मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Updated : बुधवार, 13 जानेवारी 2021 (22:02 IST)

धनंजय मुंडें यांच्यावरील आरोपांमुळे एनडी तिवारींच्या 'त्या' प्रकरणाची आठवण का?

महाराष्ट्रात धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांचे प्रकरण चर्चेत असताना आणि त्यावरुन राजकीय वातावरण तापलेले असताना उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री आणि दिवंगत कॉंग्रेस नेते नारायण दत्त म्हणजेच एन डी तिवारी यांच्याही एका प्रकरणाचा उल्लेख होत आहे.
 
अर्थात, विवाहबाह्य संबंध आणि त्यातून झालेलं अपत्य हा एक मुद्दा वगळता मुंडे आणि तिवारी यांच्या प्रकरणात साम्य नाही. मुंडेंनी अशा संबंधांची आणि अपत्यांची माहिती स्वत: आता जाहीरपणे समाजमाध्यमांवर दिलेली आहे, पण एन डी तिवारींनी न्यायालयात अनेक वर्षं लढा चालल्यानंतर ही कबुली दिली होती.
 
अशा संबंधांव्यतिरिक्तही मुंडे यांच्यावर अन्य आरोप झाले आहेत, पण अद्याप त्याचा तपास झालेला नाही आणि मुंडे यांनी ते आरोप फेटाळले आहेत. तिवारी यांच्यावर असे आरोप झाले नाहीत, पण त्यांचं महिलांविषयीचं वर्तन कायम वादग्रस्त राहिलं.
 
एन डी तिवारी आणि धनंजय मुंडे...दोघेही आपापल्या प्रांतातले जनाधार असलेले नेते. धनंजय मुंडे हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आहे, महाराष्ट्रात मंत्री आहेत आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते राहिलेले आहेत.
 
एन डी तिवारी केंद्रात अनेक महत्वाच्या जबाबदा-या स्वीकारलेले कॉंग्रेसचे मंत्री होते, अगोदर एकसंध उत्तर प्रदेश आणि नंतरच्या उत्तराखंडचे मुख्यमंत्री होते, आंध्र प्रदेशचे राज्यपाल होते.
 
सध्या चर्चेत असलेल्या गोष्टी या जरी वैयक्तिक आयुष्यातल्या असल्या तरीही त्यांचा राजकीय आणि सामाजिक जीवनावर परिणाम झाल्याशिवाय राहात नाही. तिवारी हे त्याचं उदाहरण होते आणि राजकीय इतिहासात अन्यही उदाहरणं आहेत. त्यामुळेच एन डी तिवारींच्या प्रकरणाची आज चर्चा सुरु आहे.
 
एन डी तिवारींचं प्रकरण काय होतं?
 
तिवारींचं प्रकरण 2008 मध्ये राष्ट्रीय हेडलाईन बनलं जेव्हा रोहित शेखर हे न्यायालयात गेले. रोहित यांचा दावा होता की, ते एन डी तिवारी यांचे पुत्र आहेत. त्यांच्या आई उज्ज्वला शर्मा आणि तिवारी यांच्या संबंधांतून 34 वर्षांपूर्वी रोहित यांचा जन्म झाला. तिवारी हे नाकारत राहिले.
 
पण शेवटी 2012 मध्ये दिल्ली उच्च न्यायालयानं त्यांना 'डीएनए' टेस्ट करण्याचे आदेश दिले. न्यायालयानं हेही सांगितलं की, त्यासाठी जर तिवारींनी सहकार्य केलं नाही तर पोलिसांची मदत घेतली जावी. तिवारी या आदेशाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात गेले, पण तिथंही निकाल त्यांच्या विरुद्ध गेला. सहा वर्ष न्यायालयीन लढाई लढणा-या रोहित आणि उज्जवला शर्मा यांना न्याय मिळाला.
शेवटी एन डी तिवारी यांनी त्यांचे हे नातं मान्य केलं. तेव्हा त्यांनी म्हटलं,"रोहित हे माझे पुत्र आहेत आणि डीएनए टेस्टने पण हे सिद्ध झालं आहे."
 
त्यावेळेस उज्ज्वला शर्मा यांनीही 'बीबीसी'ला प्रतिक्रिया दिली होती की,"आम्ही खूप तणावाखाली होतो. पण आता मोकळं वाटतं आहे. न्यायालयीन लढाई लढणं हे सोपं काम नव्हतं."
 
पण हे केवळ स्वीकारून तिवारी थांबले नाहीत, तर त्यांनी 2014 मध्ये उज्ज्वला शर्मा यांच्याशी लग्नही केलं. तेव्हा ते 89 वर्षांचे होते. त्यांनी रोहित शेखर यांना आपला राजकीय वारसदार म्हणूनही घोषित केलं. पण तोपर्यंत कॉंग्रेसमधलं त्यांचं वजन तोपर्यंत संपुष्टात आलं होतं.
 
वयाच्या 91व्या वर्षी अगदी जर्जर अवस्थेत असतांना आपल्या या मुलाला घेऊन तत्कालीन भाजपाचे अध्यक्ष असलेल्या अमित शाह यांना ते भेटायला गेले होते. पण उशीरानं पालकत्व स्वीकारलेल्या मुलाचं राजकीय करियर ते उभारु शकले नाहीत.
 
तिवारी यांचं हे विवाहबाह्य संबंधांचं प्रकरण त्यांच्या आयुष्याच्या शेवटाशी त्यांना त्रासदायक ठरलं. ते सुरुवातीला नाकारत राहिले, पण सध्या चर्चेत असणा-या धनंजय मुंडे यांनी मात्र त्यांच्या संबंधांची आणि अपत्यांची कबुली जाहीरपणे आरोप होताच दिली आहे. ते त्यांच्या राजकीय करियरच्या सुरुवातीच्या टप्प्यात आहेत.
 
आंध्रचे राज्यपाल असतांनाही तिवारी वादांमध्ये
 
तिवारी हे अराजकीय कारणांमुळेही राजकारणात कायमच चर्चेत राहिले. 2007 मध्ये ते मुख्यमंत्री असतांना उत्तराखंडमध्ये कॉंग्रेसचा पराभव झाला आणि तिथं भाजप सत्तेत आला. पायउतार झालेल्या तिवारींना मग आंध्र प्रदेशचं राज्यपालपद मिळलं. पण तिथं त्यांच्यावर 'सेक्स स्कँडल'चे आरोप झाले. त्याचा एक व्हीडिओसुद्धा बाहेर आला आणि तिवारी वादांमध्ये अडकले.
 
त्यांनी या सगळ्या प्रकरणाला त्यांच्याविरुद्धचं राजकीय षड्यंत्र म्हटलं, पण त्या आरोपांपासून ते स्वत:चा बचाव फार काळ करु शकले नाहीत. 2009 मध्ये त्यांना राज्यपालपदाचा राजीनामा देऊन डेहरादूनला परत यावं लागलं.
 
तिवारी हे कॉंग्रेसचा युवा कार्यकर्ता असल्यापासून एकेक टप्पे पार करत स्वत:चं नेतृत्च मोठे करत गेलेले नेते होते. उत्तरांचलच्या पट्ट्यात आजही त्यांचं नेतृत्व आजवरचं सर्वात मोठं मानलं जातं. त्यांच्या प्रदेशासोबतच केंद्रीय पातळीवरही त्यांनी मोठ्या जबाबदा-या स्वीकारल्या, आंतराष्ट्रीय संबंध आणि अर्थव्यवस्थेचं भान त्यांना होतं. उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड या दोन्हींचे मुख्यमंत्री होणारे ते एकमेव. पण असा राजकीय पट असणा-या तिवारींच्या उत्तरकाळात समोर आलेल्या वादग्रस्त घटना अधिक कर्कश ठरल्या.
 
विवाहाव्यतिरिक्त संबंधांसोबतच धनंजय मुंडेंवर बलात्काराचे आरोपही करण्यात आले आहेत. ते अद्याप आरोप आहेत. शहानिशा होऊन गुन्हा दाखल झाला नाही आहे आणि तपासही झालेला नाही आहे. पण अशा घटनांचा परिणाम राजकीय कारकीर्दीवर होऊ शकतो, हे एनडी तिवारी यांच्या बाबतीत दिसून आलं.