रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: बुधवार, 1 डिसेंबर 2021 (20:03 IST)

ऑफिसमध्ये सारखी कुरकुर करणारे सहकारी वातावरण नकारात्मक कसं बनवतात

ब्रायन लफकिन
वारंवार तक्रार करणारे सहकारी तुमचा दिवस खराब करू शकतात. त्याचबरोबर संपूर्ण टीमच्या कामावरही त्याचा परिणाम होऊ शकतो.
 
कदाचित तुम्हाला तुम्ही करत असलेलं काम आवडत नसेलही, पण अनेकदा तुम्ही ते व्यवस्थिपणे करत असता. पण एखाद्या ठिकठाक दिवशीही ऑफिसातलं वातावरण अचानक बिघडतं. त्याचं कारण असतं कामाबाबत आणि ते काम किती खराब आहे, याबाबत सातत्यानं तक्रार करणारा एखादा सहकारी.
आपली सुटी कशी नाकारली, काम किती कंटाळवाणं आहे, बॉसचा ते किती तिरस्कार करतात अशा तक्रारी, असे सहकारी करत असतात. अशा या सततच्या तक्रारी करणाऱ्यामुळं तुमचा कामाचा दिवस कसा खराब होतो, हेही तुमच्या हळुहळू लक्षात येऊ लागतं.
त्यामुळं तुम्हालाही अनेकदा तुमचं काम नकोसं वाटू लागतं, कंपनीकडे तुम्हीही नकारात्मक दृष्टीनं पाहायला लागता.
दुसऱ्या शब्दांत सांगायचं झाल्यास सहकाऱ्याचं कामाप्रती असमाधानी असणं हे संसर्गजन्य ठरतं.
आपल्या आजुबाजूला असलेल्यांची मतं आणि दृष्टीकोन याचा आपल्यावर आणि आपल्या मनस्थितीवरही परिणाम होत असतो, हे आपल्याला माहिती आहे.
 
ज्याप्रकारे उत्साही, आनंदी सहकारी आपल्याला प्रेरित करू शकतात त्याचप्रमाणे असे नकारात्मक लोक आपला उत्साह घालवूही शकतात. हळुहळू संपूर्ण टीममध्ये हा प्रकार पसरतो.
 
अशाप्रकारेच असंतुष्ट कर्मचारी हे कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांमध्ये नाकारात्मक दृष्टीकोन पेरून असं वातावरण निर्माण करू शकतात की, त्यामुळं काम करणाऱ्या इतरांना त्या कामाबाबात आणखी तिरस्कार निर्माण होऊ लागतो, त्यात तुमचाही समावेश असतो.
 
कुरकुर पसरते कशी?
एखादं विशिष्ट प्रकारतं वर्तन हे आजूबाजूच्या वातावरणात आणि विशेषतः कामाच्या ठिकाणी सहज पसरू शकतं, हे अनेकदा पाहायला मिळालं आहे, त्याचे पुरावेही आहेत.
 
उदाहरण द्यायचं झाल्यास कर्मचारी हे खोटं बोलणं किंवा चोरी करणाऱ्यांबरोबर काम करत असतील तर ते त्यांच्याबरोबर अशा कामांत सहभागी होण्याची अधिक शक्यता असते.
पण काही छुपे किंवा साधे प्रकारही परिणामकारक ठरतात. त्यात एखाद्याला काम आवडत नसेल आणि तो सारखी तशी कुरकुर करत असेल तर त्याचा परिणाम संपूर्ण टीमवर पसरतो.
अमेरिकेच्या ड्युक युनिव्हर्सिटीतील मॅनेजमेंट अँड ऑर्गनायझेशनचे सहायक प्राध्यापक हेमंत कक्कर यांच्या मते, "सामाजिक प्रसार या मानसोपचाराशी संबंधित प्रकारामुळं असं होतं. त्यात लोकांचं वर्तन आणि दृष्टीकोन याचा इतरांवर परिणाम होतो. भावनांच्या संदर्भातही असं नकारात्मक आणि सकारात्मक अशा दोन्ही गोष्टी घडू शकतात."
 
"समाजाचे भाग म्हणून आपण जेव्हा इतरांच्या भावना जाणून घेतो आणि आपणही तसंच वर्तन करू लागतो त्याला भावनिक संसर्ग म्हटलं जातं. उदाहरण द्यायचं झाल्यास, एखाद्या बैठकीनंतर सहकारी कर्मचाऱ्याचा मूड खराब झाला असेल, तर मिटींगमध्ये काहीतरी चुकीचं घडलं आहे, हे त्यावरून समजलं जातं," असं ते म्हणाले.
 
विशिष्ट प्रकारचं वर्तन किंवा हावभाव असलेल्या, तुम्ही आदर करत असलेल्या किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तीबाबतच्या परिस्थितीचा नेमका अंदाज किंवा त्याबाबत ठाम मत नसेल तेव्हा भावनिक संसर्ग पसरण्याची सर्वाधिक शक्यता असते, असं ते म्हणतात.
 
अमेरिकेतील संस्था गॅलपनं कोरोनाच्या काळात संपूर्ण अमेरिकेतील कर्मचाऱ्यांसंदर्भात अभ्यास केला. या संस्थेत वर्कप्लेस मॅनेजमेंट आणि वेलबिइंगचे प्रमुख अभ्यासक जीम हार्टर यांच्या संशोधनावरून काही बाबी समोर आल्या आहेत. त्यांच्या मते कर्मचारी तीन प्रकारचे असतात.
 
काही लोकांना काम आवडत असतं आणि ते चांगली कामगिरीही बजावत असतात. काही लोकांना काम आवडत नसतं, पण तरीही ते चांगलं काम करत असतात.
 
तर तिसऱ्या प्रकारचे लोक म्हणजे ज्यांना काम आवडत नसतं आणि ते व्यवस्थित काम करतही नसतात (जे अगदी सक्रियपणे नवीन कामाच्या शोधात असतात) असे लोक.
तिसऱ्या प्रकारचे म्हणजे काम न आवडणारे आणि न करणारे लोक हे इतरांवर त्यांच्या वर्तनाचा प्रभाव टाकतात. विशेषतः काम न आवडताही ते करत असलेल्या दुसऱ्या गटातील कर्मचाऱ्यांवर याचा अधिक परिणाम होतो.
 
याचा अर्थ म्हणजे तुम्ही कामावर नाखूश नसले तरीदेखील सहकाऱ्याच्या वर्तनामुळं तुमच्या मेंदूवरही त्याचा परिणाम होतो. तुम्ही त्याचं जेवढं अधिक ऐकता तेवढा अधिक त्याबाबत आणि स्वतःबाबत विचार करू लागता, असं टोरंटो विद्यापीठातील मॅनेजमेंटचे सहायक प्राध्यापक जॉन ट्रॉगकोस म्हणाले.
 
ते तुमच्या आणि इतरांच्या मनात अशा विचारांची बीजं रोवतात आणि काही काळातच तुम्ही आणि इतरही अनेकजण अशा नकारात्मक मतांना बळी पडतात.
 
ट्रॉगकोस यांच्या मते, संख्येमध्ये शक्ती असते. जेव्हा तुम्हाला एकच गोष्ट दोन, तीन किंवा चार लोक सांगत असतील तेव्ही ती अधिक पक्की (असमाधानाचा संसर्ग) होत जाते. त्याच मानसिकतेत लोक अडकले जातात.
"कामाच्या ठिकाणी तुमचे खूप मित्र असण्यामुळं तुम्ही नकारात्मक मतांपासून किंवा अशा संसर्गापासून दूर राहाल हे गरजेचं नाही. अशा मैत्रीमुळं तुम्ही गुंतलेले राहात असला तरी, कदाचित हेच मित्रदेखील अशा नकारात्मक चर्चेला कारणीभूत ठरू शकतात," असं हार्टर म्हणाले.
 
"अशा प्रकारच्या सामाजिक संबंधातून एकतर अशा प्रकारची नकारात्मक चर्चा वाढत जाते आणि त्याचा संसर्ग होत जातो, अथवा लोक एकत्र येऊन खूपच नावीण्यपूर्ण असं काही तरी करू शकतात," असंही ते म्हणाले. चांगला तोडगा काढण्यासाठी एकत्र राहायला हवं, असं ते म्हणतात.
 
तुमच्याबरोबर बोलणारी किंवा चर्चा करणारी व्यक्ती ही वैयक्तिकरित्या किंवा व्यावसायिकरित्या प्रभाव टाकणारी असेल तर अशा भावना किंवा संवेदना अधिक प्रभावीपणे परिणाम करत असतात याकडे कक्कर यांनी लक्ष वेधलं.
 
म्हणजेच एखादा उत्तम टीमलीडर किंवा उत्तम कामगिरी करणारा कर्मचारी यांनी अशा तक्रारी केल्यास त्याचा अधिक परिणाम होत असतो.
 
घरून काम करणं हादेखील अशा प्रकारची नकारात्मकता पसरण्यात अडसर ठरत नाही.
 
"जर तुम्ही एखाद्या मिटींगला गेलात आणि त्या मीटींगमधले अर्धे लोक लॅपटॉप बाहेर काढताना किंवा असंच इतर काही करताना दिसत असतील, तर ते कर्मचारी समाधानी नसून कामात गुंतलेले नसल्याचे ते संकेत आहेत," असं अमेरिकेच्या रुत्गर्स विद्यापीठातील बिझनेसच्या प्राध्यापिका तेरी कुर्त्झबर्ग म्हणाल्या.
 
त्याचप्रमाणे, "समजा तुम्ही झूम कॉलवर असाल आणि लोकांना कॅमेरा सुरू करायचा त्रासही घ्यायचा नसेल तसेच ते मिटींगमध्ये आहेत की नाही, हेही तुम्हाला कळत नसेल, तर हा त्यांचं कामात लक्ष नसल्याचं संकेत समजता येऊ शकते," असंही ते म्हणाले. तुमच्या वर्तनामध्येही मग असंच काही दिसण्याची शक्यता असते, असंही त्यांना वाटतं.
 
संदर्भ लक्षात घ्यावा
टीमवर परिणाम करणाऱ्या अनेक गोष्टींमुळं नकारात्मकता पसरत असते. त्यामुळं कामावर, टीमवर किंवा कंपनीवर सामाधानी असणाऱ्या कर्मचाऱ्यावर परिणाम होऊ शकतो किंवा अगदीच वाईट व्हायचं असेल तर, कामावर खूश नसलेले कर्मचारी इतर ठिकाणी नोकरी शोधू लागतात आणि एकत्रितपणे अनेकांना नोकरी सोडण्याचा प्रकार होऊ शकतो.
 
मग अशा प्रकारचा संसर्ग कसा रोखता येईल? जर तुम्ही एखाद्या वातावरणात आनंदी किंवा समाधानी असाल, तर तुम्ही इतरांच्या तक्रारी बंद करण्यासाठी काही ठरावीक धोरणांचा वापर करावा लागेल.
 
यातील सर्वात उत्तम सूचनांचा विचार करता अधिक सकारात्मक लोकांच्या संपर्कात राहणे, इतरांबरोबर सीमा राखून संबंध ठेवणे आणि अधिक सकारात्मक चर्चेला प्राधान्य देणे या असू शकतात.
 
"कामात जे लोक अधिक गुंतलेले असतात आणि जे अधिक समाधानी असतात, त्यांच्यावर ऊर्जा केंद्रीत करायला हवी," असं कुर्त्झबर्ग म्हणाले.
तुमच्या तक्रार करणाऱ्या सहकाऱ्याच्या वर्तनाचा संपूर्ण संदर्भ तुम्हाला माहिती नाही, हे तु्हाला स्वतःच्याच लक्षात आणून द्यावं लागेल, असं कुर्त्झबर्ग सांगतात.
 
"कदाचित असं तक्रार करणाऱ्याचं वर्तन हे त्याच्या कामातील क्लिष्ट गोष्टींचा परिणाम किंवा जीवनातील इतर गोष्टींचा परिणाम असू शकतो. तुमची परिस्थिती ही त्यापेक्षा वेगळी असू शकते," असं त्या म्हणतात.
 
पण तज्ज्ञांनी एका महत्त्वाच्या गोष्टीकडेही लक्ष वेधलं आहे. ती म्हणजे, जर तुमच्या टीममधील लोक आनंदी नसतील तर ती एक कर्मचारी असमाधानी असण्यापेक्षा मोठी समस्या आहे.
 
"यात कोणी एक वाईट असू शकत नाही. तर त्यातून संघटनात्मक समस्या निर्माण होऊ शकते," असं ट्रॉगकोस सांगतात.
 
उदाहरण द्यायचं झाल्यास, कंपन्या लोकांवर उशिरापर्यंत ऑनलाईन राहण्यासाठी दबाव आणतात, बॉस तुम्हाला रात्री उशिरा मेल करतात किंवा काही त्रासदायक अटीही लादतात.

म्हणजेच कंपनीवर त्यांच्या कामाच्या पद्धीत सुधारणा करण्यासाठी काही दबाव असतो. पण कंपन्या हा बदल स्वीकारण्यात तयार असतात किंवा नाही हे जाणून घेणं कठिण आहे. कर्मचाऱ्यांमध्ये याचा मानसिक परिणाम झालेलाही कंपन्यांच्या लक्षात येत असतो.
 
त्यामुळं तुम्ही कामाच्या ठिकाणी (किंवा झूम मिटींगवर) अशा प्रकारच्या एखाद्या विक्षिप्त सहकाऱ्याबरोबर अडकलेले असाल तर ते तुमच्या मूडवर परिणाम करू शकतात याचा विचार करून खबरदारी बाळगा.
"दुःखी लोकांना कोणाची तरी साथ आवडत असते. पण तुम्ही त्यांच्याबरोबर त्यांच्या मुद्द्यांमध्ये घुसण्याची गरज नाही," असं ट्रॉगकोस म्हणाले.