- इक्बाल अहमद
अवतार सिंह संधू ऊर्फ कवी पाश (1950-1988) यांना श्रद्धांजली वाहताना हिंदी साहित्यातले प्रसिद्ध टीकाकार, लेखक आणि विचारवंत डॉ. नामवर सिंह यांनी म्हटलं होतं की पाश हे एक शापित कवी होते. क्रांतिकारक पंजाबी कवी असणाऱ्या पाश यांनी 'सबसे खतरनाक होता है हमारे सपनों का मर जाना' सारख्या कविता लिहील्या होत्या. अमृता प्रीतम यांच्या नंतरचे पाश हे दुसरे असे कवी आहेत ज्यांना हिंदी रसिकही आपलं मानतात जेवढं पंजाबी रसिक.
तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींच्या हत्येनंतर (1984) पाश यांनी लिहीलं होतं, 'आज उसके शोक में सारा देश शरीक है तो उस देश से मेरा नाम काट दो. अगर उसका अपना कोई भारत है तो उस भारत से मेरा नाम काट दो.'
पण विचित्र योगायोग म्हणजे इंदिरा गांधींविषयी अशी कविता लिहीणाऱ्या पाश यांची 23 मार्च 1988ला खलिस्तानी अतिरेक्यांनी गोळी घालून हत्या केली. ते कविता म्हणत असतानाच त्यांची हत्या करण्यात आली. त्यावेळी ते फक्त 38 वर्षांचे होते. कदाचित म्हणूनच नामवर सिंह यांनी त्यांना शापित कवी म्हटलं असावं.
पाश आणि फैज
ऊर्दू मधले प्रसिद्ध कवी फैज अहमद फैज (1911-1984) यांची एक प्रसिद्ध कविता 'हम देखेंगे' विषयी आयआयटी कानपूरने एका चौकशी समितीची स्थापना केली आहे. ही कविता हिंदू विरोधी आहे का, हे ही समिती ठरवणार आहे.
नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात देशभर निदर्शनं होत आहेत. दिल्लीच्या जामिया भागामध्ये 15 डिसेंबरला या कायद्याच्या विरोधात निदर्शनं झाली होती. यामध्ये जामिया मिलिया इस्लामिया म्हणजेच जामिया विद्यापीठाचे काही विद्यार्थीही सहभागी झाले होते. यावेळी पोलिसांनी विद्यापीठाच्या लायब्ररी आणि हॉस्टेलमध्ये जात विद्यार्थिनींसह अनेकांना मारहाण केली होती.
आयआयटी व्यवस्थापनाने तपास का सुरू केला?
जामिया विद्यापीठातल्या घटनेनंतर या विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी देशातल्या अनेक शिक्षण संस्थांमध्ये निदर्शनं झाली. आयआयटी कानपूरच्या विद्यार्थ्यांनी 17 डिसेंबरला संस्थेच्या परिसरात निदर्शनं केली. यादरम्यान काही विद्यार्थ्यांनी फैज अहमद फैज यांची नज्म - 'हम देखेंगे' गायली.
संस्थेच्या परिसरामध्ये एका अशा कवितेचं वाचन करण्यात आलं ज्याने हिंदूंच्या भावनांना ठेच लागू शकते, अशा स्वरूपाची लेखी तक्रार यानंतर आयआयटीच्या संचालकांकडे केल्याचं आयआयटी कानपूरचे उपसंचालक मणिंद्र अगरवाल यांचा दाखला देत वृत्त संस्थांनी म्हटलं आहे. यानंतर आयआयटी व्यवस्थापनाने याविषयी तपास समिती स्थापन केली आहे.
फैज हे कम्युनिस्ट विचारसरणीचे होते हे जगजाहीर आहे. त्यांच्या ज्या 'हम देखेंगे...' या सुप्रसिद्ध कवितेचा उल्लेख होतोय, ती त्यांनी 1979मध्ये लिहीली होती. पाकिस्तानचे तेव्हाचे हुकुमशहा जनरल झिया-उल-हक यांच्या विरोधात ही कविता लिहीण्यात आली होती.
फैज यांचं 1984मध्ये निधन झालं. आणि 1986मध्ये लाहोरच्या अल-हमरा आर्ट्स काऊन्सिलच्या ऑडिटोरियममध्ये गझल गायिका इक्बाल बानो (1935-2009) यांनी ही नज्म गात अजरामर केली.
लष्करी हुकुशहाच्या विरोधातली कविता
साडी नेसणं हे 'गैर- इस्लामी' असल्याचं ठरवत झिया उल हक यांच्या राजवटीच्या काळात पाकिस्तानी महिलांना साडी नेसण्यावर बंदी घालण्यात आली होती. पण विशेष म्हणजे इक्बाल बानो यांनी या हुकुमशाहीला विरोध करत पांढऱ्या रंगाची साडी नेसून ही नज्म गायली. या कार्यक्रमाचं रेकॉर्डिंग पाकिस्तानातून लपूनछपून स्मगल करून बाहेर नेण्यात आलं आणि ही नज्म सगळ्या जगापर्यंत पोहोचली.
एका स्वघोषित कम्युनिस्टाने एका लष्करी हुकुमशहाच्या विरोधात लिहीलेली कविता 'हिंदू विरोधी' असल्याचं आज भारतात काहीजण सांगण्याचा प्रयत्न करत आहेत.
या समितीचा निर्णय काय असेल, ते माहीत नाही पण भारतात आज ज्या विचारसरणीचं सरकार आहे ते फैज यांनी ही कविता लिहीली त्यावेळच्या पाकिस्तानातल्या सरकारइतकंच उजव्या विचारसरणीचं असल्याचे संकेत अशा प्रकारची चौकशी समिती स्थापन करण्यातून मिळतात.
फक्त कवी फैजच नाहीत तर प्रसिद्ध इतिहासकार प्राध्यापक इरफान हबीबदेखील सध्या चर्चेत आहेत.
कालपर्यंत इरफान हबीब यांना विरोध करणारेही आज त्यांचे चाहते झाले आहेत.
नेमकं काय घडलं?
केरळच्या कुन्नूर विद्यापीठामध्ये इंडियन हिस्ट्री काँग्रेसचं वार्षिक अधिवेशन सुरू होतं. पाहुण्यांमध्ये केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांचाही समावेश होता.
मौलाना अब्दुस कलाम आझाद यांचा दाखला देत आरिफ मोहम्मद खान यांनी म्हटलं होतं, "देशाच्या फाळणीमुळे घाण वाहून गेली, पण अजूनही काही खड्डे उरलेयत ज्यामध्ये पाणी साचलंय आणि त्याला आता दुर्गंधी येतेय."
त्याच व्यासपीठावर बसलेल्या इरफान हबीब यांनी राज्यपाल खान यांच्या या वक्तव्याचा निषेध केला. इरफान हबीब यांनी आपल्यासोबत गैरवर्तन केल्याचा आरोप राज्यपालांनी केला. तर राज्यपालांनी मौलानांना चुकीचं 'कोट' केल्याचा आणि भारतीय मुसलमानांबद्दल अपशब्द वापरल्याचा आरोप इरफान हबीब यांनी केला.
पण राज्यपालांनी मौलाना आझादांचा चुकीचा दाखला दिला किंवा प्राध्यापक इरफान हबीब यांनी मध्येच थांबवत प्रोटोकॉलचं उल्लंघन केलं, हा इथे मुद्दा नाही.
मूळ मुद्दा असा की प्राध्यापक इरफान हबीब हे जाहीरपणे कम्युनिस्ट आहेत. ते अगदी कार्डहोल्डर 'कॉम्रेड' आहेत. इरफान हबीब हे पक्के कम्युनिस्ट आहेत म्हणजे आपल्यालेखी ते इस्लामच्या विरोधात असल्याचं सांगत अलिगढमधल्या कट्टर मुस्लिमांनी त्यांना आयुष्यभर विरोध केलाय.
पण त्यांना आजवर इस्लाम विरोधी म्हणवणारे आता अचानक इरफान हबीब यांचे समर्थक झाले आहेत.
सत्तेला विरोध करणारा शापित असतो का?
फैज यांच्यासोबतच पाकिस्तानातले आणखी एक मोठे शायर हबीब जालिब (1928-1993) देखील चर्चेत आहेत. हबीब जालिब यांची नज्म - 'दस्तूर' सध्या भारतात गायली जातेय.
1962मध्ये पाकिस्तानचे तेव्हाचे हुकुमशहा जनरल अय्युब खान यांनी एक नवीन घटना लागू केली. याच्या विरोधात हबीब जालिब यांनी ही नज्म लिहिली होती. या आणि इतर अनेक कवितांमुळे त्यांना अनेकदा तुरुंगातही डांबण्यात आलं होतं.
भारतामध्ये सध्या सुरू असणाऱ्या सरकारविरोधी आंदोलनांमध्ये काही जण ही कविता म्हणत आहेत, किंवा या कवितेच्या ओळी असणारी पोस्टर्स आणि बॅनर्स पहायला मिळत आहेत.
सत्तेचा दरबार आणि जनतेचा दरबार असे एकूण दोनच दरबार असतात, असं हबीब जालिब यांचं म्हणणं होतं. ते स्वतःला अभिमानाने 'अवामी शायर' म्हणजे लोककवी म्हणवत.
नामवर सिंह यांनी पाश यांना शापित कवी म्हणणं अगदी योग्य होतं. कारण सत्तेचा विरोध करणारा प्रत्येक कवी, लेखक आणि कलाकार खरंतर शापितच असतो.
फैज यांची नज्म - हम देखेंगे
हम देखेंगे
लाज़िम है कि हम भी देखेंगे
वो दिन कि (क़यामत का) जिसका वादा है
जो लोह-ए-अज़ल (विधि के विधान) में लिखा है
जब ज़ुल्म-ओ-सितम के कोह-ए-गरां (बड़े पहाड़)
रुई की तरह उड़ जाएँगे
हम महकूमों (शासितों) के पाँव तले
ये धरती धड़-धड़ धड़केगी
और अहल-ए-हकम (सत्ताधीश) के सर ऊपर
जब बिजली कड़-कड़ कड़केगी
जब अर्ज-ए-ख़ुदा के काबे से सब बुत (मूर्ति यहां सत्ता का प्रतीक) उठवाए जाएँगे
हम अहल-ए-सफ़ा (साफ़-सुथरे लोग) मरदूद-ए-हरम (प्रवेश से वंचित लोग)
मसनद पे बिठाए जाएँगे
सब ताज उछाले जाएँगे
सब तख़्त गिराए जाएँगे
बस नाम रहेगा अल्लाह का
जो ग़ायब भी है हाज़िर भी
जो मंज़र (दृश्य) भी है नाज़िर (दर्शक) भी
उट्ठेगा अन-अल-हक़ (मैं सत्य हूं) का नारा
जो मैं भी हूँ और तुम भी हो
और राज करेगी ख़ल्क़-ए-ख़ुदा (आम जनता)
जो मैं भी हूँ और तुम भी हो
फैज यांची मुलगी म्हणते...
फैज अहमद फैज यांची नज्म - 'हम देखेंगे' ही हिंदू विरोधी आहे वा नाही हे तपासण्यासाठी आयआयटी कानपूरने समिती स्थापन केली. या नज्मला हिंदू विरोधी म्हणणं हास्यास्पद असल्याचं फैज यांच्या मुलीने म्हटलंय.
जे लोकांना म्हणायचं होतं तेच आपले वडील लिहायचे असं चित्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्या सलीमा हाश्मी यांनी म्हटल्याचं इंडियन एक्स्प्रेसने म्हटलंय.
त्यांनी म्हटलंय, "फैज अहमद फैज यांच्या 'हम देखेंगे'ला हिंदू विरोधी म्हणणं दुःखद नाही तर हास्यास्पद आहे. या कवितेतून देण्यात आलेल्या संदेशाची एक समिती तपासणी करणं हे दुःखद नाही. उलट त्यांची उर्दू शायरी आणि त्याच्या रुपकांमध्ये रस निर्माण होईल अशा दुसऱ्या दृष्टीकोनातून याकडे पहायला हवं. फैज यांच्या ताकदीला कमी लेखू नका."
सर्जनशील लोक हे 'हुकुमशहांचे नैसर्गिक शत्रू' असतात, असं सलीमा हाशमी यांनी म्हटलंय.
या कवितेच्या माध्यमातून आपले वडील कबरीच्या बाहेर येऊन लोकांशी बोलत असल्याचा आपल्याला आनंद असल्याचं त्यांनी म्हटलंय.
त्या म्हणाल्या, "सीमेच्या या बाजूला किंवा दुसऱ्या बाजूला फैज यांची कविता अजूनही लागू होते यात आश्चर्य वाटण्याजोगं काही नाही. नेपाळमध्ये राजघराण्याच्या विरोधातल्या लोकशाहीसाठीच्या आंदोलनादरम्यान ही नज्म गाण्यात आल्याचं मला काही वर्षांपूर्वी सांगण्यात आलं होतं."