शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: बुधवार, 2 जून 2021 (16:31 IST)

काश्मिरच्या लहान मुलीचा व्हीडिओ व्हायरल, शाळेतल्या होमवर्कविरोधात थेट पंतप्रधानांनाच तक्रार

जम्मू काश्मिरमध्ये एका चिमुकलीमुळं प्रशासनाला ऑनलाईन शिक्षण विभागाच्या धोरणांबाबत महत्त्वाचा निर्णय घ्यावा लागला आहे. जम्मू काश्मीरच्या नायब राज्यपालांनी ऑनलाईन क्लासेससाठी नवे दिशानिर्देश जाहीर करत त्याच्या कठोर अंमलबजावणीचे आदेश दिले.
 
तातडीनं हे सर्व घडण्याचं कारण म्हणजे सहा वर्षांच्या एका चिमुकलीचा सोशल मीडियावर व्हायरल झालेला एक व्हिडओ आहे.
 
सोशल मीडियावर दोन दिवसांपूर्वी काश्मिरच्या एका चिमुकलीचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला होता. लॉकडाऊनच्या काळात घरात बसून ऑनलाईन क्लासेसला कंटाळलेल्या या चिमुकलीनं तिची तक्रार थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मांडली. विशेष म्हणजे या चिमुकलीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लगेचच त्यावर कारवाईही करण्यात आली आहे.
 
या व्हिडिओमध्ये ही चिमुकली म्हणतेय, "अस्सलाम वालेकुम मोदी साब. मी एक मुलगी बोलतेय आणि मी सहा वर्षांची आहे. मला झूम क्लास बद्दल काही बोलायचं आहे." असं म्हणत या चिमुकलीनं तिच्या तक्रारींचा पाढा वाचला.
 
लहान मुलांना एवढं काम का?
ही काश्मिरी मुली पुढे म्हणाली, "सहा वर्षांची लहान मुलं जी असतात, त्यांना एवढं काम (अभ्यास) का देतात शिक्षक. मी सकाळी 10 ते 2 पर्यंत क्लास करते. इंग्लिश, मॅथ, उर्दू, ईव्हीएस आणि कम्प्युटर.. एवढं काम तर मोठ्या मुलांना असतं, जे सहावी, सातवी दहावीत असतात. लहान मुलांना एवढं काम का देतात मोदी साब."
 
चिमुकलीच्या या तक्रारीची जम्मू-काश्मिरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी लगेचच दखल घेतली आहे. त्यांनी लगेच ट्विटरवर पोस्ट करत 48 तासांत यासाठी नवीन धोरण जाहीर करण्याची घोषणा केली. केवळ घोषणा केली नाही तर यावर तातडीनं कार्यवाहीदेखिल करण्यात आली आहे.
 
चिमुकल्यांना होमवर्क नकोच!
नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी मंगळवारी रात्रीच ट्विटरवर याबाबत घेतलेल्या निर्णयाची माहिती दिली. "जम्मू काश्मीरच्या शालेय शिक्षण विभागानं पहिली ते आठवी पर्यंतच्या मुलांसाठी रोज जास्तीत जास्त दीड तास ऑनलाईन क्लास घेण्याचे निर्देश दिले आहेत. तर नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी तीन तास क्लास घेण्याचे निर्देश दिले आहेत," अशी माहिती राज्यपालांनी स्वतः ट्विट करून दिली.
 
राज्यपालांनी ट्विटमध्ये पुढं म्हटलं की, "संबंधित विभागाने याची काटेकोर अंमलबजावणी होईल याची काळजी घ्यावी. तसंच पाचवी पर्यंतच्या मुलांसाठी गृहपाठ (होमवर्क) देणं टाळायला हवं. मुलांसह पालकांना समावेश करून घेत मुलांना हसत खेळत शिक्षण देण्यासाठी नियोजन करावं."
 
या चिमुकलीच्या तक्रारीची तातडीने दखल घेत त्यावर कारवाई केल्यानंतर राज्यपालांनी अत्यंत महत्त्वाचा संदेशही दिला. ते म्हणाले की, "आपल्या मुलांना खेळण्यासाठी पालकांबरोबर चर्चा करायला हवी. त्यांना जीवन जगण्याचा अनुभव घेण्यासाठी जास्तीत जास्त वेळ मिळायला हवा. कारण मुलांसाठी त्याअनुभवातून मिळणारं शिक्षण सर्वांत मोठं असतं."