शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. आज-काल
  3. डॉ.आंबेडकर
Written By वेबदुनिया|

सुधारवादी संपादक डॉ.बाबासाहेब आंबेडकर

यशवंत भंडारे

अस्पृष्यांचे मुक्तीदाते व घटनाकार म्हणून प्रसिध्द असणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रेष्ठ दर्जाचे पत्रकार आणि संपादकही होते. लोकमान्य टिळकांनी पत्रकारितेचा उपयोग परकीय इंग्रजा विरुध्द केला.त्यामुळे ते स्वजनात लोकप्रिय ठरले, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा लढा स्वकियाविरुध्द धर्मसुधारणेसाठी होता . त्यामुळे प्रस्थापित अशा स्वकिय यामध्ये त्यांची पत्रकारिता लोकप्रिय झाली नाही . 

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म मध्यप्रदेशातील महू येथे झाला. त्यांचे वडिल रामजी मूळचे रत्नागिरी जिल्ह्यातील आंबावडे या गावचे . ते सैन्यात सुभेदार मेजर होते. भिमराव हे त्यांचे चौदावे आपत्य. पाच वर्षाचे असतांनाच त्यांचे मातृछत्र हरपले . आंबावडेकर कुंटूंबावर संत कबीरांचा प्रभाव होता. वडिलांच्या सेवानिवृत्तीनंतर ते सातार्‍याला स्थायिक झाले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे प्राथमिक शिक्षण सातारा व मुंबईच्या इल्फिस्टन हायस्कूलमध्ये झाले. ते 1907 मध्ये मॅट्रिक, 1912 मध्ये बी.ए.झाले. बडोद्याचे राजे सयाजीाव गायकवाड यांनी शिष्यवृत्ती दिल्यानंतर ते उच्चशिक्षणासाठी अमेरिकेत गेले . 1913 ते 1916 दरम्यान त्यांनी कोलबिंया विद्यापीठात शिक्षण घेतले . एम.ए. पी.एच.डी. या पदव्या प्राप्त केल्या. काही दिवस बडोदा संस्थानात नौकरी केल्यानंतर त्यांनी नोव्हेंबर, 1918 ते जुलै 1920 या दरम्यान मुंबईच्या सिडेनेहॅम महाविद्यालयात वाणिज्य व अर्थशास्त्र विषयाच्या प्राध्यापकाची नौकरी केली.

ब्रिटीश सरकारने त्यांना न्यायाधीशाची नौकरी देऊ केली होती. त्यांनी लंडनला जाऊन डी.एससी व बॅरिस्टर या पदव्या प्राप्त केल्या. मुंबईला परतल्यानंतर त्यांनी वकिली सुरु केली . हिंदू धर्मातील चातुर्वण्य पध्दतीमुळे दलितांचा होणारा छळ त्यांनी अनुभवलेला होता. या लोकांच्या उध्दारासाठी त्यांनी कार्य सुरु केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना जुलै , 1924 मध्ये केली. कुलाबा जिल्ह्यातील महाड येथील चवदार तळ्यांच्या पाण्याला स्पर्श करुन त्यांनी जातीभेदाच्या भिंतीला पहिला धक्का दिला. मनस्मृतीचे दहन केले . नाशिकच्या काळाराम मंदिरात दलितांना प्रवेश मिळावा यासाठी त्यांनी लढा दिला. 1935 मध्ये येवला येथे त्यांनी " मी हिंदू धर्मात जन्मलो असतो तरी हिंदू म्हणून मरणार नाही अशी घोषणा केली. 1936

मध्ये त्यांनी इंन्डिपेंन्डेट लेबर पार्टीची स्थापना केली. या पक्षाच्या झेंड्याखाली त्यांनी मुंबई प्रांतिक विधीमंडळाची निवडणूक जिंकली . 1942 ते 46 दरम्यान ते मध्यवर्ती कायदेमंडळात होते. मजूरमंत्री म्हणूनही त्यांनी काम पाहिले . त्यांनी मुंबईत सिध्दार्थ आणि औरंगाबाद येथे मिलिंद महाविद्यालय सुरु केले. स्वतंत्र्य भारतात कायदामंत्री म्हणन त्यांनी काम पाहिले.

1952 मध्ये ते राज्यसभेवर निवडले गेले. 14 ऑक्टोंबर, 1956 ला त्यांनी बौध्द धर्माचा स्वीकार केला . 6 डिसेंबर, 1956 रोजी त्यांचे निधन झाले.

डॉ. आंबेडकर परदेशात शिकलेले उच्चविद्याविभूषित होते. दलित बांधवामध्ये जागृती आणि त्यांचे संघटन धरण्याच्या उद्दशाने त्यांनी पत्रकारिता सुरु केली. दलित समाज अशिक्षित होता. त्यामुळे त्यांनी आपली वर्तमानपत्रे मराठीतूनच काढली मूकनायक, बहिष्कृत भारत , जनता आणि प्रबुध्द भारत या चार वर्तमानपत्रांचे संपादन त्यांनी केले .

पाक्षिक मूकनायक जानेवारी, 1920 मध्ये सुरु झाले . शाहु महाराजांनी त्यांना या कामी साह्य केले . केसरीने मूकनायकची जाहिरात छापण्यास नकार दिला होता. अस्पृश्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे व त्यांची उन्नती साधने हा मुकनायकाचा उद्देश होता. पाडुंरंग भटकर यांची त्यांनी संपादकपदी नियुक्ती केली. मूकनायक हे डॉ. आंबेडकरांच्या राजकीय नेतृत्वाच्या प्रारंभीचे वर्तमानपत्र होते. ते 8 एप्रिल , 1923 ला बंद पडले. मूकनायकमधून त्यांचे विचार प्रभावीपणे लोकांसमोर आले. पुढे 3 एप्रिल , 1927 ला त्यांनी पाक्षिक बहिष्कृत भारत सुरु कले . उत्तम कदम, भा. वि. प्रधान आदींनी त्यांना या कामी साह्य केले . या पत्राची आर्थिक आवस्था खूपच नाजूक होती. या पत्रातून त्यांनी अनेकांवर कठोर टीका केली . 15 नोव्हेंबर, 1929 ला बहिष्कृत भारत बंद पडले. 1930 मध्ये त्यांनी पाक्षिक जनता व 1955 मध्य प्रबुध्द भारत हे साप्ताहिक सुरु केले .

डॉ. आंबेडकरांचे शिक्षण इंग्रजीतून झाले होते. त्यामुळे सुरवातीला मराठीतून लिहिण्यात त्यांना अडचण येत असे . मराठी भाषा भारदस्त करण्यासाठी संत वाड:मय, नव्या जुन्या लेखकांचे साहित्य व समकालिन पत्रकारांच्या लेखनाचा अभ्यास त्यांनी केला. आपला वाचकवर्ग डोळ्यांसमोर ठेऊन त्यांनी सोप्या पध्दतीने लेखन केले. त्यांचे लेखन नशिब व ते तर्कशुध्द पध्दतीने मांडित असत. बहिष्कृत भारतमधून त्यांनी लोकहितवादींच्या पत्रांचे पुनर्मुद्रण केले . डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रतिभाशाली , ध्येयवादी व सुधारणावादी संपादक होते.