रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: सोमवार, 6 जुलै 2020 (15:11 IST)

कोरोना व्हायरस : सोनं महागलं, गोल्ड बाँडमध्ये गुंतवणूक करावी का?

ऋजुता लुकतुके
स्वस्तात सोनं विकणारी सरकारी गोल्ड बाँड स्कीम (Sovereign Gold Bond) आजपासून सुरू झाली आहे. गुंतवणूकदारांना प्रतिग्राम 50 रुपये सुट देणारी ही योजना आहे. यामध्ये 4,852 रुपये प्रति ग्राम भावानं सोनं मिळणार आहे. 10 जुलैपर्यंत ही योजना सुरू असणार आहे. गुंतवणूकदारांना या बाँडची ऑनलाईन खरेदी करता येणार आहे. 8 वर्षांसाठी असलेल्या या बाँडवर गुंतवणूकदाराला 2.5 टक्के व्याज मिळणार आहे.
 
जगभरात लॉकडाऊनचे नियम हळूहळू शिथिल होत असले तरी अर्थव्यवस्थेचा गाडा रुळावर यायला अजून बराच काळ लागणार आहे. उद्योगधंदेही अजून सुरू झालेले नाहीत. त्यामुळे मध्यमवर्गीय, लघु, मध्यम उद्योजक यांचं घर आणि उद्योग चालवताना कंबरडं मोडलंय. एकंदरीतच जागतिक अर्थव्यवस्था कोलमडलेली असताना एका गोष्टीने ग्राहकांना मागच्या सहा महिन्यात तब्बल 23 टक्क्यांचा परतावा दिला आहे. तसेच आता उद्योजकांच्या मदतीलाही ते धावून आलं आहे. ते म्हणजे सोनं.
 
झळाळता धातू अशी ओळख असलेलं सोनं... कठीण समयी घराला हातभार लावणारं, आणि कठीण आर्थिक काळात अर्थव्यवस्थेला हातभार लावणारं साधन म्हणून पारंपरिक गुंतवणुकीच्या साधनांमध्ये सोन्याचं महत्त्व आहे. आणि आताही तशीच भूमिका सोनं पार पाडत आहे. भारतात आणि जगातही मागच्या आठवड्यात सोन्याने नवा उच्चांक गाठला आहे.
 
भारतात सोन्याचा दर दहा ग्रॅमला जवळजवळ 47 हजारांवर पोहोचलाय. तर जागतिक बाजारात स्पॉटचा दर प्रतीऔंस 1763 डॉलर इतका आहे. तसेच सध्याचा कल पाहिला तर याच आठवड्यात सोनं प्रतितोळा विक्रमी पन्नास हजारांपर्यंत पोहोचू शकेल.
 
आगामी वर्षातही सोन्याची ही झळाळी कायम राहून 2021 पर्यंत सोनं 82 हजारांवर जाईल असा अंदाज तज्ज्ञांनी पूर्वीच व्यक्त केला आहे. हा अंदाज बँक ऑफ अमेरिका सिक्युरिटीज् नी व्यक्त केलेला आहे. अमेरिकन स्पॉट बाजारात त्यांना सोन्याचं लक्ष्य 3 हजार डॉलर (1 औंसासाठी) इतकं निर्धारित केलं आहे.
 
यात महत्त्वाची गोष्ट ही की, भारतात गेल्यावर्षी सोन्याने गुंतवणुकदारांना 23.7 टक्क्यांचा परतावा दिलेला आहे. तसेच आता सुरुवातीच्या जानेवारी ते मे या पाच महिन्यांच्या काळात हा परतावा 20 टक्के आहे.
 
काही बँकांनी तुमच्याकडे असलेलं सोनं तारण ठेवून त्यावर कर्ज देणाऱ्या योजना आणल्या आहेत. त्यामुळे गरजवंत मध्यमवर्गीय आणि लघु तसंच मध्यम आकाराचे उद्योजकही बँकांकडून मदत मिळवू शकणार आहेत.
 
अशाप्रकारे एकप्रकारे सोनं सामान्य लोकांना मदत करत आहे, त्याचवेळी सोन्यामध्ये लोकांची वाढलेली गुंतवणूक अर्थव्यवस्थेसाठी मात्र दु:स्वप्नासारखी आहे. कारण, सोन्याच्या दरात झालेली वाढ ही जागतिक अर्थव्यवस्थेतली अस्थिरता दाखवते. ही वाढ सुरू राहणार हा तज्ज्ञांचा अंदाज अर्थव्यवस्थेची आगामी काळातली घालमेल दर्शवते.
 
तेव्हा या लेखात सामान्य गुंतवणूकदारांसाठी सोन्याचं महत्त्व, सोन्याचे दर वर-खाली होणं आणि अर्थव्यवस्थेवर त्याचे होणारे परिणाम इथे समजून घेऊया.
 
सोन्याचे भाव का वाढत आहेत?
सध्याच्या इतर अनेक प्रश्नांवर जे उत्तर आहे तेच सोन्याचं ही आहे - कोरोनाचा उद्रेक.
 
पहिला उद्रेक संपून जगभरात लॉकडाऊन शिथिल होत असतानाच चीनसह, जपान आणि कोरियात कोरोनाचा दुसरा उद्रेक सुरू झाल्याच्या बातम्या मध्यंतरी आल्या. तर दोनच दिवसांपूर्वी अमेरिकेत एकाच दिवसांत जवळ जवळ 35 हजार नवे रुग्ण आढळल्यामुळे खळबळ माजली.
 
टेक्सास राज्याने पहिल्यासारखा कडक लॉकडाऊन बसवण्याचा इशारा दिला. तर लॅटिन अमेरिकेतही कोरोनाचा कहर वाढला आहे. अशा परिस्थितीत जगभरातली अर्थव्यवस्था आणखी काही महिने किंबहुना वर्षं अशीच दोलायमान राहील असा अंदाज किंवा भीती आहे. अशा अस्थिर बाजारात सोन्यामधील गुंतवणूक जगभरात वाढली आहे.
 
''आताच्या घडीला सोन्याला मागणी आहे. सुरक्षित गुंतवणूक हा सोन्याचा लौकिक पहिल्यापासून होता. आता सोनं सगळ्यात सुरक्षित गुंतवणुकीचं साधन झालं आहे. शेअर बाजार आणि बाँड्स परतावा देत नसताना सोनं मात्र 20 टक्क्यांचा परतावाही देतंय आणि वर या घडीला ते सुरक्षितही आहे. म्हणून सोन्यात गुंतवणुकीचा कल जगभरात वाढलेला दिसेल.''
 
आनंद राठी कमोडिटिजचे जिगर त्रिवेदी यांनी आताच्या घडीला सोन्याचं महत्त्व समजावून सांगितलं. गुंतवणुकीचं साधन म्हणून सोन्याचा उल्लेख त्यांनी 'सेफ हेवन' म्हणजे सगळ्यात सुरक्षित असा केला.
 
दुसरं म्हणजे कोरोना हे आरोग्यविषयक संकट आहे तसंच त्यामुळे अर्थविषयक संकटही जगभरात निर्माण झालं आहे. त्यामुळे लोकांच्या घरी आर्थिक चणचण निर्माण झाली. आणि ती मिटवण्यासाठी सगळ्याच सरकारांनी लोकांच्या हातात पैसा खेळता राहावा यासाठी काही उपाययोजना केल्या.
 
''भारतातही कर्जाचे व्याजदर कमी करण्यात आले आहेत. प्रॉव्हिडंड फंडाचा मी टक्का कमी करण्यात आला आहे. अशावेळी लोकांच्या हातात पैसा येतो. पण, त्याचबरोबर कर्जाचा हप्ता जसा कमी होतो तसा गुंतवणुकीवर मिळणारा म्हणजे मुदतठेवींवर मिळणारा व्याजदर कमी होतो. त्यामुळे हातात येणारा अतिरिक्त पैसा हा बँकेत कमी व्याजदराने ठेवण्यापेक्षा सोनं किंवा चांगला परतावा मिळेल अशा ठिकाणी गुंतवण्याकडे लोकांचा कल वाढतो.
 
हातात पैसा खेळतो तेव्हा बाजारात महागाईही वाढते. आणि अशावेळी सोन्याचा दरही वाढतो आणि सोन्यात गुंतवणूकही वाढते असं नेहमीच पहायला मिळालं आहे.'' जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे व्ही हरिष यांनी हा मुद्दा स्पष्ट करून सांगितला.
 
सोन्यात नव्याने गुंतवणूक करावी का?
या प्रश्नाचा अर्थ हा की, आताच सोनं इतकं वाढलेलं असताना, नव्याने सोन्यात गुंतवणूक करण्याचा विचार सामान्य गुंतवणूकदारांनी करावा का?
 
वर म्हटल्याप्रमाणे सोन्याचे दर इथून पुढेही वर्षभर वाढत जातील असाच तज्ज्ञांचा अंदाज आहे. शिवाय सगळे पैसे एकाच ठिकाणी न गुंतवता ते विविध साधनांमध्ये कमी अधिक प्रमाणात गुंतवण्याचा सल्ला गुंतवणूक तज्ज्ञ नेहमी देत असतात. आताही त्यांनी याच गोष्टीवर बोट ठेवलं आहे.
 
''सध्या जगभरातच सोन्याचे दर वाढत आहेत. आणि दुर्दैवाने कोरोनाची परिस्थितीही आणखी काही दिवस अशीच राहणार असल्याने सोनं हा गुंतवणूकदारांसाठी सुरक्षित पर्याय असू शकतो.'' त्रिवेदी यांनी आपला मुद्दा मांडला.
 
''सोन्याचे दर वाढतायत म्हणून फक्त तेवढ्यापूरती गुंतवणूक न करता दरवर्षी नियमितपणे सोन्यात गुंतवणूक करणंही चांगलं. जसे शेअर बाजारात, बँकेच्या मुदतठेवीत आपण नियमित पैसे गुंतवतो. तशीच गुंतवणूक सोन्यातही हवी. त्यामुळे गुंतवणुकीत विविधता येऊन तुमची जोखीम कमी होते. शेअर बाजार पडले, मुदतठेवीवरचे दर कमी होतील. त्यावेळी सोन्यातली गुंतवणूक तुम्हाला मदत करेल. जशी आता करते आहे. पण, त्यासाठी सोनं धातू स्वरुपात विकत घेण्यापेक्षा लोकांनी गोल्ड ETF, बाँड यांसारखे पर्यायही बघितले पाहिजेत''
 
गोल्ड ETF आणि पेपर गोल्ड
आता गोल्ड ETF, बाँड हे इतर पर्याय बघू. सोन्यावर लोकांचा विश्वास आहे कारण, त्याच्या किमती शेअर बाजाराप्रमाणे सतत वर-खाली होत नाहीत. त्यात बऱ्यापैकी स्थिरता आहे. म्हणूनच त्यात जोखीम खूप कमी आहे. शिवाय अडल्या गरजेला सोनं विकून पैसे उभे करता येतात ही विश्वास आहे. पण, या व्यवहारांमध्ये सोनं अनेकदा घरी पडून राहतं. त्याचा अर्थव्यवस्थेसाठी पुरेसा वापर होत नाही. शिवाय ते विकत घेताना आणि विकतानाही सोनार आपला घसघशीत वाटा त्यात घेत असतो.
 
''उलट गोल्ड ETF आणि गोल्ड म्युच्युअल फंड हे असे पर्याय आहेत, जिथे सोनं खरेदी तुम्ही करता बाजारात जो दर आहे त्यादराने. बाकी कुठलंही शुल्क तुम्हाला द्यावं लागत नाही.
 
विकतानाही तुम्हाला सोनाराला वजावट द्यावी लागत नाही. सोन्याचा दर वरखाली होतो त्याप्रमाणे तुमचा परतावा तुम्हाला मिळू शकतो. यात धातूरुपी सोनं तिजोरीत जपून ठेवावं लागतं तशी जोखीमही नाही.'' गोल्ड ETFची सोय त्रिवेदी यांनी समजून सांगितली.
 
EFT आणि म्युच्युअल फंडात तुम्ही दर महिन्याला थोडी थोडी गुंतवणूकही करू शकता. अगदी पाचशे रुपयांपासून. त्यामुळे एकरकमी पैसे खर्च करण्याचीही गरज नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे व्यवहार ऑनलाईन करण्याची सोय आहे. आणि तुमच्याकडचे युनिट्स विकल्यावर कमाल तीन दिवसांत पैसे जमा होत असल्याने लवचिकताही राहते.
 
थोडक्यात धातुरुपी सोनं विकत घेण्यापेक्षा अशा नव्या पर्यायांचा विचार करण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.
 
सोनं आणि अर्थव्यवस्था
सामान्य नागरिक म्हणून सोन्याच्या गुंतवणुकीचा आपण विचार केला. पण, त्याचवेळी सोन्याचे असे वाढते दर आणि पुढच्या वर्षभरासाठी तज्ज्ञांनी व्यक्त केलेला अंदाज देशाच्या आणि जगाच्या अर्थकारणाबद्दल नेमकं काय सांगतो?
 
अगदी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे, इतर गुंतवणुकीच्या साधनांमध्ये जसं सरकारी रोखे, कर्जरोखे, बाँड्स, शेअर बाजार, म्युच्युअल फंड यांच्यामध्ये जसा पैसा खेळता राहतो तसा तो धातूरुपी सोन्याच्या खरेदी-विक्रीत राहत नाही. त्यामुळे सर्वसाधारणपणे जागतिक अर्थव्यवस्थांचा कल हा इतर साधनांमध्ये जास्त असतो. पण, जगात युद्ध किंवा इतर काही कारणांमुळे अस्थिरता असेल तर नक्कीच आंतरराष्ट्रीय अर्थकारणातही गोंधळाचं वातावरण निर्माण होऊन देशांचा सोन्याकडे कल वाढतो. म्हणूनच आता फक्त भारतातच नाही तर जगात सगळ्याच देशांत सोन्याचे दर चढे आहेत.
 
आपण घरामध्ये जसं अडल्या गरजेला सोनं विकून पैसा उभा करण्याची तयारी ठेवतो तोच उपयोग देशाच्या अर्थकारणात सोन्याचा आहे. त्यामुळे सोन्याचा हेजिंगसाठी वापर होतो.
 
अमेरिका आणि भारत हे दोन देश असे आहेत जिथे सरकारी तिजोरीत सोन्याचं प्रमाण जास्त आहे. सोन्याच्या दरातील स्थैर्यामुळे सोन्याला सरकारी तिजोरीत हे स्थान आहे. बाहेरच्या देशातून कुठलाही माल आयात करताना आपल्याकडच्या सोन्याचा उपयोग होतो.
 
मग आता सोन्याच्या वाढत्या दराचा देशाला फायदा होईल की तोटा?
भारतात सोन्याला मौल्यवान धातू म्हटलं जातं. सण-समारंभात आणि गुंतवणूक म्हणूनही सोन्याला महत्त्वाचं स्थान आहे. पण, अनेकदा सोनं हे घरात पडून राहतं. ते फिरतं राहत नाही. त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला त्याचा फायदा होत नाही.
 
ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ अभिजीत फडणीस यांनी त्याचा अर्थ समजावून सांगितला. ''आपल्याकडे सोन्याला महत्त्व आहे. पण, दुर्दैवाने सोनं आपल्याकडे बनत नाही. म्हणजे पुरेशा सोन्याच्या खाणी भारतात नाहीत. त्यामुळे गेली कित्येक वर्षं सोनं आपण आयात करत आहोत. आपल्या एकूण आयातीच्या किमान 12 टक्के वाटा हा फक्त सोन्याचा आहे.
 
आंतरराष्ट्रीय व्यवहारात हा पैसा आपल्याला डॉलर देऊन उभा करायचा असतो. म्हणजेच आपल्याकडचं परकीय चलन सोन्यावर खर्च होतं. पण, त्याचा उपयोग सोनं परिधान करण्यापेक्षा वेगळा होत नाही. ही गोष्ट थोडी देशाची चिंता वाढवणारी आहे.''
 
अगदी ताजे म्हणजे 2019-20चे आकडे उपलब्ध नाहीत. पण, त्याच्या आधीच्या वर्षी जगभरात 4,000 टन सोन्याचं उत्पादन झालं होतं. आणि त्यातलं 26 टक्के म्हणजे 1050 टनांच्या वर सोनं एकट्या भारताने आयात केलं.
 
''सोनं घरी बाळगून वैयक्तिक संपत्तीत वाढ होते. पण, देशाच्या संपत्तीत भर पडत नाही. म्हणूनच धातूरुपी सोन्यातली गुंतवणूक सामान्य गुंतवणुकदारांनी कमी करावी. आणि ETF तसंच गोल्ड बाँडचा पर्याय स्वीकारून देशाच्या अर्थव्यवस्थेलाही हातभार लावावा.'' डॉ. फडणीस यांनी आपला मुद्दा पूर्ण केला.