गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By

स्थलांतरित वडील आणि 23 महिन्यांच्या लेकीचा हा फोटो तुमचं हृदय पिळवटून टाकेल

2015 मधल्या एका फोटोमुळे जगभरातल्या लोकांच्या डोळ्यांत पाणी आलं होतं. हा फोटो होता समुद्रकिनाऱ्यावर वाहून आलेल्या 3 वर्षांच्या अयलान कुर्दीच्या मृतदेहाचा.
 
या फोटोची पुन्हा आठवण येण्याचं कारण म्हणजे हेलावणारा असाच आणखी एक फोटो समोर आला आहे.
 
अमेरिकेच्या हद्दीमध्ये शिरण्याच्या प्रयत्नात एक बाप-लेक नदीत वाहून गेले. या दोघांच्या मृतदेहाचा फोटो मन पिळवटवणारा आहे.
 
अमेरिकेत प्रवेश करण्याच्या प्रयत्नात आपला जीव धोक्यात घालू नका, अशी सूचना एल् साल्वाडोरच्या सरकारने आपल्या नागरिकांना दिली आहे.
 
रिओ ग्रॅण्ड नदीमध्ये बुडून एका बाप-लेकीचा मृत्यू झाल्यानंतर सरकारने ही सूचना दिली.
 
वडील आणि त्यांच्या मानेला घट्ट कवटाळलेल्या 23 महिन्यांच्या मुलीच्या मृतदेहाचा फोटो हृदयद्रावक आहे आणि जगभरातून याविषयी प्रतिक्रिया उमटत आहेत.
 
अमेरिका आणि मेक्सिकोने कागदपत्रांशिवाय येणाऱ्या स्थलांतरितांचे लोंढे रोखण्यासाठी आपले नियम अधिक कडक केले आहेत.
 
हे बहुतांश लोक मध्य अमेरिकेतील आहेत आणि गेल्या काही दिवसांत असे सहा बळी गेले आहेत.
 
होडुरास, ग्वाटेमाला आणि एल् साल्वाडोर मधील हिंसाचार आणि गरीबीपासून दूर जात अमेरिकेमध्ये आसरा घेत असल्याचं बहुतांश स्थलांतरितांचं म्हणणं आहे.
 
डोनाल्ड ट्रंप यांनी इमिग्रेशन (एखाद्या दुसऱ्या देशात वास्तव्यासाठी जाणे)साठीचे नियम कडक केल्यानेच स्थलांतर करू पाहणाऱ्यांना असे धोकादायक मार्ग अवलंबावे लागत असल्याची टीका होत आहे.
 
युएस बॉर्डर पट्रोल (US Border Patrol ) च्या आकडेवारीनुसार 2018मध्ये अमेरिका-मेक्सिको बॉर्डरवर किमान 283 लोकांचा मृत्यू झाला. पण हा आकडा अजून मोठा असल्याचं मानवी हक्क कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे.
 
मेक्सिकोच्या उत्तरेकडील टामॉलिपास राज्यातल्या माटामोरोसमधून अमेरिकेतल्या टेक्सासच्या हद्दीत जाण्याचा प्रयत्न करताना ऑस्कर अल्बर्टो मार्टिनेझ रामिरेझ (25) आणि त्यांची मुलगी वॅलेरिया वाहून गेले.
 
त्यांच्या नदीकाठी वाहून आलेल्या मृतदेहाचा पत्रकार जुलिया ल ड्युस यांनी काढलेला फोटो ला जॉर्नाडा या मेक्सिकन वर्तमानपत्रात छापून आला.
 
"मला अशी आशा आहे की या फोटोनंतर तरी कोणीतरी याविषयी काहीतरी करेल आणि यापुढे आम्हाला नदीत वाहून गेलेल्या लोकांच्या मृतदेहांचे फोटो काढावे लागणार नाही," जुलियांनी बीबीसीसोबत बोलताना सांगितलं.
 
काय घडलं त्या दिवशी...
आपण मेक्सिकोमध्ये दोन महिने ह्युमॅनिटेरियन (मानवतावादी) व्हिसावर राहिल्याचं रामिरेझ यांची पत्नी आणि वॅलेरियाची आई तानिया वनेस्सा आवालोस (21) यांनी सांगितल्याचं एपी वृत्तसंस्थेने म्हटलं आहे.
 
अमेरिकन अधिकाऱ्यांची भेट घेऊन अमेरिकेत आश्रय मिळवण्यात अपयश आल्याने निराश झालेल्या या कुटुंबाने नदी ओलांडण्याचा निर्णय घेतला.
 
रामिरेझ यांनी मुली सोबत नदी ओलांडली आणि लेकीला पलिकडच्या किनाऱ्यावर ठेऊन ते बायकोला नेण्यासाठी परत येत होते असं तानिया यांनी मेक्सिकन पोलिसांना सांगितलं.
 
पण नदी किनाऱ्यावर एकटी असलेली वॅलेरिया घाबरली आणि वडीलांपाठोपाठ नदीत उतरली. रामिरेझ लेकीसाठी मागे आले, पण नदीच्या प्रवाहाने या दोघांनाही ओढून नेलं.
 
"त्यांनी जाऊ नये म्हणून मी विनवण्या केल्या, पण त्याला घर बांधण्यासाठी पैसे कमवायचे होते," ऑस्कर रामिरेझ यांची आई रोसा रामिरेझ यांनी एपी वृत्तसंस्थेला सांगितलं.
 
काय प्रतिक्रिया उमटल्या?
बेकायदेशीरपणे स्थलांतर करण्यासाठी आपलं आयुष्य धोक्यात घालू नये, असं आवाहन एल् साल्वाडोरच्या परराष्ट्र मंत्री अलेक्झांड्रा हिल यांनी केलं आहे.
 
हे दोन मृतदेह परत आणण्यासाठी लागणारा खर्च करणार असल्याचं सरकारने जाहीर केलं असून रामिरेझ यांच्या नातेवाईकांना आवश्यक ती मदत करणार असल्याचं सांगितलं आहे.
 
अशा धोकादायक रीतीने सीमा ओलांडू नये असं मेक्सिकोचे अध्यक्ष आंद्रे मॅन्युएल लोपेझ ओब्राडोर यांनी म्हटलं आहे. हे मृत्यू अतिशय खेदजनक असल्याचं त्यांनी म्हटलंय.
 
"वाळवंटामध्ये किंवा रिओ ग्रांदे नदी ओलांडताना लोकांचे बळी जाण्याचा आम्ही नेहमीच निषेध केला आहे. असे जीव जावेत अशी आमची इच्छा नाही."
 
पोप फ्रान्सिस यांनीही हा फोटो पाहिला असल्याचं सांगत व्हॅटिकनने एका निवेदनात म्हटलं, "या मृत्यूंमुळे पोप अतिशय दुःखी झाले असून ते त्यांच्यासाठी तसंच युद्ध आणि गरीबीपासून दूर जाण्याच्या प्रयत्नात आयुष्य गमावलेल्या सर्व स्थलांतरितांसाठी प्रार्थना करत आहेत."
 
डॉनल्ड ट्रंप काय म्हणाले?
हा क्लेशदायक फोटो पाहिल्यानंतर त्यांनी गुरुवारी पत्रकारांना सांगितलं, "आय हेट इट."
 
"तो माणूस...कदाचित एक चांगला बाप असावा," ते म्हणाले.
 
"हा प्रवास खूप खूप धोकादायक आहे. आणि इतरही खूप गोष्टी घडलेल्या आहेत. स्त्रियांवर बलात्कार झालेत. अनेक महिलांवर बलात्कार होत असल्यावर कोणाचा विश्वास नाही."
 
बेकायदेशीरपणे देशात येण्याचा प्रयत्न करणाऱ्या स्थलांतरितांच्या मृत्यूसाठी विरोधी पक्षातील डेमोक्रॅट्सना अमेरिकेच्या अध्यक्षांनी दोष दिलाय. आपली सीमाविषयक धोरणं विरोधीपक्षातल्या डेमोक्रॅट्सनी नाकारल्याने हे घडल्याचं त्यांनी म्हटलंय.
 
"जर कायदा केला असता तर हे घडलं नसतं," ते म्हणाले.
 
या फोटोची तुलना सिरीयन अयलान कर्दीच्या फोटोशी होतेय. सिरीयतल्या युद्धामुळे झालेल्या मनुष्यहानीचं हा फोटो द्योतक बनला होता.
 
अमेरिकेच्या दिशेने येणाऱ्या स्थलांतरितांची संख्या कमी करण्यासाठी या महिन्याच्या सुरुवातीला मेक्सिकोने ट्रंप प्रशासनासोबत करार केला. तेव्हापासून अशा स्थलांतरितांना ताब्यात घेण्याच्या किंवा परत पाठवण्याच्या घटनांचं प्रमाण वाढलेलं आहे.
 
दरम्यान, अमेरिका-मेक्सिको सीमाभागासाठी मदत म्हणून अमेरिकन हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हजमधल्या डेमोक्रॅट्सनी 4.5 बिलीयन डॉर्लसचा निधी मंजूर केला. पण हे विधेयक रिपब्लिकन वर्चस्व असणाऱ्या सिनेटमध्ये मंजूर होणं गरजेचं आहे.
 
ट्रंप यांनी देशाच्या दक्षिणेकडील सीमाभागामध्ये फेब्रुवारीमध्ये आणीबाणी जाहीर केली होती. तिथल्या अडचणी सोडवण्यासाठी हे गरजेचं असल्याचं त्यांनी म्हटलं होतं.