शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. »
  3. ख्रिश्चन
  4. »
  5. ख्रिश्चन धर्माविषयी
Written By सॉ. अर्चना गजेंद्र भटूरकर|

प्रेमाचा संदेश देणारा ख्रिश्र्चन धर्म

ख्रिश्र्चन धर्म हा जगात सर्वांत मोठा धर्म आहे. या धर्माला मानणाऱयांची संख्या जगभरात दोनशे कोटींच्या घरात आहे. साठ लाख लोक सक्रियपणे या धर्माचा प्रचार करत आहेत. ख्रिश्र्चन धर्म एकेश्र्वरवादी (एक देवाला माननारा) आहे.

येशू खिस्त हे या धर्माचे संस्थापक असून येशूला देवाचा दूत मानले जाते. येशूच्या उपदेशांवर हा धर्म आधारीत आहे. बायबल हा त्यांचा धर्मगंथ आहे. दर दोन सेकंदाला जगात कोठेना कोठे बायबलची एक प्रत विकली जाते, एवढा या धर्माचा प्रसार व पगडा आहे.

येशू ख्रिस्ताचा जन्म सध्याच्या इस्त्रायलमधील बेथेलहॅम या गावी झाला. त्याची आईचे नाव होते मेरी. येशू मोठा झाल्यानंतर लोकांना प्रेमाचा संदेश देऊ लागला. त्याची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढू लागली. लोक त्याला देवाचा दूत मानत व त्याचे म्हणणे ऐकत.

यामुळे तेव्हाच्या धर्मगुरूंना त्याचा छळ सुरू केला. अखेरीस या छळाने अंतिम टोक गाठले. आणि येशूला क्रूसावर चढविण्यात आले. त्याच्या हातापायांना खिळे ठोकले. त्यातच त्याचा मृत्यू झाला. मात्र, असे मानले जाते की त्यानंतर तीन दिवसांनी त्याचा पुनर्जन्म झाला.

त्याने केलेला उपदेश नंतर त्याच्या शिष्यांनी बायबलमध्ये लिहून काढली. व त्याच बायबलला नंतर धर्मग्रंथ मानले जाऊ लागले. ख्रिश्र्चन धर्म एकेश्र्वरवादी असला तरी देवाची तीन रूपे आहेत असे मानतात.

1. परमपिता परमेश्र्वर
2. त्यांचा मुलगा येशू व
3. पवित्र आत्मा. परम पिता परमेश्र्वर यांनी या विश्र्वाची निर्मिती केली असे मानले जाते.

बायबलचे दोन भाग आहेत. जुना करार (ओल्ड टेस्टॅमेट) व नवा करार ( न्यू टेस्टॅमेट). जुन्या करारात पूर्वीच्या धर्मगुरूंनी लिहिलेले उपदेश आहेत, तर नव्या करारात येशूने केलेला उपदेश, त्यावेळच्या घटना, त्यांच्या शिष्यांबद्दल लिहिले आहे. ख्रिश्चन धर्मिय प्रार्थनेसाठी चर्चमध्ये जातात. नाताळ व इस्टर हे त्यांचे प्रमुख सण आहेत.

खिश्चन धर्मात ‍तीन प्रकार आहेत.

1. रोमन कॅथॉलिक (जे पोपला आपला धर्मगुरू मानतात.)
2. प्रोटेस्टंट (जे पोपला न मानता बायबलवर विश्वास ठेवतात.)
3. ऑर्थोडॉक्स (जे आपापल्या राष्ट्रीय धर्मगुरूला मानतात.)