शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: मंगळवार, 9 मार्च 2021 (17:27 IST)

कोरोना पहिला रुग्ण : 'एका वर्षापूर्वी माझा रिपोर्ट आला आणि मी दोन दिवस रडत होते'

राहुल गायकवाड
"आमचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने आम्हाला आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवण्यात आलं. आम्हाला कुठलाच त्रास होत नव्हता. परंतु जेव्हा मोबाईलवर कोरोनाच्या बातम्या यायला सुरुवात झाली त्यानंतर भीती वाटायला सुरुवात झाली. मी पुढचे दोन दिवस रडतच होते."
 
9 मार्च 2020ला महाराष्ट्रामधल्या पहिल्या कोव्हिड 19 पॉझिटिव्ह रुग्णाचं निदान झालं. त्याला आज एक वर्षं पूर्ण होतंय.
राज्यातील पहिल्या कोरोना रुग्ण सविता आणि त्यांचे पती सुरेश (दोन्ही नावे बदलेली आहेत) यांना कोव्हिडची लागण झाली आणि ते राज्यातील पहिले कोरोनाबाधित ठरले. त्यांच्याशी बोलून आम्ही त्यांचे अनुभव जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
 
दुबईची ती ट्रिप
सुरेश आणि सविता यांच्या लग्नाचा 25 वा वाढदिवस साजरा करायला संपूर्ण कुटुंब दुबईला गेले होते. तेव्हा कोरोनाचं वादळ नुकतंच घोंघावायला सुरुवात झाली होती. काही देशातून भारतात येण्यास निर्बंध लादले होते. दुबई मात्र त्या यादीत नव्हतं. त्यामुळे विमानतळावर या गटाची तपासणी झाली नाही. दुबईतच कोरोनाने सुरेश आणि सविता यांचा ठाव घेतला होता आणि त्याचा प्रत्यय पुण्यात आल्यावर आला.
 
दुबईवरून आल्यानंतर सुरेश यांना ताप आणि सर्दी झाल्याने त्यांनी सुरुवातीला त्यांच्या फॅमिली डॉक्टरचा सल्ला घेतला. त्यांनी दिलेल्या औषधांनी सुरेश यांना बरं वाटलं.
 
पण तीन-चार दिवसांनंतरही त्यांना पूर्ण बरं न वाटल्याने त्यांच्या फॅमिली डॉक्टरच्या सल्ल्याने ते पत्नीसह 9 मार्चला नायडू रुग्णालयात तपासणीसाठी गेले. तेथे आणखी काही नागरिक तपासणीसाठी आले होते.
 
रिपोर्ट्स आले तेव्हा सुरेश आणि सविता यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. कोरोनाविरुद्धच्या लढाईची ही सुरुवात होती.
 
"काहींना वाटलं आता आम्ही परत येणारच नाही..."
सुरेश त्यांच्या उपचााराच्या सुरुवातीच्या दिवसांबद्दल बोलू लागले, "आमचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने आमच्या मुलांना देखील तपासणीसाठी बोलावण्यात आलं. मुलीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर मुलाचा निगेटिव्ह आला. पुढे आम्हाला विलगीकरणात ठेवण्यात आलं. खरंतर फॅमिली डॉक्टरांच्या औषधाने मला बरं वाटत होतं. मला तरी सुरुवातीला ताप आला होता. सविताला आणि आमच्या मुलीला कुठलीच लक्षणं नव्हती. त्यामुळे आपल्याला काही होत नाहीये आपण बरे होणार हा विश्वास होता."
"दुसऱ्या दिवसापासून महाराष्ट्रात पहिला रुग्ण सापडल्याच्या बातम्या सर्वत्र सुरू झाल्या. सुरुवातीला डॉक्टर देखील लांबूनच चेक करत होते. जेव्हा बातम्या कळू लागल्या तेव्हा याचा आपल्या समाज जीवनावर काय परिणाम होईल अशी चिंता सतावू लागली. चीनच्या बातम्या पाहिल्यावर तर काहींना असं वाटत होतं की आम्ही हॉस्पिटलमधून परत येणारच नाही," सुरेश सांगत होते.
 
आयसोलेशनचा अनुभव
सुरेश आणि सविता यांना लक्षणं नसल्याने तसा कुठलाही शारिरीक त्रास होत नव्हता. कोरोना, आयसोलेशन, दुरुनच तपासणी करणारे आणि औषधे देणारे डॉक्टर हे सगळं त्यांच्यासाठी नवीन होतं. आयसोलेशन वॉर्डात हे दोघेच आणि चार भिंती. यामुळे वाळीत टाकल्याप्रमाणे त्यांना वाटत होतं.
 
सविता सांगतात, "आमचा रिपोर्ट आला तेव्हा आपल्याला काही होत नाहीये आपण यातून बाहेर पडणार असा विश्वास होता. परंतु जेव्हा आम्हाला फोनवर बातम्या कळू लागल्या तेव्हा भीती वाटण्यास सुरवात झाली. मी दोन दिवस रडत होते. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने माझा काहीसा ताण कमी झाला होता. या संपूर्ण काळात मनाला खूप पॉझिटिव्ह ठेवलं त्यामुळे यातून आम्ही लवकर बाहेर पडू शकलो."
"आम्हाला बरं वाटायला लागल्यावर आम्ही नातेवाईकांना व्हीडिओ कॉल करुन आम्ही ठणठणीत असल्याचं दाखवलं. त्यामुळे त्यांची देखील भीती कमी होण्यास मदत झाली. आयसोलेशन वॉर्डमध्ये असल्याने आणि हा आजार अगदीच नवीन असल्याने सुरुवातीला डॉक्टर नर्सेस देखील लांबूनच पाणी, औषधे देत होते, तेव्हा वाईट वाटायचं. तेथील एक नर्स होत्या त्यांनी आम्हाला खूप मदत केली."
 
काही दिवसांच्या उपचारानंतर पुन्हा दोघांची कोरोना चाचणी करण्यात आली. रिपोर्ट्स निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आलं. त्यांची मुलगी देखील यातून बरी झाली. पुढे महिनाभर ते होम आयसोलेशनमध्ये होते.
 
सकारात्मक दृष्टीकोन
सुरेश सांगतात, "आम्ही घरी आल्यावर सोसायटीमध्ये आमचं स्वागत करण्यात आलं. पुढे महिनाभर आम्ही होम आयसोलेशनमध्ये राहिलो. या काळात आमच्या सोसायटीमधील नागरिकांनी खूप मदत केली. आम्हाला हव्या असणाऱ्या गोष्टी त्यांनी आम्हाला पुरवल्या. ही एक सकारात्मक बाब होती.
 
"आम्ही बरे झाल्यानंतर प्लाझ्मा दान करण्याचा निर्णय घेतला. ससूनमध्ये जेव्हा प्लाझ्मा घेण्याची व्यवस्था सुरू झाली तेव्हा मी सर्वप्रथम प्लाझ्मा दान केलं. माझ्या प्लाझ्मा दान केल्याने दोन अत्यवस्थ रुग्ण बरे झाल्याने आम्हाला खूप आनंद झाला. त्यानंतर आमच्या ओळखीमध्ये ज्यांना कोरोनाची बाधा झाली त्यांना आम्ही आमची कहाणी सांगून धीर देऊ लागलो. त्यामुळे त्यांना मानसिक धक्क्यातून बाहेर येण्यास मदत झाली.
 
"आता एक वर्षानंतर याकडे पाहताना असं वाटतं की असे अनेक प्रसंग आले तरी न थांबता पुढे जात राहणं गरजेचं आहे. या सगळ्यामुळे आयुष्याकडे पाहण्याचा एक नवा सकारात्मक दृष्टीकोन मिळाला. परत असा काळ येऊ नये अशीच प्रार्थना आहे."