शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. अधिकमास
Written By
Last Modified: बुधवार, 16 सप्टेंबर 2020 (10:15 IST)

अधिकमास माहात्म्य अध्याय तेविसावा

श्रीगणेशाय नमः ॥ ऐका श्रोते संतसज्जन मलमहात्म पुण्याख्यान ॥ मागिले प्रसंगीचे निरूपण ॥ धरा आठवण मानसीं ॥ १ ॥
विप्रनंदाची भगिनी ॥ वेश्या गेलीसे घेऊनी ॥ ते वार्ता ऐकूनि कानीं ॥ बंधु शोकसदनीं पडियेला ॥ २ ॥
इतुका वृत्तांत मागें कथिला ॥ याउपरी पाहिजे ऐकिला ॥ अवधान दीजे श्रवणाला ॥ काय करिता जाला विप्रकुमर ॥ ३ ॥
शोक करितां तयातें ॥ नगरवासी सभोंवते ॥ समजावुनि तयातें ॥ गृह गेले आपुलिया ॥ ४ ॥
याउपरी तो विप्रकुमर ॥ नित्य सारीतसे गृहाचार ॥ तक्र विक्रय करून उदर ॥ निज हातें संपादितसे ॥ ५ ॥
तो येरीकडे नारायण ॥ यात्रा क्रमी वर्षे तीन ॥ म्हणे जावें माघारें परतोन ॥ लेंकुरें अज्ञान श्रीगुरूचीं ॥ ६ ॥
गुरुकन्या वेश्येने नेली जाणा ॥ हे वार्ता विदित नाहीं नारायणा ॥ परी अंतरसाक्ष जनार्दना ॥ फिरलें मन नारायणाचें ॥ ७ ॥
म्हणे गुरुगृहीं जावें आतां ॥ कवण तेथें सुखाची वार्ता ॥ हे तो सांगोन गेली देवता ॥ यक्षिणीदेवी पूर्वीच ॥ ८ ॥
एके तक्र विक्रय करावा ॥ एका जारत्वें निर्वाह व्हावा ॥ हा सौख्याचा तेथील ठेवा ॥ न देखवे देवा माझेनी ॥ ९ ॥
म्हणोन येत येत परतला ॥ पुनः मागुता तीर्था गेला ॥ वर्षे द्वादश क्रमिता झाला ॥ परी नाहीं मनाला स्थिरता ॥ १० ॥
कोमळ ह्रदय ब्राह्मणाचें ॥ वरी पुण्यवान शरीर त्याचें ॥ विशेष पुण्य गुरुसेवेचें ॥ म्हणोन नवनीताचें ह्रदय पैं ॥ ११ ॥
असो द्वादशवर्षा परतोनी ॥ नारायण पातला गुरुआश्रमस्थानीं ॥ येतां देखिला गुरुसुतें नयनीं ॥ परी त्याची वोळखी नीं न पुरें ॥ १२ ॥
मग नारायणें हास्य केलें ॥ म्हणे आम्ही तुवा वोळखिलें ॥ ऐसें वदतां तेचि वेळे ॥ पायीं ठेविलें मस्तक ॥ १३ ॥
आरडोनी पडिलासे गळा ॥ रडों लागला खळखळां ॥ म्हणे वनीं टाकुनी वत्सला ॥ आपण गेला यात्रेतें ॥ १४ ॥
म्हणे मज नाहीं माता पिता ॥ नाही बंधुभगिनी चुलता ॥ नाहीं कोणी पाळिता पोशिता ॥ अहा अनंता हें काय केलें ॥ १५ ॥
एक होती भगिनी मजलागुनी ॥ तेही वेश्येनें नेली चाळवूनी ॥ नेणों असे कवणे स्थानीं ॥ ते मजलागुनी ॥ विदित नसे ॥ १६ ॥
ऐसा साकल्य समाचार ऐकिला ॥ नारायण ह्रदयीं थकित झाला ॥ मग तयातें आश्वासिता झाला ॥ मधुरवचनें करूनीं ॥ १७ ॥
म्हणे बापा ऐक आतां ॥ होणार तें न चुके तत्वतां ॥ कोण टाळूं शके ब्रह्मलिखिता ॥ तयाची वार्ता अनुपम्य ॥ १८ ॥
ऐसें तयातें अश्वासुनी ॥ बैसता जाला निजआसनीं ॥ येरें मांडिलीसे साजणीं ॥ परवडी तया भोजनाची ॥ १९ ॥
गृहीं तो पदार्थ अनकूळ नाहीं ॥ म्हणोन कुसुमुसी ठायींचे ठायीं ॥ आहा देवा माझे दैवीं नाहीं ॥ आलिया समयीं अतिता ॥ २० ॥
हे नारायणें जाणितलें ॥ म्हणे बापा तुवां काय आरंभिलें ॥ माझे भोजन तंव असे जालें ॥ नाहीं उरली अपेक्षा कांहीं ॥ २१ ॥
मनीं विचारी नारायण ॥ रसविक्रयाचें न स्वीकारावें अन्न ॥ म्हणोनि मांडिलें निर्वाण ॥ वारिला जाण या हेतु ॥ २२ ॥
मग येरें गोदोहने केलें ॥ कांहीं उपहारातें सारिलें ॥ मग शयनातें आरंभिलें ॥ पाय चुरिलें तयातें ॥ २३ ॥
तंव नारायण विचारिता जाला ॥ म्हणे आजवरी द्रव्यार्थ काय सांचिला ॥ तो सत्य निवेदीं मजला ॥ शंका या बोला न मानीं ॥ २४ ॥
येरू परमलज्जें करूनीं ॥ सांगता झाला तये क्षणीं ॥ म्हणे एकदशक रौप्य नाणें साचुनीं ॥ ठेविलें सदनीं आजवरी ॥ २५ ॥
या विरहित कांहीं नसे जाण ॥ पात्र तो मृन्मय भोजन ॥ वाहतों तव चरणाची आण ॥ सत्य जाण महाराजा ॥ २६ ॥
निर्मळ ह्रदयींचा पाहून ॥ चित्तीं द्रवला नारायण ॥ कांहीं उपाय करून ॥ लावावें साधन यालागीं ॥ २७ ॥
मग तयातें मधुर वचनीं ॥ बोलता जाला तत्क्षणीं ॥ म्हणे मी सांगेन जी करणी ॥ ते तूं निजमनीं धरसी कीं ॥ २८ ॥
येरू म्हणेजी तत्वतां ॥ असत्य न करीं वचनार्था ॥ सांगाल तें स्वीकारीन आतां ॥ नव्हे अन्यथा स्वामिया ॥ २९ ॥
मग श्लोकाधारें करून ॥ बोलता जाला वचन ॥ तोचि अवगत हों जाण ॥ तुम्हांलागून समस्ता ॥ ३० ॥
गोदाने नभवेल्लोको गवांलोम्नांहि संख्यया ॥ कल्पांतं ब्रह्मणोलोकः पापनाशप्रभावतः ॥ १ ॥
म्हणे या मलमासी निःशेष ॥ गोदान परम विशेष ॥ जे आचरती निर्दोष ॥ त्या पुण्यास पार नाहीं ॥ ३१ ॥
जितुके रोम धेनू आंगीं असती ॥ तितुके कल्प ब्रह्मलोकीं वस्ती ॥ समूळ होय पापाची शांति ॥ आचरे तयाप्रती हें पुण्य ॥ ३२ ॥
तरीं उदईक करून प्रातःस्नान ॥ ही धेनू करीं कृष्णार्पण ॥ वरी दक्षिणा संचित जें रौप्यनाणें ॥ करी अर्पण द्विजातें ॥ ३३ ॥
इतुकें वचन जरी मानिसी ॥ तरीं तूं अक्षयी सुखी राहासी ॥ येरु वदे त्या समयासी ॥ तथास्तु ऐसी अक्षरें ॥ ३४ ॥
परी विश्वास न वाटे नारायणा ॥ करील न करील गोदाना ॥ येवढीच तयातें उदरपोषणा ॥ म्हणोनि मना संशयो ॥ ३५ ॥
परी विप्रकुमर तो द्रवला ॥ आधींच होता तो त्रासला ॥ त्याहीवरी सद्‍गुरु भेटला ॥ उपदेश केला परमार्था ॥ ३६ ॥
मग भावार्था धरूनी सद्‍गुरुवचनी ॥ प्रातःकाळीं आला स्नान करूनीं ॥ एका विप्रातें बोलावूनीं ॥ गोपूजनीं अनुसरला ॥ ३७ ॥
दाना तें जो विप्र पाचारिला ॥ तो परम आश्चर्य मानिता झाला ॥ म्हणे आज काय आठवलें याला ॥ पुढें निर्वाहाला केविं होय ॥ ३८ ॥
असो आपणासीं काय कारण ॥ सांप्रत धेनु येतसे दान ॥ म्हणोन विधियुक्त संकल्प सांगून ॥ करी पूजन धेनूचें ॥ ३९ ॥
उपरि विप्रपूजा स्वयें करून ॥ ते धेनु असे दिधली दान ॥ मनीं भावार्थ गुरुवचनीं पूर्ण ॥ नसे जाण अन्य कांहीं ॥ ४० ॥
एका सद्भावावांचून कांहीं ॥ सद्‍गुरुची भेटी होणार नाहीं ॥ तयाविण सुटे न संदेहो ॥ जाणा सर्वही भाविकहो ॥ ४१ ॥
आधींच विप्रकुमर दरिद्री पाहीं ॥ मातापिता पाळिता दुजा नाहीं ॥ उदर निर्वाहाची धेनू तेही ॥ दिधली पाहीं दानाते ॥ ४२ ॥
एक दिनीचें भक्षावया अन्न ॥ तेंहीं किंचित गृहीं नसे जाण ॥ यापरी सर्वस्वें घडले दान ॥ तया विप्रकुमरा लागून ॥ ४३ ॥
ऐसें जालें ते दिवसी जाण ॥ परी प्राप्त झाला माध्यान ॥ विप्रकुमर तळमळें तेणें करून ॥ अन्न भक्षावया ॥ ४४ ॥
अंतरींच आपुल्या कुसमुसी ॥ कांहीच न बोले सद्‍गुरूसी ॥ ऐसें करितां अस्तमानासी ॥ संधी आपैसी होऊं आली ॥ ४५ ॥
तंव नारायणें काय केलें ॥ निवांत मनीं आसनीं बैसले ॥ स्नान संध्येतें मांडिलें ॥ आरंभिलें पूजानातें ॥ ४६ ॥
त्रैलोक्यनाथ चक्रपाणी ॥ उपोषित राहुं नेदीच कोणी ॥ कीटकपक्षी आदीकरूनी ॥ जो त्रिभुवनीं पाळीतसे ॥ ४७ ॥
तेथें विप्रकुमर क्षुधेनें पीडित ॥ हे तयातें न साहवेची मात ॥ तंव तो नारदमुनी अकस्मात् ॥ देखिलें तेथें कौतुकातें ॥ ४८ ॥
मग तैसाच त्वरे चालिला ॥ मुनी ब्रह्मलोकाप्रती आला ॥ सद्भावें नमस्कारिला पिता आपुला ॥ आणी समग्र निवेदिला वृत्तांतु ॥ ४९ ॥
म्हणे नवल देखिलें आजी स्वामि ॥ विप्रकुमराचीं अक्षरें लिहिली तुम्ही ॥ जे तक्रविक्रयें निर्वाह व्योमीं ॥ प्रतिदिनीं करावा ॥ ५०॥
ऐसें अक्षर स्वामीचें ॥ तें असत्य जालें साचे ॥ तयाने दान केले धेनूचे ॥ पुढे निर्वाहाचे कसे काय ॥ ५१ ॥
अस्ता होऊं आला दिनमान ॥ पुढे तयाची गती कवण ॥ असत्य जाले वचन ॥ ब्रह्म अक्षरे पूर्ण स्वामिया ॥ ५२ ॥
ऐकून नारदमुनीची वाणी ॥ चतुरानन दचकला मनीं ॥ निरखितां जाला जंव ध्यानीं ॥ तंव सत्यवाणी सर्वही ॥ ५३ ॥
म्हणे हे तो विपरीत जाले ॥ तयाते सर्वस्व दान घडले ॥ आतां उपायाते पाहिजे केले ॥ तरीच भले कर्म हे पैं ॥ ५४ ॥
येथे जे जे अर्पावे ॥ तया दशगुणी लागे पावावे ॥ हे जाणुनी ब्रह्मदेवे ॥ काय मांडिले विंदान ॥ ५५ ॥
सत्वर ब्राह्मण वेष नटला ॥ सवे दश गाईंचा मेळा ॥ घेऊन भूलोकीं आला ॥ त्वरे पावला विप्रसदन ॥ ५६ ॥
गाई उभ्या करून द्वारी ॥ विप्रकुमराते हाका मारी ॥ येरू पातला झडकरी ॥ सद्भावे नमस्कारी तयाते ॥ ५७ ॥
तंव चतुरानन बोले तयासी ॥ तुझियां पितरे आम्हापाशीं ॥ दश गौतम्या रक्षणासी ॥ ठेविल्या होत्या निर्धारे ॥ ५८ ॥
त्या तूं आपल्या अंगिकारीं आतां ॥ म्हणोनि जाला बोलता ॥ ऐसे वचन ऐकूनी तत्वतां ॥ येरू थांबा म्हणे तयाते ॥ ५९ ॥
मी आपुले गुरूसी पुसोन ॥ माघारा येतो परतुन ॥ ऐसे तयाते वदोन ॥ आला परतुन माघारा ॥ ६० ॥
मग गुरु बंधूतें म्हणे तेव्हां ॥ एक विप्र आलासे सदैवा ॥ तयानें आणिल्या दशधेनुवा ॥ अंगिकार मातें म्हणतसे ॥ ६१ ॥
म्हणे तुझिया बापें ठेविल्या पाहीं ॥ हे तो मातें विदित नाहीं ॥ काय उत्तर असे ते समयीं ॥ कृपा करून देई तयातें ॥ ६२ ॥
ऐसें ऐकून नारायण ॥ किंचित केलें हास्यवदन ॥ कळली अंतरीची खूण ॥ आला घेऊन विधाता ॥ ६३ ॥
येथें जैसे आपण द्यावें ॥ तया दशगुणी लागे पावावें ॥ म्हणोनियां ब्रह्मदेवें ॥ दशधेनू आणिल्या पैं ॥ ६४ ॥
मग तयातें आज्ञा देते अवसरीं ॥ धेनु आणिका गृहाभीतरी ॥ तया विप्रातें नमस्कारी ॥ जोडल्याकरीं सद्भावें ॥ ६५ ॥
येरें जाऊन तैसेंची केले ॥ धेनुका तें अंगिकारिले भले ॥ वरी रौप्य नाणें चांगले ॥ गणित भलें एकदशक ॥ ६६ ॥
ऐसें स्वीकारून ते वेळा ॥ नमस्कारूनि विप्र बोलाविला ॥ नारायणातें निवेदिता झाला ॥ वाडा भरला गोधनीं ॥ ६७ ॥
तंव तयाते वदे नारायण ॥ एक मोडीं आतां रौप्य नाणें ॥ धेनू लागीं घेऊन येई तृण ॥ आणि उदरा लागुनि तुझिया ॥ ६८ ॥
जे इच्छा असेल अंतरीं ॥ तेची तूं आजी स्वीकारी ॥ अर्ध नाणें तया माझारी ॥ असों दे पदरीं तुझीयां ॥ ६९ ॥
ऐसें आज्ञापितां तयातें ॥ येरू आज्ञा तैसीच वर्तत ॥ रौप्य नाणें नेऊन बाजारांत ॥ तृण आणित धेनुलागीं ॥ ७० ॥
मग गौ आणि आपली वासना ॥ तोची पदार्थ घेत आपणा ॥ अर्ध रौप्य नाणें समग्रहीं जाणा ॥ ठेविता झाला विप्रकुमार ॥ ७१ ॥
धेनुवेतें घालुनियां तृण ॥ स्वयें सारिलेंसे भोजन ॥ मग गुरुसेवेलागून ॥ तत्पर झाला यामिनीं ॥ ७२ ॥
तंव शिकवण देतसे नारायण ॥ म्हणे बापा ऎक एकवचन ॥ प्रातःकाळीं उठोन गंगास्नान ॥ येई करून झडकरी ॥ ७३ ॥
मग बोलावून विप्रमेळा ॥ दान देई धेनूसकळा ॥ स्वयें होई तूं तंव निराळा ॥ पाहिजे कशाला खटाटोप ॥ ७४ ॥
रौप्य नाणें तुझिया पदरीं ॥ गणती असे नऊद्वारीं ॥ एक अर्धरौप्य नाणें वरी ॥ असो साचारी जाणतां ॥ ७५ ॥
तरी दहा विप्र बोलावून ॥ दक्षिणे सहित देई गोदान ॥ झणी करिसी अनुमान ॥ वचना जाण माझिया ॥ ७६ ॥
ऐशी शिकवण देतां तयातें ॥ येरू अवश्य म्हणे त्यातें ॥ अमान्य स्वामी वचनातें ॥ न करीं जाण स्वामियां ॥ ७७ ॥
नंतर प्रातःकाळी उठोन ॥ करिता जाला गंगास्नान ॥ पाचारूनिया ब्राह्मण ॥ केलें संपूर्ण गोदान ॥ ७८ ॥
दान केसें सर्वही धन ॥ माध्यन्हिकातें नाहीं धान्य ॥ म्हणे हे भगवन् जनार्दन ॥ केवीं प्राक्तन माझें हें ॥ ७९ ॥
धन देखिलें नाहीं आजवरी ॥ तें चालत आलें निजमंदिरीं ॥ तेंहीं न राहावें कीं पदरीं ॥ जन्मवरी चुकेना ॥ ८० ॥
माझिये प्रारब्धीं हेंची पूर्ण ॥ तक्रविक्रयें उदरपोषण ॥ करावें परी तें धेनुही जाण ॥ दिधली दान गुरु आज्ञें ॥ ८१ ॥
ऐसा कुसमुसीं आपुले मनीं ॥ परी बोलून दाविना वदनीं ॥ तंव संधी प्राप्त जालीया वन्ही ॥ विप्रमनीं क्षुधित पैं ॥ ८२ ॥
तंव चित्रगुप्त वृत्तांतातें ॥ समूळ निवेदिलें ब्रह्मयातें ॥ काल दश धेनुवा दिधल्या ज्यातें ॥ त्यानें त्या द्विजातें अर्पिल्या ॥ ८३ ॥
समग्र धेनूचें केलें दान ॥ पदरीं नाहीं कांहीं अन्न ॥ तक्रविक्रय उदर पोषण ॥ करी उपोषण विप्रकुमार ॥ ८४ ॥
मग शत धेनूचा समुदावो ॥ घेऊन चालिला ब्रह्मदेवो ॥ द्वारदेशीं उभा राहून पहाहो ॥ पाहाता झाला विप्रकुमरा ॥ ८५ ॥
म्हणे महापुरुषा बाहेर येई ॥ हीं गोधनें सांभाळून घेई ॥ तुझिया बापाची हे ठेवी ॥ आजवरी पाहीं पाळिली मी ॥ ८६ ॥
ऐसी ऐकताची मात ॥ येरू आला धांवत धांवत ॥ पोटीं क्षुधानळ अति तप्त ॥ तों नयनीं देखता विप्ररावो ॥ ८७ ॥
देदीप्यमान सर्वशरीरीं ॥ भस्में चर्चित वस्त्र पाठारीं ॥ रुद्राक्ष माळां अतिसाजिरी ॥ कंठीं घाली परिपूर्ण ॥ ८८ ॥
सवें गोधनाचा कळप ॥ गणिता एक शत भरी माप ॥ मग परतला अति साक्षेप ॥ गुरुबंधु जवळिके ॥ ८९ ॥
सर्व वृत्तांत निवेदिला ॥ म्हणे द्वारीं एक विप्र असे आला ॥ सवें शत धेनूंचा मेळा सांभाळीं मजला म्हणतसे ॥ ९० ॥
विप्र परम दैदीप्यमान ॥ मुखीं बोलतसे वचन ॥ तुझिया वडिलांचीं हीं गोधनें ॥ वरी रौप्य नाणें शतवरी ॥ ९१ ॥
ऐसें तो वदतसे वचन ॥ सांगा आतां अज्ञाते कवण ॥ येरू बोलतसे हांसून ॥ सांभाळीं गोधन सर्वही ॥ ९२ ॥
गुरु आज्ञेनें तत्वता ॥ गोधनें जाला आणिता ॥ हातीं घेऊन द्रव्यशता ॥ पाहतां विप्र गुप्त झाला ॥ ९३ ॥
परी हें ब्राह्मण नेणें कांहीं ॥ हर्षयुक्त धेनु आणि सर्वही ॥ ही खूण नारायणातें ठावी ॥ इतरा काई अवगत ॥ ९४ ॥
मग गोधनें भरुनि गोठण ॥ घातलें तयालागीं तृण ॥ स्वयें भक्षी श्रेष्ठ अन्न ॥ आवडे पदार्थ तोची पैं ॥ ९५ ॥
ऐसी करूनी सारासारी ॥ मागुती गुरुसेवा अंगिकारी ॥ चरण चुरितां निर्धारी ॥ बोले ते अवसरीं नारायण ॥ ९६ ॥
म्हणे सख्या ऐक वचन ॥ गृहभरी दाटलें गोधन ॥ यासी सांभाळिसी कैसेन ॥ तरी सांगतों वचन तें ऐक ॥ ९७ ॥
एक धेनूतें पोसितां ॥ कंटाळा आलासे तत्वतां ॥ येथें शंभरांची वार्ता ॥ केवीं आतां घडूं शके ॥ ९८ ॥
तरी उदईक स्नान करूनी॥ पाचारी विप्रालागुनी ॥ संपूर्ण गोधनें दक्षिणादानीं ॥ विप्रा लागुनी अर्पावे ॥ ९९ ॥
संग्रहीं न ठेवीं एक अडका ॥ उतुकें कार्य आधीं करीं कां ॥ येरू तैसेंच करी देखा ॥ उठोनियां प्रातःकाळीं ॥ १०० ॥
स्नान सारिलें गंगाजळीं ॥ पाचारिली विप्रमंडळी ॥ समग्र गोधने एकच मेळीं ॥ पूजा केली गंधाक्षतें ॥ १ ॥
मग एक रौप्य गोधन ॥ अर्पिता झाला विप्रालागून ॥ ब्राह्मणाचे मनीं हर्ष पूर्ण ॥ नेता गोधनें बोलती ते ॥ २ ॥
म्हणे प्रतिदिनीं वांटितो गाई ॥ यासी तो एक दिनाचें भक्ष नाहीं ॥ ही तो दिसती अपूर्व नवाई ॥ किंवा शेषशायी तुष्टला ॥ ३ ॥
एक म्हणती कारण काय आपणातें ॥ आणू कोठून तरी परातें ॥ धेनू मिळाली एक आपणातें ॥ दक्षिणेसहीत निर्धारें ॥ ४ ॥
ऐसें बोलतां द्विजवर ॥ समस्त पातले निजमंदीर ॥ इकडे रडे विप्रकुमार ॥ होउनी स्थिर बैसलासे ॥ ५ ॥
म्हणे रात्रीं गृहभरी दाउनी ॥ वाडा भरलासे गोधनीं ॥ कैसी कर्माची काहणी ॥ न देखो नयनी पै एक ॥ ६ ॥
ऐसे म्हणोनि स्वस्थ बैसला ॥ तो दिनअस्त होऊं आला ॥ परी पाहूनिया कौतुकाला ॥ नारद गेला ब्रह्मलोका ॥ ७ ॥
नमुनियां चतुरानन निवेदिता जाला वर्तमान ॥ म्हणे आपण दिधलें गोधन ॥ ते दिधलें दान तयानें ॥ ८ ॥
तक्र विक्रयीं निर्वाहो ॥ ऐसा लिखिताचा भावो ॥ परी एकही धेनूतें न ठेवी हो ॥ पुढें निर्वाहो कैसेनी ॥ ९ ॥
होऊं आला अस्तमान ॥ उपोषित असे तो ब्राह्मण ॥ ऐकतां मुनिश्वराचें वचन ॥ हांस्य केलें कमळासनें॥ १० ॥
मागुती कमळासने उठोन ॥ सवें घेतलें सहस्र गोधन ॥ वरी सहस्र रौप्य नाणें घेऊन ॥ चतुरानन पातला ॥ ११ ॥
उभा राहून द्वारदेशी ॥ हांक मारी विप्रकुमरासी ॥ येरू धांवत आला वचनासरसी ॥ केला विप्रांसी नमस्कार ॥ १२ ॥
ब्रह्मा बोलतसे तेव्हां ॥ ह्या धेनू सांभाळी सदैवा ॥ वरी रौप्य नाणें ठेवा ॥ सहस्त्रवरी पैं असे ॥ १३ ॥
आतां तरी सांभाळीं समग्र पाहीं ॥ वदोन गुप्त जाला तेचि ठायीं ॥ देखतां चाकाटला निजह्रदयीं ॥ आला लवलाही भीतरी ॥ १४ ॥
समूळ वृत्तांत निवेदिला ॥ म्हणे सहस्र गोधनाचा मेळा ॥ घेऊनि रौप्य नाण्याला ॥ परी पाहतां गुप्त जाला नेणवे ॥ १५ ॥
ऐकून तोषला नारायण ॥ म्हणे लागलें हें साधन ॥ मग म्हणें तया लागून ॥ सांभाळीं कोण कळपा ॥ १६ ॥
तरी धेनूतें अर्पी तृण ॥ तूंही सारी कां भोजन॥ प्रातःकाळीं करूनियां स्नान ॥ आणी पाचारून विप्रातें ॥ १७ ॥
समस्त धेनु दक्षिणेसी ॥ दान देई कां ब्राह्मणासीं ॥ येरू हर्षयुक्त मानसीं ॥ तथास्तु ॥ वचनासीं बोलतसे ॥ १८ ॥
मग दुसरे दिनीं तैसाच प्रकार ॥ आचरता जाला विप्रकुमर ॥ पाचारुनियां धरामर ॥ धेनु समग्र वाटिल्या ॥ १९ ॥
दक्षिणेसहीत दिधलें दान ॥ नाहींसें केलें सहस्र नाणें ॥ न उरे दर्शना एकही जाण ॥ धेनु संपूर्ण निजगृहीं ॥ २० 
ऐसें करितां तये वेळां ॥ वृत्तांत ब्रह्मयातें कळला ॥ म्हणे सहस्र गोधनें वांटिता जाला ॥ अहारे कपाळा हें काय ॥ १ ॥
आतां दहा सहस्र नेतां धेनु ॥ त्याही दान देईल ब्राह्मणु ॥ ऐसा प्रत्यही दशगुणित धेनु ॥ कोठुन आणु तयातें ॥ २२ तयातें आयुष्य शतभरी पूर्ण ॥ तो तंव प्रत्यहीं करील हेंचि कारण ॥ त्याचें रुचेल येथेंची मन ॥ तक्र विकून काय काज ॥ २३ ॥
कोण गुरु तयातें भेटला ॥ माझा मंत्र मज फळला ॥ उणें आणिलें ब्रह्माक्षराला ॥ हें तंव वेदाला विहित नसे ॥ २४ ॥
मग हंस विमान पाचारिलें ॥ तयातें निजमुखें निवेदिलें ॥ भूलोकी जाऊन ये वेळें ॥ घेऊन येई विप्रकुमारा ॥ २५ ॥
मग हंस विमान येऊन ॥ देदीप्यमान केला ब्रह्मनंदन ॥ येरे नारायणातें म्हणून ॥ म्हणे प्रसाद हा जाण पैं तुझा ॥ २६ ॥
पावन केलें गुरुराया ॥ निवारिली जन्म मरणाची छाया ॥ म्हणोन वारंवार लागे पायां ॥ भिती नाहीं भावार्था ॥ २७ ॥
स्तुति वादन करवेची जाण ॥ वाचेसीं पडिलें दृढ मौन ॥ न उगवतां त्रितीय दिन ॥ नेला उद्धरून ब्रह्मलोका ॥ २८ ॥
समग्रजन आश्चर्य करिती ॥ नारायणाचे चरणीं लागती ॥ धन्यधन्य श्रीगुरुमूर्ति ॥ यातायाती निवारिली ॥ २९ ॥
ऐसें हें गोदान प्रकरण ॥ विशद केलें श्रोतियां लागून ॥ न लागता त्रितीय दिन ॥ नेला उद्धरून विप्रकुमर ॥ ३० ॥
म्हणोनियां मळमासीं जाण ॥ अगत्य घडे गोपूजा वरदान ॥ त्याहीवरी संतसेवा पूर्ण ॥ न लागे आन साधन पैं ॥ ३१ ॥
श्रीगुरु चरणीं परम विश्वास ॥ तयाचा चुकें गर्भवास ॥ पुढती न लागेची सायास ॥ जन्मपंक्तीस भोगणें॥ ३२ ॥
प्रत्यय देखिया नयनीं ॥ विप्रकुमर गेला उद्धरोनीं ॥ अक्षई परब्रह्म भुवनीं ॥ नव्हे हानी कालत्रयीं ॥ ३३ ॥
म्हणोन प्रथम श्लोकाचा भावार्थ ॥ निवेदिला तुम्हां तें समस्त ॥ येथें धरूनियां शुद्ध भावार्थ ॥ आचरावें सतत व्रत हे ॥ ३४ ॥
गोदाने नभवेल्लोको गवांलोम्नांहि संख्यया ॥ कल्पांतं ब्रह्मणे लोकः पापनाशः प्रभावतः ॥ २ ॥
ऐसा हा प्रथम श्लोक भला ॥ त्यावरी कथाभाग वर्णिला ॥ जे आचरती गोदानाला ॥ तरी ब्रह्मलोकीं तयाला वास घडे ॥ ३५ ॥
जितुके रोम गौतमी वरी ॥ निवास तितुका कल्पवरी ॥ पापक्षाळण निर्धारी ॥ तात्काळीकें जाण पां ॥ ३६ ॥
विप्रकुमरें पुण्य केलें ॥ परी जन्मांतरीचें पाप गेलें ॥ तक्रविक्रयें ज्याचें खुंटलेलं ॥ गुरुसेवे फळलें भाग्य त्याणें ॥ ३७ ॥
म्हणोनियां भाविकजन ॥ सद्‍गुरूतें जावें अनन्य शरण ॥ गर्भवास चुके जेणें ॥ न लागे साधन आणिक कांहीं ॥ १३८ ॥
स्वस्ति श्रीमलमहात्म ग्रंथ ॥ पद्मपुराण आणि स्कंद पुराणान्त ॥ संमत घेउन मनोहरसुत ॥ त्रयविंशतितमोऽध्याय संपूर्ण ॥ २३ ॥
ओव्या १३८ ॥ श्लोक २ ॥
 
॥ इति त्रयविंशंतितमोऽध्यायः ॥