शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: शनिवार, 14 ऑगस्ट 2021 (12:05 IST)

अफगाणिस्तान : तालिबान काबुलपासून फक्त 50 किलोमीटर दूर

तालिबाननं शुक्रवारी (13 ऑगस्ट) अफगाणिस्तानातलं दुसरं सर्वात मोठं शहर असलेल्या कंदहारवर ताबा मिळवला. आता तालिबान अफगाणिस्तानची राजधानी काबुलच्या सीमेवरील लोगारची प्रांतीय राजधानी पोल-ए-आलममध्ये घुसले आहेत.
 
तालिबानचा हा मोठा विजय मानला जात आहे. कारण लोगारपासून काबुल फक्त 50 किलोमीटर अंतरावर आहे. इथून तालिबान केवळ दोन तासात काबुलमध्ये दाखल होऊ शकतं. एकीकडे तालिबान अफगाणिस्तानच्या राजधानी काबुलकडे चाल करून येत असताना, दुसरीकडे काबुलमध्ये शरणार्थींची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढत आहे.
 
काबुलमध्ये अभूतपूर्व गोंधळाची स्थिती उद्भवण्याची भीती वर्तवण्यात येतेय. ज्या आक्रमकतेनं तालिबानं काबुलच्या दिशेनं येत आहे, त्यामुळे आधीच अफगाणिस्तानमध्ये गोंधळाचं वातावरण आहे.
 
बऱ्याच लोकांना ठाऊक आहे की, पुढे काय वाढून ठेवलं आहे. तालिबानपासून वाचण्यासाठी लोक आपापल्या शहर, तालुका आणि घरांच्या दिशेनं धावत आहेत. मात्र, या सर्व लोकांचं अंतिम स्थान काबुल आहे. तिथेच त्यांचा जीव वाचू शकतो. अशा स्थितीत काबुलमध्ये मोठी गर्दी होताना दिसतेय. संयुक्त राष्ट्राने अफगाणिस्तानच्या शेजारी देशांना आपापल्या सीमा उघडण्यासाठी आग्रह केला आहे.
 
कंदहार तालिबानच्या ताब्यात
तालिबाननं कंदहार शहरावर ताबा मिळवला आहे. कंदहार हे अफगाणिस्तानातील दुसरं सर्वात मोठं शहर आहे. कंदहारवर एकेकाळी तालिबानचं वर्चस्व होतं. रणनितीच्या दृष्टीनं कंदहार अत्यंत महत्त्वाचं शहर मानलं जातं.
 
तालिबाननं गुरुवारी (12 ऑगस्ट) अफगाणिस्तानातील आणखी काही शहरांवर ताबा मिळवल्याचा दावा केला होता. हेरत, गजनी आणि काला-ए-नाव ही शहरं आपल्या नियंत्रणात असल्याचा दावा तालिबाननं गुरुवारी (12 ऑगस्ट) केला.
 
त्यानंतर तालिबानच्या प्रवक्त्यानं घोषणा केली केली की, "कंदहार आता पूर्णपणे आम्ही जिंकला आहे."
 
काही सूत्रांनी बीबीसीला दिलेल्या माहितीनुसार, लष्कर गाह या दक्षिणेकडील शहरावरही तालिबाननं ताबा मिळवलाय. मात्र, या वृत्तालाही अद्याप दुजोरा मिळाला नाहीय. तालिबान वेगानं अफगाणिस्तानची राजधानी काबुलच्या दिशेनं येतील, याची भीती तीव्र झालीय.
 
बीबीसीचे दक्षिण आशिया संपादक अनबरासन एथिराजन सांगतात की, "तालिबान ज्या वेगानं एक एक शहर ताब्यात घेतंय, ते पाहून लष्करी कारवायांचं विश्लेषण करणाऱ्यांनाही धक्का बसलाय."
 
दुसरीकडे, अमेरिकेनं अफगाणिस्तानातील आपल्या दूतावासातील कर्मचाऱ्यांना सुखरूप मायदेशी आणण्यासाठी जवळपास 3000 सैनिक पाठवण्याचा निर्णय घेतलाय. तसंच, यूकेनं सुद्धा त्यांच्या नागरिकांना मायदेशी आणण्यासाठी 600 सैनिक पाठवण्याचा निर्णय घेतलाय.
 
अमेरिकन आणि परदेशी सैनिकांनी अफगाणिस्तानातून 20 वर्षांनंतर माघार घेतल्यानंतर तालिबाननं वेगानं पुढे जात आहे. अफगाणिस्तानातील एक एक शहर ताब्यात घेतल्याचे दावे तालिबान करत आहे.
 
कंदहार का महत्त्वाचं आहे?
तालिबानचा जन्म कंदहारमध्येच झाला आणि इथेच तालिबानने स्वतःला बळकट केलं. या शहरावर कब्जा करणं तालिबानी कट्टरतावाद्यांसाठी मोठं यश असेल.
 
शहराचे बाह्य भाग तालिबानने फार आधीच व्यापले होते, आता त्यांनी मध्यवर्ती भागात हल्ला करून शहर ताब्यात घेतलं आहे.
 
बुधवारी तालिबान्यांनी कंदहारच्या मध्यवर्ती तुरूंगावर हल्ला केला आणि गुरुवारी शहराच्या मध्यवर्ती भागात बंडखोर पोहचले आहेत याचे फोटो व्हायरल झाले.
 
कंदहारच्या एका रहिवाशाने AFP वृत्तसंस्थेला सांगितलं की इथल्या सरकारी सैन्याने मोठ्या प्रमाणावर माघार घेतली आहे. या शहराबाहेरच्या एका सैन्य तळावर त्यांनी आश्रय घेतला आहे.
 
गुरुवारी तालिबान्यांनी अफगाणिस्तानातलं गझनी हे शहर ताब्यात घेतलं. गझनी तालिबानच्या ताब्यात गेल्याने कट्टरतावाद्यांना फार फायदा होणार आहे. या शहराचं स्थान काबुल-कंदहार महामार्गावर आहे त्यामुळे या भागात त्यांचं वर्चस्व प्रस्थापित होणार आहे.
 
दरम्यान, अफगाणिस्तानातलं आणखी एक जूनं शहर हेरातवर अनेक आठवडे आक्रमण होत होतं. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हीडिओमध्ये बंडखोर शहराच्या मध्यवर्ती भागात गोळीबार करत चाललेत आणि पोलीस मुख्यालयावर तालिबानचा झेंडा फडकतोय असं दिसतंय.
 
कंदहारविषयी बोलायचं झालं तर असं म्हणतात की ज्याच्या ताब्यात कंदहार असतं त्याच्या ताब्यात अफगाणिस्तान असतो.
 
कंदहार अफगाणिस्तानाली सगळ्यात मोठी जमात पश्तून लोकांचं माहेरघर आहे. तालिबानचा जन्मही इथेच झालाय आमि सध्याचे अफगाणिस्तानेच राष्ट्राध्यक्ष हमीद करझाईंचा जन्मही इथलाच.
 
या शहरात असलेला आंतरराष्ट्रीय विमानतळ, शेती आणि उद्योगधंद्यांमुळे कंदहारला विशेष महत्त्व आहे. देशातल्या प्रमुख व्यापार केंद्रापैकी कंदहार एक आहे.
 
कंदहारची स्थापना चौथ्या शतकात सिंकदराने केली होती, असं म्हटलं जातं पण इथे मानव गेल्या 7000 वर्षांपासून राहातोय.
 
कंदहार एका महत्त्वाच्या व्यापारी रस्त्यावर पडतं त्यामुळे या शहरावर कब्जा करण्यासाठी अनेकदा युद्ध झालीयेत.