1350 मध्ये वसलेलं अयुथ्या हे शहर एकेकाळी एका विशाल साम्राज्याची राजधानी होतं.थायलंडची राजधानी बँकॉकहून 70 किलोमीटर अंतरावर वसलेल्या अयुथ्या शहरात पाऊल ठेवताच, त्याठिकाणच्या भग्न पण भव्य वास्तुंकडं मात्र लक्ष वेधलं गेलं. याचबरोबर आणखी एका गोष्टीनं माझं लक्ष वेधून घेतलं ते म्हणजे अयुथ्या नावानं. हे नाव भारताच्या अयोध्या नावासारखंच आहे. जसं अयोध्या शरयू नदीच्या किनाऱ्यावर वसलेलं आहे तसंच सुमारे 3500 किलोमीटर दूर असलेल्या थायलंडमधील अयुथ्या हे शहर तीन नद्यांनी घेरलेलं आहे. भारतीय वंशाचे प्राध्यापक सुरत होराचायकुल बँकॉकच्या चुलालॉंगकॉर्न युनिव्हर्सिटीत इंडियन स्टडीजचे संस्थापक संचालक आहेत. त्यांच्या मते, "अयोध्या आणि अयुथ्या ही नाव सारखी आहेत हा काही योगायोग नाही.संस्कृतचे शब्द थाइ भाषेत वापरून इथं अनेक नवीन शब्द तयार करण्यात आले आहेत. प्राचीन भारतीय संस्कृतीचा दक्षिण आशियावर खूपच प्रभाव राहिलेला आहे. जेव्हा अयुथ्या शहर वसलं होतं त्यावेळपर्यंत रामायण थायलंडपर्यंत पोहोचलं होतं. त्याला तिथं रामाकिएन म्हटलं जातं. कोणत्याही काळात तुम्हाला साम्राज्य किंवा शहराचं नाव असं ठेवायचं असतं जे शुभ समजलं जाईल, जे कायमचं तसंच राहील. अनेक इतिहासकार अयुध्या नाव अयोध्येसारखं असण्यामागं हेच कारण असावं असं सांगतात." प्राध्यापक सूरत यांचं कुटुंब नॉर्थ वेस्टर्न फ्रंटियर प्रोव्हिन्समध्ये राहतं. पण विभाजनाच्या आधीच त्यांचं कुटुंब थायलंडला आलं होतं. ते तिसऱ्या पिढीतील भारतीय वंशाचे थाइ नागरिक आहेत. त्यांच्या मते, "थायलंडमध्ये आमच्याकडं राजाला विष्णूचा अवतार समजलं जात होतं. त्यामुळं विविध राजांना थायलंडचे रामा-1 ,रामा-2 , रामा-10 अशा नावांनी ओळखलं जातं. संस्कृत, पाली सर्व भाषांचा प्रभाव थायलंडमध्ये पाहायला मिळतो. (जसं तुमचं नाव वंदना आहे, थाइमध्ये कुरवंधना आहे.)"
अयुथ्या दरबार आणि मुघल दूत
युनेस्कोनुसार अयुथ्याच्या शाही दरबारात अनेक देशांचे दूत येत जात होते. त्यात मुघल दरबार, जपान आणि चिनी साम्राज्यांच्या दुतांपासून फ्रान्सच्या दुतांचाही समावेश होता. डॉक्टर उदय भानू सिंह दक्षिण-पूर्व आशियाई प्रकरणांचे अभ्यासक असून एमपी-आयडीएसएशी संलग्न राहिलेले आहेत. त्यांच्या मते, "यावर्षी थायलंड आणि भारतच्या द्विपक्षीय संबंधांना 77 वर्षे पूर्ण होतील. पण दोन्ही देशांमध्ये सांस्कृतिक आणि धार्मिक संबंध अनेक शतकांपासून आहे. थायलंडमध्ये अयुथ्या नावाचं शहर असून त्यांची स्थापना 1350 मध्ये झाली होती. त्याला अयोध्येशी जोडलं जातं. त्याची स्थापना राजा रमातीबोधी-1 नं केली होती. आज अयुथ्या युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांपैकी एक आहे." "थायलंड हा देश तसं पाहता बौद्ध धर्माचं प्रभुत्व असलेला देश आहे. पण या ठिकाणच्या शाही परिवारानं हिंदु धर्माशी संबंधित अनेक परंपरा स्वीकारलेल्या आहेत." ज्येष्ठ इतिहासकर डीपी सिंघल यांच्या मते, 'चीनसारख्या देशांपेक्षा थायलंडमध्ये भारतीय संस्कृतीनं अधिक छाप सोडली आहे. रामायणाच्या आवृत्तीला थायलंडमध्ये रामाकिएन म्हटलं जातं.
रामायण आणि रामाकिएन
अनेक शतकांपूर्वी दक्षिण भारतातून सागरी मार्गानं लोकांनी थायलंडला ये-जा केली आहे. त्याचवेळी रामायणही इथं पोहोचलं. त्याच्या अनेक आवृत्ती तयार झाल्या आणि थाइ किंग रामा-1 यांनी पुन्हा ते लिहिलं. थायलंडमध्ये आजही रामाकिएनचं सादरीकरण होतं. त्याला थाइ रामायणाचा दर्जा आहे. त्याचं रामायणाशी बऱ्याच अंशी साम्य आहे. पण स्थानिक संस्कृती, बौद्ध धर्म यानुसार बराच फरकही आहे. असं म्हटलं जातं की, रामाकिएनमधील थॉसकन नावाचं पात्र म्हणजेच रामायणातील रावण आहे. याठिकाणी थॉसचा अर्थ दहा असा होतो. रामाकिएनमधील फ्रा राम म्हणजेच भगवान राम आहेत. भारत-थायलंड नात्याचा विचार करता रॉयल थाइ काउंसलेट जनरलच्या वेबसाइटनुसार थायलंडचे किंग रामा-5 1872 मध्ये समुद्रमार्गे सिंगापूर आणि यँगोनमार्गे भारतात आले होते. 13 जानेवारी 1872 ला कलकत्ताला पोहोचल्यानंतर ते रेल्वेने बॅरकपूर, दिल्ली, आगरा, कानपूर, लखनऊलाही गेले होते.
अयुथ्याचा इतिहास
14व्या शतकापासून 18व्या शतकादरम्यान आजचं अयुथ्या तेव्हाच्या स्याम नावाच्या समृद्ध राज्याची राजधानी होतं. ते जगातील राजकारण आणि व्यापाराचं केंद्रही होतं. 1767 मध्ये बर्मानं या शहरावर असा हल्ला केला की, ते शहर पूर्णपणे उध्वस्त झालं. ते शहर पुन्हा वसवलंच नाही, तर बँकॉक नावानं नवी राजधानी तयार करण्यात आली. बँकॉकच औपचारिक नाव बँकॉक नाही. दीर्घकाळापासून त्याच्या औपचारिक नावांत अयुथ्याचा असलेला समावेश आजही आहे. शहराच्या मध्यभागीच अयुथ्या रोड नावाचा मार्गही आढळतो. याठिकाणी घालवलेल्या एका दिवसात मला ऐतिहासिक मंदिरांमध्ये जाण्याची संधी मिळाली. याठिकाणचे पागोडा आणि मॉनेस्ट्रींचे अवशेष पाहून इमारती किती भव्य असतील याचा अंदाज येतो. शीर नसलेल्या बुद्धमूर्ती, छत नसलेल्या इमारती, सगळीकडं भग्न अवशेष... इथं उभं राहून असा भास होतो की जणू आक्रमण करणारा नुकत्याच वसवलेल्या शहराची तोडफोड करून गेला असावा.
झोपलेल्या स्थितीतील बुद्धांच्या सर्वात मोठ्या मूर्तींपैकी एक याठिकाणी पाहायला मिळते. याठिकाणी बुद्धांच्या अनेक विशाल मूर्ती आहेत. पण त्यापैकी अनेकींचे शीर नाहीत. हे शहर नष्ट करण्यात आलं तेव्हा अनेक मूर्तीही नष्ट झाल्या असं म्हटलं जातं. लोकांनी अनेक मूर्तींचे शीर तोडून त्यांची युरोपात विक्री केली असं सांगितलं जातं.
पण एक मूर्ती अशीही आहे जिचं शीर धडापासून वेगळं झालं. पण अनेक शतकांनंतरही ते शीर झाडांच्या मुळांद्वारे घट्टपणे जमिनीला बिलगून असून विदेशी पर्यंटकांसाठी ते प्रसिद्ध पर्यटनस्थळ बनलं आहं. तिथं तुम्हाला उभं राहून फोटो काढता येत नाही. बसून किंवा वाकून काढावा लागतो. हे झाड अयुथ्याच्या माट महाथाट मंदिरात आहे. याठिकाणच्या इमारतींमध्ये तुम्हाला 17 व्या, 18 व्या शतकातील भारत, चीन, जपान, युरोपच्या कलाशैलीचं मिश्रण आढळेल. तसंच संस्कृतीत भारताची छाप दिसेल.
लेखक एसएन देसाई यांनी हिंदुझम इन थाइ लाइफ नावाच्या पुस्तकात याबाबत सविस्तरपणे लिहिलं आहे.
"थायलंडमध्ये अयुथ्या शहर प्रभू रामांच्या प्रभावाचं साक्षीदार आहे. पण थायलंडमध्ये रामाबाबत पौराणिक पुरावे नाहीत. पण लोककलेच्या माध्यमातून राम आणि रामायण अनेक शतकांपासून लोकांमध्ये प्रसिद्ध आहे. थायलंडमध्ये आणखी एक शहर आहे लोपबुरी. प्रभू रामांचा मुलगा लव याच्या नावावर या शहराचं नाव ठेवलं असल्याचं म्हटलं जातं. या शहरात एका गल्लीचं नावही फ्रा राम आहे," असं ते लिहितात. अयुथ्याबाबत बोलायचं झाल्यास त्या काळाप्रमाणे आजही तुम्हाला याठिकाणी जागोजागी हत्ती दिसतील. फरक फक्त एवढाच आहे की, त्यांच्यावर आता सैनिकांऐवजी कॅमेरे घेऊन बसलेले पर्यटक दिसतात