शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: बुधवार, 23 ऑक्टोबर 2019 (11:13 IST)

ब्रेक्झिट: ब्रिटन संसेदत बोरिस जॉन्सन यांच्यापुढे अडचणी वाढल्या, UKमध्ये पुन्हा निवडणुका होणार?

ब्रिटनने युरोपीयन महासंघातून बाहेर पडावं, यासाठी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन घाई करत असतानाच त्यांच्या ब्रेक्झिटवाटेत आणखी एक अडथळा उभा झाला आहे.
 
युरोपातून बाहेर पडण्याच्या तरतुदी असलेलं विधेयक बोरिस जॉन्सन यांनी मंगळवारी संसदेत मांडलं. खासदारांनी ते संमत केलं, मात्र ते तीन दिवसात संसदेच्या कनिष्ठ सभागृहात, अर्थात हाऊस ऑफ कॉमन्समध्येही संमत व्हावं, हा जॉन्सन यांचा बेत फसला.
 
हाऊस ऑफ कॉमन्समध्ये खासदारांनी आधी विधेयकाचं समर्थन केलं खरं, मात्र, अवघ्या काही मिनिटांनीच चर्चेसाठी दिलेल्या कमी अवधीवर आक्षेप घेत विधेयकाच्या विरोधात मतदान केलं. त्यामुळे ब्रेक्झिटचं हे घोंगडं अजूनही भिजत पडलंय.
 
जर खासदारांनी ब्रेक्झिटच्या नियोजित घटनाक्रमाला विरोध केला आणि युरोपियन महासंघ ब्रेक्झिटसाठी 31 ऑक्टोबर ही नियोजित अंतिम तारीख वाढवून देत असेल तर पुन्हा निवडणुका होऊ शकतात, असं इशारा याआधी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी दिला होता.
 
संसदेतल्या मतदानावेळी पहिल्या टप्प्यात खासदारांनी ब्रेक्झिट विधेयकाचं समर्थन केलं. त्यावेळी विधेयकाच्या बाजूनं 329 तर विरोधात 299 मतं पडली.
 
मात्र काही मिनिटांनी दुसरा टप्पा पार पडला. यात विधेयकावरील चर्चेसाठी दिलेल्या कमी वेळेचं कारण पुढे करत खासदारांनी विरोधात मतदान केलं. यावेळी 308 जणांनी बाजूनं तर 322 खासदारांनी विरोधी मतदान केलं.
 
मतदानानंतर बोरिस जॉन्सन म्हणाले की ते EUला सांगतील की ब्रेक्झिट 31 ऑक्टोबरपर्यंत व्हायला हवं, मात्र ब्रिटनच्या संसदेने ते रोखलंय.
 
दुसरीकडे, युरोपियन महासंघ समितीचे अध्यक्ष डोनाल्ड टस्क म्हणाले की ते युरोपीय देशांच्या अध्यक्षांना विनंती करतील की ब्रेक्झिटची मुदत पुढे वाढवण्यास अनुमती द्यावी, "जेणेकरून कुठलाही करार न होता ब्रेक्झिट होण्याची स्थिती टाळता येईल".
 
बोरिस जॉन्सन निराश
बोरिस जॉन्सन यांनी म्हटलं, "विधेयक अडवण्यासाठी मतदान झाल्यानं प्रचंड निराश झालोय. आजच्या निकालानं ब्रिटनमधील अस्थिरता वाढेल."
 
जॉन्सन यांनी स्वत:चं दुर्भाग्य स्वत: लिहिलंय, असं विरोधी पक्ष लेबर पार्टीचे नेते जेरेमी कॉर्बिन म्हणाले. ब्रेक्झिटवर चर्चेसाठी संसदेत पुरेसा वेळ दिल्यास त्यावर चर्चा करण्यासाठी आपण तयार असल्याचंही कॉर्बिन यांनी यावेळी म्हटलं.
 
बोरिस जॉन्सन यांची गेल्याच आठवड्यात युरोपियन महासंघाच्या नेत्यांशी नव्या ब्रेक्झिट करारावर सहमती झाली होती. मात्र त्याचबरोबर जॉन्सन सारखे म्हणत होते की, करार होवो किंवा न होवो, ऑक्टोबरच्या अखेरपर्यंत युरोपियन महासंघापासून वेगळे होऊच.
 
Brexit म्हणजे काय?
Brexit हा British Exitचा शॉर्ट फॉर्म आहे. Brexit म्हणजे यूके युरोपियन युनियनमधून बाहेर पडण्याची प्रक्रिया होय.
 
युरोपियन युनियन युरोपमधील 28 देशांचा समूह आहे. हे देश एकमेकांशी व्यापर करतात आणि या देशांतील नागरिकांना सहज जाता येतं आणि कामही करता येतं.
 
जून 2016मध्ये यूकेमध्ये सार्वमत घेण्यात आलं. त्यानुसार 40 वर्षांपासून युरोपियन युनियनचा भाग असलेल्या यूकेने त्यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.
 
अर्थात हे तितकं सरळ नाही. 19 मार्च 2019ला यूके युरोपियन युनियनमधून बाहेर पडणार आहे.