या पायांचा वापर करता येत नसे आणि त्यात त्या व्यक्तीचा मृत्यू होऊन जात असे बायबलमध्ये असं सांगण्यात आलं आहे की येशू ख्रिस्तांच्या बाजूला असलेल्या दोन व्यक्तींचे पाय तोडले होते. येशू ख्रिस्तांसोबत असं काही झालं नव्हतं त्यांचा त्या आधीच मृत्यू झाला होता. रोमन सम्राट कॉन्सटेंटाइनने चौथ्या शतकात ही क्रूर प्रथा बंद केली आणि ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केला. असं करणारे ते पहिले सम्राट ठरले. त्यांनी धर्माला कायद्याच्या चौकटीत आणले. त्यांनी त्यांच्या अनुयायांना ते विशेषाधिकार बहाल केले जे त्यांच्या आधीच्या धर्मांनी हिरावून घेतले होते. त्यानंतर रोमन साम्राज्यात ख्रिश्चन धर्म पसरला. ही प्रथा बंद झाल्याच्या अनेक वर्षांनी ही शिक्षा देण्यात आल्याची काही उदाहरणं आहेत. 1597मध्ये जपानने 26 ख्रिस्ती मशिनरींना सुळावर चढवले होतेय सुळावर चढवण्याच्या प्रथेचा असा भयंकर इतिहास आहे पण मानवतेसाठी, प्रेमासाठी येशू ख्रिस्तांनी हे बलिदान दिले त्याचे आज क्रॉस हे प्रतीक बनला आहे.
Published By- Dhanashri Naik