1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: सोमवार, 1 मार्च 2021 (17:28 IST)

अर्थसंकल्पीय अधिवेशन: देवेंद्र फडणवीसांनी आदित्य ठाकरेंवर साधला निशाणा

विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीसांनी आदित्य ठाकरे यांचं नाव न घेता वरळीतील नाईट लाईफच्या अनुषंगाने टीका केली. ते म्हणाले, "वरळीच्या लोकप्रतिनिधीनीनेच नाईट लाईफ सांगितल्यानं, तिथं रात्रभर पब चालू आहेत, कुठलेही सोशल डिस्टंन्सिंग नाही. सोशल डिस्टंन्सिंग शिवजयंतीसाठी. यातून सरकारचा खरा चेहरा समोर येतोय."
 
वरळीमध्ये एक पब रात्रभर सुरू होता यावरून देवेंद्र फडणवीसांनी सरकारवर निशाणा साधला आहे. राज्यपालांच्या अभिभाषणानंतर विधानभवन परिसरात फडणवीसांनी माध्यमांशी संवाद साधला.
 
देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेनंतर पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी पबवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
 
"मुख्यमंत्र्यांचे सल्ले त्यांचे मंत्री ऐकत नाहीत," अशी टीका महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.
 
फडणवीस म्हणाले, "मुख्यमंत्री जनतेला आणि विरोधकांना सल्ला देतात. आपल्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांना सल्ला दिला, तर ते अधिक उचित होईल. अनेक मंत्री स्वत:ला मुख्यमंत्री समजतात. म्हणून ते स्वत:चे निर्णय स्वत:च घेतात. मुख्यमंत्र्यांचे सल्ले त्यांचेच मंत्री धुडकावतात, अशी स्थिती आहे."
 
अर्थसंकल्पीय अधिवेशनाआधी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसकडून पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीविरोधात आंदोलन करण्यात आलं. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि काँग्रेसचे इतर नेते सायकलवरून विधिमंडळात आले. काँग्रेसच्या या आंदोलनावरही फडणवीसांनी टीका केली.
 
"पेट्रोल-डिझेलवरील कुठलातरी सेस अजितदादा कमी करणार आहेत. त्यामुळे त्याचं श्रेय घेण्यासाठी नाना पटोले यांनी आंदोलन केला असण्याची शक्यता आहे. पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधातील सायकल मोर्चा हा मीडिया इव्हेंट आहे. तो केवळ फार्स आहे. जे स्वत:च्या हाती आहे, ते करायचं सोडून दुसऱ्याकडे बोट दाखवण्याचा हा प्रकार आहे," असं फडणवीस म्हणाले.
 
ते पुढे म्हणाले, "राज्यात विरोधी पक्षाची स्पेस काँग्रेसला घेता येणार नाही. कारण देशात काँग्रेस विरोधी पक्षात असतानाही अस्तित्व नाही. काँग्रेसची अवस्था केविलवाणी आहे. त्यात मीडिया इव्हेंट त्यांना करावा लागतो, ते करतायेत."
 
वीज बिलाचा मुद्दा
यावेळी पत्रकारांनी फडणवीसांना विचारलं की, कुठल्या मुद्द्यांवर सरकारला घेरणार आहात? त्यावेळी ते म्हणाले, "वीजबिलांचा मुद्दा सर्वात महत्त्वाचा आहे. भयानक मोठे वीज बिलं देण्यात आली आणि वीज कनेक्शन तोडण्याची मोहीम अशी कधीही महाराष्ट्रात घडली नव्हती. अभूतपूर्वी अशाप्रकारे कनेक्शन तोडण्याचं काम चालू आहे. ही मोगलाई आहे."
तसंच, "शेतकऱ्यांना घोषित केलेले पैसे मिळाले नाहीत, अतिवृष्टीचे पैसे दिले नाहीत, विम्याच्या एजन्सी नेमल्या नाहीत, खरेदी झालेली नाही. त्याचसोबत कायदा-सुव्यवस्थेबाबतही सरकारला घेरण्याचा प्रयत्न करू," असंही फडणवीसांनी सांगितलं.
 
दादरा-नगर हवलेची अपक्ष खासदार मोहन डेलकर आत्महत्या प्रकरणावरही फडणवीस यांनी मत मांडलं. ते म्हणाले, "मोहन डेलकरांच्या आत्महत्येत कुठल्याही भाजप नेत्याचं नाव नाही. मोहन डेलकर यांची आत्महत्या दुर्दैवी आहे. कुठल्याही आत्महत्येची चौकशी झाली पाहिजे."
 
तसंच, फडणवीसांनी मोदींनी लसीकरण केल्याचंही कौतुक केलं. "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: लस घेऊन, लशीबाबत शंका उपस्थित करणाऱ्यांना उत्तर दिलं आहे. दुसऱ्या टप्प्यात लसीकरण मोहीम अधिक वेगवान होईल," असं फडणवीस म्हणाले.