गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: सोमवार, 23 मार्च 2020 (14:00 IST)

कोरोना व्हायरस : लैंगिक संबंधांमधूनही होऊ शकतो संसर्ग?

कोरोना व्हायरसचा प्रादूर्भाव जगभरात वाढत आहे. सध्याच्या घडीला तरी कोरोनावरचा सर्वात प्रभावी इलाज सोशल डिस्टन्सिंग आणि स्व-अलगीकरण हेच आहेत.
 
पण जेव्हा डॉक्टर किंवा तज्ज्ञ संसर्ग टाळण्यापासून दूर राहा असं सांगतात, तेव्हा त्यांना शारीरिक संबंधही अभिप्रेत आहेत का, असा प्रश्नही उपस्थित होतोय.
 
लैंगिक संबंधांमधूनही कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो का, कोरोनाचा सेक्स लाइफवर परिणाम होतो का, हे प्रश्नही विचारले जाताहेत.
 
शास्त्रज्ञांच्या मते अजूनपर्यंत तरी कोरोना व्हायरसमुळे होणारा Covid-19 हा आजार लैंगिक संबंधामुळे पसरतो, यासंबंधी कोणताही ठोस निष्कर्ष समोर आलेला नाहीये. मात्र या विषाणूचा संसर्ग हा संक्रमित व्यक्तीच्या अतिशय थेट संपर्कात आल्यामुळे होतो, हे सिद्ध झालंय.
 
ब्रिटीश सरकारनं कोरोना संबंधी घ्यायच्या काळजींबद्दल प्रसिद्ध केलेल्या सूचनांमध्ये लैंगिक संबंधांचाही समावेश आहे. युनिव्हर्सिटी ऑफ एंगलियामधील मेडिसीन विभागातील तज्ज्ञ प्रोफेसर पॉल हंटर यांनी या सूचनांचा अर्थ स्पष्ट केला.
 
पॉल हंटर यांनी सांगितलं, "जर तुमच्या पार्टनरमध्ये कोरोना व्हायरसच्या संसर्गाची कोणतीही चिन्हं दिसत नसतील, तर तुम्ही लैंगिक संबंध ठेवू शकता. पण जर तुमच्या पार्टनरची तब्येत खराब असेल किंवा तुम्हाला संसर्गाची लक्षणं जाणवत असतील तर तुम्ही शारीरिक संबंधांपासून दूर राहणचं चांगलं.
 
सर्वांत महत्त्वाचं म्हणजे कोरोनाचं संकट वाढत असताना तुमच्या पार्टनरशिवाय अन्य कोणाशीही लैंगिक संबंध ठेवू नका, असंही प्रोफेसर हंटर यांनी स्पष्ट केलं आहे
 
न्यूयॉर्कमधील सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनीही लैंगिक संबंधाविषयी मार्गदर्शक तत्त्वं प्रसिद्ध केली आहेत. कोरोनाचा संसर्ग वाढत असताना काय सुरक्षित आहे किंवा काय सुरक्षित नाही, याविषयी त्यांनी स्पष्ट सूचना केल्या आहेत.
 
आवश्यक नसेल तर शारीरिक संपर्क टाळणंच योग्य असं न्यूयॉर्कच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सूचनेमध्ये म्हटलं आहे. चुंबनामुळे कोरोना व्हायरसचा संसर्ग अगदी सहज होऊ शकतो.
 
त्यामुळे सध्याच्या काळात जर तुम्ही सिंगल असाल, तर अजून काही दिवस डेटिंगच्या विचारापासून लांबच राहा किंवा तुमचं प्रेम सुरक्षित अंतरावरून व्यक्त केलेलं अधिक चांगलं.