मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: शुक्रवार, 26 फेब्रुवारी 2021 (18:19 IST)

कोरोना व्हायरस : महाराष्ट्रातील शाळांमध्ये कोव्हिड कसा पसरला? SOP पाळली की नाही?

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात कोरोना व्हायरसने पुन्हा डोकं वर काढायला सुरुवात केली आहे. वाढते आकडे लक्षात घेता राज्य सरकारने विविध प्रकारचे निर्बंध लागू केले आहेत.
 
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही रविवारी (21 फेब्रुवारी) फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं होतं. कोरोना संदर्भातील नियम पाळले नाहीत तर पुन्हा कठोर लॉकडाऊन केलं जाईल, असा इशाराही मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिला होता.
 
ही सगळी चर्चा सुरू असतानाच गेल्या दोन दिवसांपासून शाळांमध्ये कोरोनाबाधित विद्यार्थी आढळत असल्याने चिंता वाढली आहे.
 
वाशिम जिल्ह्यातील एका निवासी शाळेत तब्बल 233 कोरोनाबाधित आढळले, तर सोलापूर जिल्ह्यातील एका निवासी शाळेत 50 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. त्याचप्रमाणे सातारा जिल्ह्यातील पुसेगाव येथील शाळेतही 25 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याचं आढळून आलं आहे.
 
कोरोना साथीचा प्रसार रोखण्याच्या दृष्टीकोनातून गेल्या वर्षी मार्च महिन्यात लावण्यात आलेल्या लॉकडाऊननंतर शाळा बंदच होत्या. नंतर साथ थोडीफार नियंत्रणात आल्यानंतर टप्प्याटप्प्याने शाळा सुरु करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. त्यानुसार दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांच्या शाळा तसंच कनिष्ठ महाविद्यालये सुरु करण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला होता.
 
पुढे काही काळ कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत घटही झाली होती. दरम्यान, काही नियम आणि अटींसह माध्यमिक शाळा सुरू करण्यासही राज्य सरकारने परवानगी दिली.
 
मात्र, काही काळाच्या विश्रांतीनंतर कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत सातत्याने वाढ होत असल्याचं गेल्या काही दिवसांपासून दिसून आलं आहे. यामुळे शाळांमध्ये विद्यार्थ्यांची काळजी घेण्यात आली की नाही, प्रशासनाने दिलेल्या नियमावलीचं पालन शाळांमध्ये करण्यात येत आहे किंवा नाही, याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.
 
काय आहेत शाळा सुरू करण्यासाठी केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचना?
 
विद्यार्थ्यांना शाळेत हजर राहण्याची सक्ती करता येणार नाही.
पालकांची लेखी परवानगी असल्याशिवाय विद्यार्थ्याला शाळेत प्रवेश मिळणार नाही.
कंटेनमेंट झोनमध्ये राहत असलेल्या विद्यार्थ्याला शाळेत प्रवेश मिळणार नाही. तसेच त्या भागातील शाळाही सुरू करता येणार नाहीत.
शाळांना आपात्कालीन टास्क फोर्स तयार करण्याच्या सूचना
शाळेत येणाऱ्या प्रत्येकाला मास्क लावणे बंधनकारक आहे. वर्गात विद्यार्थ्यांनाही मास्क लावावे लागणार.
शाळा संस्थाचालकांना शाळेतील प्रत्येक वस्तू सॅनिटाईज करणे बंधनकारक असेल. उदा. शाळांमधील प्रयोगशाळा, ग्रंथालय, वर्ग, शौचालय, फर्निचर, पाण्याची टाकी
शाळा आपल्या सोयीनुसार अभ्यासक्रम आणि वेळापत्रक तयार करू शकतात. यामध्ये सुट्ट्यांचाही समावेश असेल. यासाठी शाळांना NCERT च्या गाईडलाईन्स पाळाव्या लागतील.
शाळा सुरू झाल्यापासून 2-3 आठवडे परीक्षा घेता येणार नाहीत.
 
सूचनांचं पालन केल्याचं शाळांचं स्पष्टीकरण
वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील देगाव निवासी शाळेत 229 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याचं गेल्या दोन दिवसांत समोर आलं. याच शाळेत 4 शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.
 
याठिकाणी विद्यार्थी आणि शिक्षकांच्या प्रकृतीवर लक्ष ठरवण्यासाठी दोन डॉक्टरांसह आरोग्य पथकं तैनात करण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
 
"10 दिवसांपूर्वी देगावच्या निवासी शाळेतील 30 मुलं पॅाझिटिव्ह आढळून आली होती. त्यानंतर शाळेत संसर्ग पसरल्याची शक्यता जिल्हा प्रशासनाने वर्तवली. गेल्या 14 फेब्रुवारीपासून कोरोनाचा विविध जिल्ह्यात संसर्ग पसरल्याचं आढळून आल्यानंतर शाळेतील मुलांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं होतं. विद्यार्थ्यांची योग्य काळजी घेण्यात येत होती.
 
100 टक्के विद्यार्थ्यांची चाचणी करण्यात आली. आरोग्य विभागाची एक टीम दिवसरात्र या शाळेत ठेवण्यात आली आहे, हे पथक विद्यार्थ्यांचं तापमान आणि ऑक्सिजन पातळीची तपासणी करेल. लक्षणं आढळून आल्यास तातडीने उपचार करण्यात येतील," अशी माहिती वाशिमचे जिल्हाधिकारी ष्णमुगराजन एस यांनी दिली आहे.
 
देगावची ही शाळा शिवसेनेच्या वाशिम-यवतमाळच्या खासदार भावना गवळी यांची आहे. या शाळेत कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांची सर्व काळजी घेत असल्याची प्रतिक्रिया गवळी यांनी दिली.
 
मुलांमध्ये इतर कोणत्या तरी कारणामुळे संसर्ग पसरला असण्याची शक्यता आहे. या मुलांना कोणतीही लक्षणं नाहीत, असं त्या म्हणाल्या.
 
मात्र, शाळा सुरू करताना SOP नियमावली पाळली नाही का, या प्रश्नाचं उत्तर देताना त्यांनी म्हटलं की, याबाबत मला अधिक माहिती नाही, शाळा सुरू करताना काय झालं, याबाबत मी सांगू शकणार नाही. आरोग्य अधिकाऱ्यांना याबाबत विचारलं पाहिजे, असं भावना गवळी म्हणाल्या.
 
'तात्काळ शाळा बंद केली, योग्य कार्यवाही केली'
सातारा जिल्ह्यातील पुसेगाव येथील सेवागिरी विद्यालयात 25 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याचं आढळून आलं होतं.
 
याबाबत माहिती मिळाल्यानंतर त्याचं गांभीर्य लक्षात घेऊन तत्काळ शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मुख्याध्यापिका संध्या चौगुले यांनी दिली.
 
सर्वप्रथम 13 फेब्रुवारी रोजी एक विद्यार्थिनी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं शाळेला समजलं. तिच्या आजोबांसह इतर कुटुंबीयांनाही कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं. त्यानंतर लगेचच शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.
 
आरोग्य विभागाशी संपर्क साधून सर्व विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यामध्ये 25 विद्यार्थी कोरोनाबाधित आढळून आले. या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधून माहिती दिली आहे. या मुलांना कोणतीही लक्षणं नाहीत, पण त्यांना आयसोलेट करण्याची सूचना देण्यात आली आहे.
 
"शाळा पुन्हा कधी सुरू करायच्या याबाबतचा निर्णय सोमवारी (1 मार्च) घेण्यात येईल. शाळेने त्वरित निर्णय घेतल्यामुळे पुढील संसर्ग होण्याचा धोका टळला आहे," असं मुख्याध्यापिका चौगुले यांनी सांगितलं.
 
प्रशासनाने काळजी घेणं अपेक्षित
विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण होत असल्याच्या बातम्यांनी सर्वात जास्त चिंताग्रस्त कोण असतील तर तो म्हणजे पालकवर्ग.
 
पुणे येथील पालक सतीश लोखंडे यांच्या मते, कोरोनाचा प्रसार शाळांमधून मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. विद्यार्थी कोरोनासंदर्भातील सूचनांचं पालन किती करतील याबाबत प्रश्नचिन्ह आहे. मुले एकत्रित येऊन खेळतात, संपूर्ण शाळेत फिरतात, एका डब्यात जेवण करतात, त्यामुळे इथं सोशल डिस्टन्सिंगसारखे नियम पाळणं हे जवळपास अशक्य आहे.
 
गेले काही दिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत चालली आहे. अशा स्थितीत शाळा सुरू राहणं हे सर्वांसाठीच धोक्याचं ठरू शकतं, असं लोखंडे यांना वाटतं.
 
लोखंडे यांनी कोरोनाच्या धोक्यामुळे त्यांच्या मुलाला अद्याप शाळेतच पाठवलेलं नाही. संपूर्ण वर्षभर बाहेर न पडता घेतलेल्या काळजीवर पाणी फेरलं जाऊ शकतं, अशी भीती त्यांना वारंवार सतावते, त्यामुळे प्रशासनाने यावर उपाय शोधणं आवश्यक आहे, असंही ते म्हणाले.
 
याविषयी बीबीसी मराठीने शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याशीही संपर्क साधला होता.
 
त्यांनी सांगितलं, "आम्ही याविषयी अधिक माहिती घेत आहोत. शाळांना कोरोना काळात विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या होत्या. स्थानिक प्रशासानाने याची जबाबदारी घेणं अपेक्षित आहे. यासंदर्भात अधिक माहिती मिळाल्यानंतर आम्ही स्पष्ट बोलू."
 
त्याचप्रमाणे कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेता स्थानिक प्रशासनाने जिल्ह्याच्या परिस्थितीनुसार 1 मार्चपासून आवश्यकता भासल्यास व परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत काही काळ शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घ्यावा, असे निर्देशही देण्यात आले आहेत.