शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. अधिकमास
Written By

अधिकमास माहात्म्य अध्याय विसावा

श्रीगणेशाय नमः ॥ जयजयाजी सद्‌गुरुमूर्ती ॥ अनुपम्य तुझी अगाध कीर्ति ॥ चुकवी जन्ममरणांती ॥ हे ख्याती अनुपम्य ॥ १ ॥
भावार्थ पाहिजे निका ॥ व्यर्थ नको हे लापणिका ॥ जेवी गंगा मनकर्णिका ॥ क्षय करी पापातें ॥ २ ॥
जेवी अग्नि स्फुलिंग पाही ॥ भस्म करी सर्व तृणवळई ॥ तैसा सद्‍गुरु मंत्र पाहीं ॥ भस्म होई पापसमूहो ॥ ३ ॥
असो ऐसे जे सद्‌गुरु ॥ तया माझा नमस्कारु ॥ शिरीं ठेवा वरद करु ॥ जेणें भवपारु होय माझा ॥ ४ ॥
आतां ऐका भाविकजन ॥ कथेसीं द्यावें अवधान ॥ येथींचे ग्राहिक कोणकोण ॥ त्यांचें श्रवण करावें ॥ ५ ॥
येर अभाविका चाड नाहीं ॥ व्यर्थ न पडावें प्रवाहीं ॥ जें जें असेल जयाचे दैवीं ॥ तेची नवाई भोगूत ॥ ६ ॥
तोची भावार्थ निका ॥ प्राकृत भाषेंत टीका ॥ भावार्थ बळें ऐकां ॥ म्हणे दासानुदास ॥ ७ ॥
श्रीकृष्ण उवाच ॥ भूय एव प्रवक्ष्यामि श्रुणु सर्वांगसुंदरि ॥ मलिम्लुचकृतं स्नानं फलमद्‍भुतकारणं ॥ १ ॥
सौराष्ट्रे सुजने देशे वृक्षछाया विवर्जिते ॥ खेटखर्वट संयुक्ते श्वखरौघसमन्विते ॥ २ ॥
विष्णू वदे लक्ष्मीतें ॥ मलमहात्म अति अद्‍भुत ॥ जें सुखदायक सर्वांतें ॥ श्रवण करी यथार्थ ॥ ८ ॥
सौराष्ट्र देशाचिये ठायीं ॥ जाली असे अपूर्व नवाई ॥ तेची कथा तूंतें सर्वही ॥ ऐक एकाग्र ते शुभानने ॥ ९ ॥
तो देश परम कंटक ॥ कोठें वृक्ष न मिळे एक ॥ छाया नाहींच कोठे देख ॥ बैसावया पांथस्था ॥ १० ॥
वस्तीसी ग्राम न मिळे सर्वथा ॥ तेथें पक्षी श्वापदांची कोण वार्ता ॥ ऋषि समुदावो पाहातां ॥ तोचि तत्वता न दिसे ॥ ११ ॥
ऐसा तो देश कुलक्षण ॥ तेथील एक नगर विस्तीर्ण ॥ नाम तयाचें प्रभास पूर्ण ॥ चर्या संपूर्ण रविसम ॥ १२ ॥
प्राकार गोपुरें परिपूर्ण ॥ स्वधर्माचारें सकळजन ॥ वर्णाश्रम धर्मचारी वर्ण ॥ शास्त्राधारें वर्तती ॥ १३ ॥
राजा तेथील परम धर्मिष्ट ॥ आडकाठी नाहीं कोठे ॥ उदारपणें अतिधारिष्टे ॥ पुरवी मनोरथ याचकाचे ॥ १४ ॥
ब्राह्मण सदाचारें वर्तती ॥ सदां वेदाध्ययन करिताती ॥ नित्य नैमित्य साधिती ॥ सदां करिती वेदघोष ॥ १५ ॥
जपतप होमहवन ॥ मंत्रतंत्र प्रातःस्नान ॥ सदां आचरतां ब्राह्मण ॥ वेदसंपन्न सदाचारी ॥ १६ ॥
जनसारिती प्रातःस्नान ॥ तेणे म्हणविती ब्राह्मण ॥ स्नान करी तोंवरी जाण ॥ शुद्ध ऐसें जाण शास्त्र वदे ॥ १७ ॥
स्नानाविणें वर्तती विप्र ॥ कोणी न पाहाती त्यांचें वक्त्र ॥ म्हणती भेटला अपवित्र ॥ म्हणोनी फिरती माघारे ॥ १८ ॥
यालागीं नेमें करूनी ॥ नित्यनेमें प्रवर्तावें प्रातःस्नानीं ॥ ऐसें पुण्य करितां जनीं ॥ ते पुण्यनिदानीं कामाये ॥ १९ ॥
ऐसे शुचिर्भूत ब्राह्मण ॥ नित्य करिती प्रातःस्नान ॥ करूनियां पंचमहायज्ञ ॥ अतिथी सन्मान समयासी ॥ २० ॥
ऐसे तया नगराचे भूदेव ॥ मिळोन सकळ समुदाव ॥ मलमास लक्षुन पाहाहो ॥ चालिला समुदावो स्नानातें ॥ २१ ॥
नित्य गंगातिरीं पाहीं ॥ जाती नरनारी सर्वही ॥ तीर्थदान जपतप सर्वही ॥ शास्त्राधारें आचरती ॥ २२ ॥
उठोनी पंचपंच उषःकालीं ॥ स्नानें सारिती गंगाजळीं ॥ दानें देताती विप्रमंडळी ॥ अति सुमेळीं विप्रांतें ॥ २३ ॥
कोणी करिती दीपदान ॥ कोणी करिती तांबूलदान ॥ कोणी अर्पिती उपान दान ॥ छत्रदान ब्राह्मणातें ॥ २४ ॥
कोणी कुंभदान करिती ॥ कोणी अपूपान्नें अर्पिती ॥ घृतपात्रासहित देती ॥ विप्राप्रति सुवर्ण ॥ २५ ॥
ऐसी दानें अर्पून विप्रातें ॥ मग स्वगृहीं ब्राह्मण पंक्तीतें ॥ घेऊन षड्रस अन्नातें ॥ देती विप्रातें भोजन ॥ २६ ॥
ऐसा सारितां नित्य नेमास ॥ संपूर्ण होऊं सरला मास ॥ तव अपूर्व वर्तलें तया समयास ॥ ते सावकाश अवधारा ॥ २७ ॥
सोमशर्मा नामे एक ब्राह्मण ॥ असे तो वेदशास्त्रसंपन्न ॥ नाना तीर्थी तपदान ॥ केलें संपूर्ण ब्राह्मणें तें ॥ २८ ॥
यज्ञदानादि क्रिया सर्वही ॥ जाणता विप्र तो प्रत्यही ॥ स्नानातें जातां एके समयीं ॥ गंगातीरी पावला तो ॥ २९ ॥
मार्गी जातां स्नानासी ॥ तंव एक राक्षस त्यासी ॥ भेटता जाला वाटेसी ॥ अति भयंकर रूपें ॥ ३० ॥
अक्राळ विक्राळ दीर्घ वदन ॥ लंब बाहो विशाळ नयन ॥ धूम्राकार जटापूर्ण ॥ आरक्तवर्ण ओष्ठ पैं ॥ ३१ ॥
स्थूलोदर गर्तेसमान ॥ उंच ग्रीवा हस्तासमान ॥ लिंग त्याचें लंबायमान ॥ सदां नग्न ब्रह्मचारी ॥ ३२ ॥
शुभ्र लव अंगावरुते ॥ तेंही लंबायमान कंटक ते ॥ ऐसें देखून तयातें ॥ विप्र दचकला मानसीं ॥ ३३ ॥
म्हणे हें विघ्न केऊतें आलें ॥ मज भोवतें उभे ठेलें ॥ स्नानालागीं आडवें ठाकलें ॥ पूर्वकर्म माझे आतां ॥ ३४ ॥
मग ह्रदयीं स्मरोन भगवान् ॥ नारसिंह मंत्र जपे ब्राह्मण ॥ तेणें भीती गेली निघोन ॥ मग बोले वचन तयासीं ॥ ३५ ॥
आधींच ब्राह्मण दैदीप्यमान ॥ वरी शुचिर्भूत संध्यास्नान ॥ त्यावरी नारसिंह जप पूर्ण ॥ जपे ब्राह्मण आदरें ॥ ३६ ॥
ऐसा विप्र अग्निवत ॥ राक्षस पाहूनि भीत ॥ म्हणे हातो न भिये किंचित ॥ मी तंव क्षुधित पातलों ॥ ३७ ॥
मग म्हणे हो द्विजवर्या ॥ साधु ह्रदय सकोमळ सदया ॥ मी तंव पापिष्ट क्रूर ह्रदया ॥ करी दया दीनबंधो ॥ ३८ ॥
नाना जीव हिंसाधारी ॥ नाना जीव वधिले अघोरी ॥ पाप भोगिलें नानापरी ॥ राक्षस देहधारी पै मी ॥ ३९ ॥
ऐकून तयाचें करुण उत्तर ॥ द्रवलें तेव्हां विप्र अंतर ॥ कोमळ ह्रदय द्विजवर ॥ नवनीता परि असे ॥ ४० ॥
जयाचे ह्रदयीं नाहीं कोमळता ॥ तो विप्रदेह नव्हे तत्वता ॥ असो द्विज राक्षस पाहतां ॥ जाला बोलता पैं त्यासी ॥ ४१ ॥
म्हणे तूं पूर्वी होतास कोण ॥ कोण्या पापास्तव हा देह जाण ॥ प्राप्त जाला तुजलागून ॥ तें करीं श्रवण सर्वही ॥ ४२ ॥
मग राक्षस म्हणे विप्रातें ॥ ऐक माझियां वृत्तांतातें ॥ मी पूर्वी वैश्य धनवंत ॥ असे विख्यात भूमंडळीं ॥ ४३ ॥
नाना वस्तूंचा रक्षक जाण ॥ क्रयविक्रय करीं पूर्ण ॥ गृहीं संपत्तीस नसे न्यून ॥ पुत्रसुना परिवार ॥ ४४ ॥
गाईम्हशी खिल्लारें अपार ॥ हस्ती वाजी शकट थोर ॥ दासदासी अपार ॥ ऐसा परिवार अपरिमित ॥ ४५ ॥
तंव एक अग्निहोत्री ब्राह्मण ॥ सहकुटुंबी सत्पात्र जाण ॥ वेदाध्यायीं असे निपुण ॥ परिपूर्ण धनेसीं ॥ ४६ ॥
तंव तो विप्र शिरोमणी ॥ चालिला महायात्रा लागुनी ॥ तयानें द्रव्य घट भरूनि ॥ ठेविला आणूनी गृहीं माझ्या ॥ ४७ ॥
सुवर्ण नाणें दहा सहस्र जाण ॥ द्रव्य घट भरिला परिपूर्ण ॥ मजपुढे ठेविला आणून ॥ गेला ब्राह्मण वाराणसी ॥ ४८ ॥
सहकुटुंबेसीं विप्र गेला ॥ तिकडेची द्वादश वर्षे त्याला ॥ यात्रा करितां दिवस गेला ॥ तों इकडे स्मरण मजला झालें ॥ ४९ ॥
काहीं कार्या निमित्य तयाचें ॥ मी द्रव्य घट खर्चिला साचें ॥ तो विप्र यात्रा करून साचें ॥ परतोनि आला माघारी ॥ ५० ॥
यात्रा करून संपूर्ण ॥ द्रव्य घट मागे मजलागुन ॥ तंव अडचणीस्तव जाण ॥ नाहीं म्हणोन बोलिलों मी ॥ ५१ ॥
तूं द्रव्य आणून ठेविलें कधी ॥ यातें साक्ष कोणती दावीं आधीं ॥ आमुचें घर घेतो हा मंदबुद्धी ॥ मिळाली मांदी जनाची ॥ ५२ ॥
वेव्हारी गेला राजद्वारीं ॥ जो तो ब्राह्मणातें धिक्कारी ॥ म्हणती हा जन्मदरिद्री ॥ द्रव्य कैचें पदरी याच्या ॥ ५३ ॥
ऐसा न्याय तेथें जाला ॥ द्रव्य घट म्यां अभिलाषिला ॥ देखत देखत ग्रासिला ॥ पातक गोळा धन लोभे ॥ ५४ ॥
मग तो विप्र तळमळत गेला ॥ तळतळोनी मज शाप दिधला ॥ म्हणे पापिष्टा चांडाळा ॥ अभिलाषिला द्रव्य घट ॥ ५५ ॥
पृथ्वी तेज वायु आकाश ॥ तुज मज साक्ष आहे चंडांश ॥ तरी शाप घेई निःशेष ॥ होई ब्रह्म राक्षस पै आतां ॥ ५६ ॥
माझें वचन असत्य होईल ॥ तरीं माझी यात्रा निर्फळ हो सकळ ॥ ऐसा बोलिला करून तळमळ ॥ विप्रें प्राण त्यागिला ॥ ५७ ॥
धनलोभें मेला द्विजवर ॥ मी राक्षस जालों साचार ॥ ऐसा माझा प्रकार ॥ जाला साचार द्विजवरा ॥ ५८ ॥
परक्याचे द्रव्य अभिलाषिलें ॥ तें आप्तवर्ग खाऊन गेलें ॥ शेवटीं मज व्यसन प्राप्त झालें ॥ भोगणें लागलें दैत्यदशे ॥ ५९ ॥
यालागीं दुसर्‍याचें अभिलाषितां ॥ सौख्य नाहीं तत्वतां ॥ शेवटीं भोगणें लागे अवस्था ॥ न सुटे सर्वथा निर्धारें ॥ ६० ॥
आतां प्रार्थना ऐका ॥ परोपकार करी निका ॥ मज धाडी परलोका ॥ तारक नौका तूं होई ॥ ६१ ॥
ऐसें म्हणतां ते क्षणी ॥ द्विज बोले प्रसादवाणी ॥ म्हणे मलमास स्नानदानीं ॥ मास एक नेम केला ॥ ६२ ॥
तया मी सप्तदिनाचें ॥ उदक तूं तें अर्पितों साचें ॥ तें पुण्य प्राप्त होईल नेमाचें ॥ घडो त्याचें फळ तुजलागीं ॥ ६३ ॥
ऐसें वदोन तये वेळीं ॥ उदक भरलेंसे अंजुळीं ॥ म्हणे तुज सुफळी हो तात्काळीं ॥ होऊ उद्धार ये वेळीं ॥ ६४ ॥
वदोन घातलें उदक ॥ तंव नवल वर्तले एक ॥ विमान आलें तात्काळीक ॥ अति लखलखीत तेजस्वी ॥ ६५ ॥
माजी बैसले विष्णुदूत पाहीं ॥ राक्षस केला दिव्यदेही ॥ तात्काळ विमानीं बैसविला तोही ॥ उद्धरोनि नेला वैकुंठा ॥ ६६ ॥
तंव तो राक्षस जाणा ॥ स्तविता जाला विप्रराणा ॥ वारंवार लागे चरणा ॥ केली उद्धरणा दयानिधे ॥ ६७ ॥
जयजयाजी विप्रमूर्ती ॥ अगाध अनुपम्य तुझी कीर्ती ॥ पुण्य वेचून मजप्रती ॥ गुरुमूर्ति उद्धरिले ॥ ६८ ॥
ऐसा स्तुति वाद करूनी ॥ तात्काळ गेला विष्णुभुवनी ॥ ऐसें मलमाहात्म कथनीं ॥ घातले श्रवणी श्रोतियांचे ॥ ६९ ॥
म्हणोन मलमहात्म अगाध थोर ॥ भावें आचरो नारीनर ॥ करा आपुल्या जन्माचा उद्धार ॥ विनवी किंकर संताचा ॥ ७० ॥
स्वस्ति श्रीमलमहात्म ग्रंथ ॥ पद्मपुराणींचे संमत ॥ मनोहरसुत विरचित ॥ विंशतितमोऽध्याय गोड हा ॥ २० ॥
ओव्याः ॥ ७० ॥ श्लोक २ ॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
 
॥ इति विशंतितमोऽध्यायः ॥