मंगळवार, 5 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. एशिया कप 2022
Written By
Last Modified: बुधवार, 31 ऑगस्ट 2022 (23:26 IST)

India vs Hong Kong Asia Cup: भारताचा हाँगकाँगवर 40 धावांनी विजय, सुपर-4 मध्ये

indian team
India vs Hong Kong Asia Cup : रोहित शर्माच्या नेतृत्वाखालीलभारतीय संघानेआशिया चषक 2022 मध्ये अ गटातील दुसऱ्या सामन्यात हाँगकाँगचा 40 धावांनी पराभव केला.या स्पर्धेतील भारताचा हा सलग दुसरा विजय आहे.प्रथम फलंदाजी करताना सूर्यकुमार आणि विराट कोहलीच्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने हाँगकाँगसमोर 193 धावांचे लक्ष्य ठेवले होते.प्रत्युत्तरात हाँगकाँगने शेवटपर्यंत झुंज सुरू ठेवली, पण निर्धारित 20 षटकांत 5 विकेट गमावून 152 धावाच करू शकला.हाँगकाँगकडून बाबर हयातने 41 धावा केल्या.भारताकडून अर्शदीप सिंग, भुवनेश्वर कुमार, रवींद्र जडेजा आणि आवेश खान यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.भारतासाठी चिंतेची बाब म्हणजे स्टार फिरकीपटू युजवेंद्र चहल या दोन्ही सामन्यांमध्ये विकेट घेण्यात अपयशी ठरला आहे. 
 
 प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने पॉवरप्लेमध्ये 1 गडी गमावून 44 धावा केल्या.कर्णधार रोहित शर्मा 13 चेंडूत 21 धावा करून झेलबाद झाला.केएल राहुलने अतिशय संथ खेळी खेळली आणि तो 39 चेंडूत 36 धावा करून बाद झाला.यानंतर सूर्यकुमार यादव आणि विराट कोहलीने एकही विकेट पडू दिली नाही आणि भारताला मजबूत स्थितीत आणले.या दोघांमध्ये तिसऱ्या विकेटसाठी 42 चेंडूत 98 धावांची भागीदारी झाली.सूर्यकुमार यादवने अवघ्या 26 चेंडूत 68 धावांची दमदार खेळी केली.यादरम्यान त्याने 6 षटकार आणि 6 चौकार मारले.दरम्यान, विराट कोहलीनेही अर्धशतक झळकावले.तो 44 चेंडूत 59 धावा करून नाबाद राहिला.विराटने या खेळीत 3 चौकार आणि 1 षटकार लगावला. 
 
 पहिल्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा 5 विकेट्सने पराभव केला होता.अफगाणिस्तानने यापूर्वीच ब गटातून सुपर-4 साठी पात्रता मिळवली आहे, तर भारतीय संघाने हाँगकाँगचा पराभव करून अ गटातून पात्रता मिळवणारा पहिला संघ बनला आहे.पाकिस्तान, बांगलादेश, हाँगकाँग आणि श्रीलंका यांनी आपले विजयाचे खाते उघडलेले नाही.