सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By

होमोफोबिया म्हणजे काय, तो बरा होणं खरंच शक्य आहे का?

एखाद्याची लैंगिकता बदलण्याची कल्पना विज्ञानानं कधीच फेटाळून लावली आहे.
 
"जो आजारच नाही त्याला बरं कसं करता येईल?" यावर शास्त्रज्ञांचं एकमत झालेलं आहे. 1973 साली अमेरिकेत मानसिक आजारांच्या यादीतून समलैंगिकतेला वगळण्यात आलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेनंही 1990 साली तेच केलं.
 
त्यानंतर होमोफोबियावर (समलैंगिकतेबद्दल वाटणारे भय किंवा समलैंगिकतेला होणारा विरोध) अधिकाधिक लक्ष केंद्रीत झालं आणि संशोधकांनी त्याची विविध कारणं समजून घेण्यास प्रयत्न सुरू केला.
 
'अकारण भीती'
 
अमेरिकेतील जॉर्ज वाइनबर्ग यांनी 1960च्या दशकात होमोफोबिया ही संज्ञा प्रथम वापरली. त्यांनी त्याचा 'समलैंगिक व्यक्तींच्या सानिध्यात येण्याची भीती' असा अर्थ स्पष्ट केला होता. ग्रीक भाषेतून आलेल्या फोबिया प्रत्ययाचा अर्थ एखाद्या गोष्टीची वाटणारी अकारण भीती असा आहे.
 
1972 साली लिहिलेल्या सोसायटी अँड हेल्दी होमोसेक्शुअल पुस्तकात डॉ. वाइनबर्ग म्हणतात, "समलैंगितकेबद्दलचे पूर्वग्रह जोपर्यंत जात नाहीत तोपर्यंत मी रूग्ण आजारातून पूर्ण बरा झाला असं म्हणणार नाही."
 
रोम टोर वर्गाटा विद्यापीठातील एंड्रोक्रायोनॉलॉजीचे आणि मेडिकल सेक्सोलॉजीचे प्रोफेसर इमॅन्युएल ए. जानीनी यांना होमोफोबिया हे तर हिमनगाचं टोक वाटतं. "होमोफोबिया काही व्यक्तीमतत्वासंदर्भातील गुणधर्माशी संबंधित आहेत. त्याचा हिंसेशीसुद्धा संबंध आहे. त्याला मानसिक आजार म्हणता येईल," असं ते म्हणतात.
 
डॉ. जानीनी यांनी जर्नल ऑफ सेक्शुअल मेडिसिनमध्ये 2015 साली लिहिलेल्या शोधनिबंधात होमोफोबियाला सायकोटिझम (संताप आणि शत्रूत्वाशी संबंधित), संरक्षण करण्याचा अपरिपक्व प्रकार तसंच पालकांच्या असुरक्षिततेच्या भावनेशी जोडल्यामुळे वाद निर्माण झाला होता.
 
एलजीबीटी समुदायाच्या बाजूने केलेला अभ्यास असा त्याच्यावर शिक्का मारला. पण बीबीसीशी बोलताना डॉ. जानीनी आपल्या अभ्यासावर ठाम राहिले. "होमोफोबिक व्यक्ती कमकुवत असतात", असे ते म्हणाले.
 
"ही काही वैज्ञानिक संज्ञा नाही, पण योग्यप्रकारे समजावं म्हणून मी ती संज्ञा वापरतो", असे ते म्हणाले.
 
होमोफोबियाचं प्रमाण
त्यांनी होमोफोबियाची पातळी शोधून काढण्यासाठी एक प्रमाण शोधून काढलं आहे. इटालियन विद्यापीठांमधील 551 विद्यार्थ्यांचा अभ्यास करून त्यांच्या मानसिक गुणधर्मांनुसार हे प्रमाण शोधण्यात आलं आहे.
 
ज्या लोकांमध्ये जास्त तीव्र होमोफोबिक गुणधर्म होते त्यांच्यामध्ये सायकोटीझमसारखे वरचे गुणधर्मही दिसून येतात. तर कमी तीव्रतेच्या होमोफोबियामध्ये सिक्युअर पॅरेंटल अटॅचमेंटसारखे कल दिसून येतात. उपचारांनी सर्व मानसिक आजार बरे होऊ शकतात असं ते म्हणतात.
 
कदाचित तुम्हाला समलैंगिक वर्तन आवडणार नाही. पण मी समलैंगिक नाही, मी समलैंगिकांचा तिरस्कार करतो, समलैंगिक माझ्या घरात आलेलं आवडत नाही, समलैंगिक शिक्षक माझ्या शाळेत असू नये असं सारखं म्हणत राहाण्याची गरज नाही, असं डॉ. जानिनी म्हणाले.
 
"गेली अनेक शतकं समलैंगिकतेकडे आजार म्हणून पाहिलं गेलं, पण आता पहिल्यांदाच होमोफोबिया हा खरा आजार असून तो बरा करण्याची गरज असल्याचं आम्ही सांगितलं आहे."
 
संस्कृतीचा परिणाम
पण लोकांच्या व्यक्तीमत्त्वावर त्यांच्या आजूबाजूच्या पर्यावरणाचाही परिणाम होत असतो. अतिरेकी मर्दपणा, स्रियांचा द्वेष, होमोफोबियाला नैतिकतेचं स्वरूप देणं हे अनेक संस्कृतींमध्ये असल्याचं डॉ. जानिनी यांना वाटतं.
 
2017 साली त्यांनी 3 वेगवेगळ्या धर्मांचा प्रभाव असणाऱ्या देशांमधील 1048 विद्यार्थ्यांचा अभ्यास केला. इटली (कॅथलिक देश), अल्बानिया (मुस्लीम बहुसंख्य), युक्रेन (ऑर्थोडॉक्स लोकांचे अधिक प्रमाण) या तीन देशांचा त्यात समावेश होता.
 
डॉ. जानिनी सांगतात, "कोणत्याही धर्माने स्वतःला होमोफोबियाशी जोडून घेतलं नसल्याचं दिसून आलं, पण तिन्ही धर्मांतील कट्टर धार्मिक श्रद्धांमुळे होमोफोबियाच्या तीव्रतेवर परिणाम होतो."
 
मध्यम तीव्रतेचे धार्मिक गट किंवा धर्म होमोफोबियाला मान्यता देत नाहीत असं सांगतील.
 
आम्ही पापाचा तिरस्कार करतो, पण जे पाप करतात त्यांचा तिरस्कार करत नाही असं वाहतांग किप्शीद्झी यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं. ते रशियन ख्रिश्चन ऑर्थोडॉक्स चर्चचे प्रवक्ते आहेत. समलैंगिकता हे पाप असल्याची शिकवण देवाची आहे, चर्चची नाही, त्यामुळे त्यात चर्च बदल करू शकत नाही असं ते म्हणाले.
 
"जे लोक समलैंगिक संबंध ठेवतात ते त्यांचं पाप आहे असं आम्ही मानतो" मात्र काही गट याहून कठोर भूमिका घेतात.
 
मॉस्कोमधील गे क्लबवर 2012 साली हल्ला करून त्याची नासधूस करण्यात आली होती. त्यावेळेस रशियन धर्मपुजारी सर्जे र्योब्को म्हणाले, "अपारंपरिक लैंगिक वर्तनाविरोधात वर्तन करणाऱ्यांना दगडांनी ठेचून मारावं असं आमच्या पवित्र साहित्यात लिहून ठेवलं आहे."
 
"आमचा देश स्वच्छ करणाऱ्या सर्व लोकांच्या प्रयत्नांना मी पूर्ण अनुमोदन देतो."
 
किप्शीद्झी म्हणाले, "पाप करणाऱ्यांना दगडाने ठेचून मारण्याला पाठिंबा देणारा कोणताही पुरावा नव्या करारात सापडत नाही."
 
तसंच व्यभिचारालाही कोणतंही गुन्ह्याचं स्वरूप नाही. असं सांगत ते म्हणाले, चर्च समलैंगिक संबंधांना गुन्ह्याचं स्वरूप देण्याबाबत काहीही प्रयत्न करत नाही.
 
मात्र काही लोक पवित्र ग्रंथांचा चुकीचा अर्थ काढतात आणि त्याचा वापर हिंसेसाठी करतात.
 
भाषेचं बळ
पण चर्चचे अनेक नेते लोकांच्या मनात समलैंगिकांबद्दल भीती आणि संताप वाढीस लागेल अशी भाषा नक्कीच वापरतात, असं तिएर्नान ब्राडी म्हणतात. ते कॅथलिक चर्चमध्ये एलजीबीटी लोकांना स्थान मिळावं यासाठी काम करतात.
 
होमोफोबिया हा शिकून घेतला जातो. कोणीही जन्मजात होमोफोब नसतं. होमोफोबिया कुठून तरी स्वीकारला जातो, असं ते सांगतात.
 
दक्षिण आणि मध्य अमेरिका, दक्षिण आशिया, पूर्व युरोप, भारत आणि चीन सर्व जगभरात एलजीबीटी समुदायाप्रती दृष्टीकोन बदलत आहे. पण शतकानुशतकं चालत आलेली शत्रूत्वाची भावना एका रात्रीत संपणार नाही, असं ते म्हणतात.
 
"परंतु चर्च हा लोकांच्या आयुष्यातील केवळ एक भाग झाला. लोक होमोफोबिया खेळ, राजकारण, समाजातून शिकत असतात."
 
त्यामुळे रूढीवादी देश धर्मातील कठोर गोष्टींना अधिक बळ देतात असं ते म्हणाले.
 
ज्या देशांमध्ये जास्त होमोफोबिया आहे तिथं एलजीबीटी जास्तीत जास्त अदृश्य असल्याचं दिसून येतं. कारण तिथं भीती आणि अविश्वास तयार करणं सोपं असतं.
 
पॅट्रिक आर. ग्रझान्का हे टेनेसी विद्यापीठातील मानसशास्त्राचे सहायक प्राध्यापक आहेत. तसंच जर्नल कौन्सेलींग सायकॉलॉजीचे असोसिएट एडिटर आहेत.
 
होमोफोबिया हा रुढ धारणांशीही संबंधित असल्याचं दिसून येतं.
 
2016 साली त्यांनी अमेरिकेतील 645 महाविद्यालयीन तरूणांचा अभ्यास करून त्यांच्यातील होमोफोबियाची तीव्रता तपासली.
 
त्यानंतर त्यांनी चार धारणांवर आधारीत त्यांचे चार गट केले. 1) समान लैंगिक अल्पसंख्य गटातील लोक जन्माला येतानाच तसे आलेले असतात. 2) समलैंगिक गटातील सर्व लोक समान असतात. 3) एक व्यक्ती केवळ एकाच लैंगिक गटाचा असू शकतो. 4) एखाद्या गटातील एका व्यक्तीला तुम्ही भेटलात की तुम्हाला सगळ्या गटाची माहिती होते.
 
यातल्या पहिल्या गटातील धारणा मान्य असणारे अमेरिकन विद्यार्थी भरपूर असल्याचं संशोधकांना दिसून आलं.
 
लैंगिक अल्पसंख्याप्रती अत्यंत तीव्र नकारात्मक भाव असणाऱ्यांमध्ये इतर तीन भावना जास्त असल्याचं दिसून आलं.
 
लोकांच्या मनात असलेले छुपे पूर्वग्रहच त्यांना काही पूर्वग्रह स्वीकारायला लावतात, असं डॉ. ग्रझांका म्हणतात.
 
इतरांना पाहातो तसंच यांच्याकडेही पाहायला हवं असं सांगूनच होमोफोबिया कमी करता येइल, असं त्यांना वाटतं.
 
"होमोफोबियाविरोधी योजनांचा पुरस्कार तसंच लोकांचं शिक्षण आणि सर्वांना योग्य माहिती मिळेल, अशा मोहिमांमुळे होमोफोबिया कमी होईल", असं ते सांगतात.
 
एकेकाळी मानवी इतिहासात समलैंगिक वर्तन स्वीकारलं जात होतं आणि त्याला वैधता होती तसंच सन्मानही मिळत असे ते सांगतात.
 
जरा दीर्घदृष्टी बाळगली तर लोकांचे पूर्वग्रह बदलतील आणि एलजीबीटी समुदायाच्या हक्कांसाठी उपयोग होईल.
 
1999 साली दोन तृतियांश अमेरिकन लोकांनी समलैंगिक विवाहाला विरोध केला होता फक्त एक-तृतीयांश लोकांना त्याला कायदेशीर स्वरुप मिळावं असं वाटत होतं, असं गॅलुप म्हणतात.
 
हे फक्त 20 वर्षांपूर्वी होतं. पण आता बरोबर उलट आहे. दोन-तृतियांशपेक्षा जास्त लोक समलैंगिक विवाहाला पाठिंबा देतात आणि एक-तृतियांश लोक विरोध करत आहेत.
 
एलजीबीटी समुदायातील 10 टक्के प्रौढांनी समलैंगिक जोडीदाराची निवड केली आहे. त्यांच्यामुळे समलैंगिक विवाहाच्या कायदेशीर स्वरुपाला विरोध करणाऱ्या लोकांचं मत बदलण्यास सुरूवात झाली असून त्यांच्या होमोफोबिक दृष्टीमध्ये बदल होत आहे.
 
होमोफोबिया पूर्ण बरा होऊ शकतो की नाही हे आम्हाला माहिती नाही. पण तो समजून घेण्याच्या अगदी जवळ पोहोचलो आहोत असं संशोधकांना वाटतं.