मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: गुरूवार, 20 मे 2021 (17:57 IST)

कोव्हिडमधून बरं झाल्यानंतर हृदय आणि फुफ्फुसांची काळजी कशी घ्याल

-सरोज सिंह
कोव्हिडमधून रुग्ण बरा झाल्यानंतरही त्याला हृदय, फुफ्फुस किंवा इतर काही त्रास होत असल्याची काही प्रकरणं समोर येत आहेत.
 
आधीच कोरोनाची भीती आणि त्यात वेगवेगळ्या समस्या समोर आल्या की त्यात आणखी भर पडत जाते. मात्र, ही भीती दूर व्हावी, यासाठी कोव्हिडनंतर कोणकोणते शारीरिक त्रास होऊ शकतात, ते कुणाला होतात, त्याचं प्रमाण किती, ते कसे ओळखावे, त्यावर उपाय कोणते, हे जाणून घेऊया.
 
कोव्हिडचा हृदयाशी संबंध
अमेरिकेतील नॅशनल हार्ट, लंग अँड ब्लड इन्स्टिट्यूटने कोव्हिड-19 हा आजार आणि हृदय, याचा संबंध उलगडून सांगणारा एक व्हीडिओ तयार केला आहे.
 
हृदय हे शरीराचं पम्पिंग स्टेशन आहे. हृदयातूनच संपूर्ण शरीरात ऑक्सिजन पुरवला जातो आणि कार्बनडायऑक्साईड शरीराबाहेर फेकला जातो. फुफ्फुसातून ऑक्सिजन हृदयात जातो. तिथून हा ऑक्सिजन रक्तात मिसळून हे ऑक्सिजनयुक्त रक्त संपूर्ण शरीरात प्रवाहित होतं.
 
कोरोना विषाणूचा संसर्ग हा थेट फुफ्फुसावर आघात करतो. त्यामुळे फुफ्फुसांची क्षमता कमी होऊ ऑक्सिजनची पातळी कमी होऊ लागते. काही रुग्णांमध्ये ऑक्सिजनच्या कमतरतेचा हृदयावरही परिणाम होऊ शकतो. अशावेळी ऑक्सिजनयुक्त रक्त पम्प करण्यासाठी हृदयाच्या स्नायूंवर अधिक ताण येतो. याचा थेट परिणाम हृदयाच्या पेशींवर होतो.
 
परिणामी शरीरात इन्फ्लमेशन (दाह) होतं. कधी-कधी इन्फ्लमेशनचं प्रमाण जास्त झाल्यास हृदयाच्या स्नायूंवर त्याचा विपरित परिणाम होतो आणि हार्टबीट वाढतात. हृदयाचे ठोके वेगाने पडतात. त्यामुळे हृदयाची रक्त पम्प करण्याची क्षमता कमी होऊ शकते. ज्यांना हृदयासंबंधी आधीच काही आजार असतील त्यांना याचा त्रास होऊ शकतो.
 
हृदयाची अधिक काळजी कुणी घ्यायला हवी?
तज्ज्ञांच्या मते बीपीचे रुग्ण, डायबेटिक रुग्ण आणि स्थूल व्यक्तींमध्ये कोव्हिड-19 आजारामध्ये हृदयासंबंधी आजार होण्याची जोखीम जास्त असते.
 
फोर्टिस एस्कोर्ट हार्ट इन्स्टिट्युटचे अध्यक्ष डॉ. अशोक सेठ भारतातील सुप्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ आहेत.
 
कोव्हिड-19 च्या गंभीर रुग्णांमध्ये हृदयावर जास्त परिणाम होत असल्याचं दिसतं, असं डॉ. अशोक सेठ यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं. जवळपास 20 ते 25% रुग्णांमध्ये हृदयावर परिणाम झाल्याचं दिसतं, असं त्यांचं म्हणणं आहे.
 
मात्र, ही आकडेवारी वाचून घाबरू नका.
 
कोव्हिड-19 आजारात 80 ते 90% रुग्ण घरीच उपचार घेऊन बरे होतात. उरलेल्या 10 ते 20% रुग्णांनाच हॉस्पिटलमध्ये भरती करावं लागतं. हे जे 20% रुग्ण हॉस्पिटलमध्ये उपचार घेतात त्यातलेही थोडेच रुग्ण गंभीर आजारी असतात.
 
शिवाय, गंभीर आजारी असलेल्या सर्वच्या सर्व रुग्णांना हृदयासंबंधी किंवा फुफ्फुसासंबंधी गंभीर आजार उद्भवत नाही. काही रुग्णांमध्येच हृदयावर परिणाम होऊ शकतो, असं डॉ. अशोक सेठ सांगतात.
 
यापैकी अनेक रुग्णांना हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यानंतर हृदयासंबंधीच्या तक्रारी आढळतात. अनेकांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर घरी गेल्यावर ताबडतोब हृदयासंबंधी त्रास सुरू होतो. तर अनेकांना 1 ते 3 महिन्यांनंतर किंवा त्याहीनंतर त्रास होतो.
 
कोव्हिड-19 जितका गंभीर असेल हृदयावर परिणाम होण्याची शक्यता तेवढी वाढते, असं डॉ. सेठ म्हणतात.
 
दोन संशोधनांचा उल्लेख करत ते सांगतात, "अमेरिकेत कोव्हिड-19 च्या गंभीर रुग्णांचा MRI स्कॅन करण्यात आला. संशोधनात यातल्या 75% रुग्णांच्या हृदयांच्या स्नायूंवर कोव्हिड-19 मुळे विपरीत परिणाम झाल्याचं आढळून आलं. ब्रिटनमध्येही असंच एक संशोधन करण्यात आलं. त्यात गंभीर रुग्णांपैकी 50% रुग्णांच्या हृदयावर परिणाम झाल्याचं आढळलं."
 
त्यामुळे घरी राहून बरे होणाऱ्या कोव्हिड रुग्णांसाठी काळजीचं कारण नाही आणि त्यांनी केवळ काही वेगळी लक्षणं जाणवतात का, यावर लक्ष ठेवावं.
 
हृदयावर परिणाम झाला आहे की नाही, हे कसं ओळखणार?
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार कोव्हिड-19 च्या कुठल्याही रुग्णाला
 
श्वास घ्यायला त्रास होत असेल किंवा
छातीत दुखत असेल किंवा
अचानक अधून-मधून धडधड होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.
या लक्षणांकडे कोव्हिड-19 च्या रुग्णांनी (ते कोव्हिडमधून बरे झालेले असो किंवा आयसोलेशनमध्ये असो) दुर्लक्ष करू नये.
 
कोव्हिड रुग्णांमध्ये हार्ट अटॅक किंवा कार्डियाक अरेस्ट का होतो?
डॉ. सेठ म्हणतात, "चेस्ट पेन किंवा ब्लड क्लॉटिंगमुळे (रक्तात गुठळ्या होणे) असे त्रास होऊ शकतात."
 
"कोव्हिड-19 च्या गंभीर रुग्णांमध्ये हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर 4 ते 6 आठवड्यांमध्ये कधीही हार्ट अटॅक येण्याची शक्यता असते. पहिला महिना सर्वात महत्त्वाचा असतो. अशा रुग्णांनी डिस्चार्ज मिळाल्यानंतर 4 ते 6 आठवडे ब्लड थिनर वापरायला हवं. किती डोस घ्यायचा, हे डॉक्टर सांगतात. रुग्णांनी विचारून घ्यावे."
 
"याशिवाय, श्वास घ्यायला त्रास होत असेल तर अशा रुग्णांमध्येही कार्डियाक अरेस्टची शक्यता असते."
 
काही कोव्हिड रुग्णांमध्ये धडधड वाढत असल्याचंही दिसून येतं. यामुळे हृदयाच्या ठोक्यांची जी गती असते त्यासंबंधी काही आजार उद्भवू शकतात. काही रुग्णांमध्ये ही गती शकते तर काहींमध्ये कमी होऊ शकतो. त्यामुळे डॉक्टर हृदयाचे ठोके मॉनिटर करण्याचा सल्ला देतात.
 
स्टिरॉईड्सचा परिणाम
आम्ही मॅक्स हॉस्पिटलचे कार्डियाक सायंसचे अध्यक्ष डॉ. बलबीर सिंह यांच्याशीही बातचीत केली.
 
कोव्हिड-19 च्या उपचारात स्टिरॉईड्सची महत्त्वाची भूमिका असल्याचं हे दोन्ही तज्ज्ञ मान्य करतात. मात्र, रुग्णांना स्टिरॉईड्स कधी द्यायचे, त्याचं टायमिंग खूप महत्त्वाचं असल्याचं ते सांगतात.
 
डॉ. बलबीर सिंह म्हणतात, "हे औषध कोव्हिड-19 च्या रुग्णाला देता कामा नये. याचे बरेच साइड इफेक्ट्स आहेत. विशेषतः डायबेटिक रुग्णांमध्ये. या रुग्णांमध्ये स्टिरॉईड्समुळे इतर बॅक्टेरिया आणि फंगस पसरण्याची शक्यता असते. ब्लॅक फंगसही त्यांनाच होतो ज्यांना स्टिरॉईड्स देण्यात आलेत."
 
त्यामुळे ज्या रुग्णांमध्ये ऑक्सिजनची पातळी कमी आहे, केवळ अशाच रुग्णांना स्टिरॉईड्स द्यावी. अशा गरजू 10 ते 15% रुग्णांना 7 दिवसांनंतरच स्टिरॉईड्स सुरू करावीत. ते डॉक्टरांनीच प्रिस्क्राईब करावं आणि हॉस्पिटलमध्येच द्यावं. वेळेआधी दिल्यास किंवा जास्त प्रमाणात दिल्यास घातक ठरू शकतं.
 
कुठल्या टेस्ट कधी कराव्या?
डॉ. बलबीर सांगतात, "कोव्हिड-19 झाल्यावर पहिल्या आठवड्यात विषाणू शरीरात वाढतो. या काळात खोकला, ताप, अंगदुखी अशीच लक्षणं असतात. पहिल्याच आठवड्यात श्वास घ्यायला त्रास होणे, छातीत दुखणे, असे त्रास होत नाहीत. सामान्यपणे 8-10 दिवसांनंतर शरीर विषाणूविरोधात रिअॅक्ट करायला सुरुवात करतं. या काळात शरीरात इन्फ्लेशन होतं. यावेळी शरीरातील इतर अवयवांवरही परिणाम होऊ शकतो."
 
कोरोना विषाणू थेट हृदयावर परिणाम करत नाही. मात्र, सीआरपी आणि डी-डायमर वाढू लागतात. त्यामुळे डी-डायमर, सीबीसी-सीआरपी, आई-एल6 यासारख्या चाचण्या 7-8 दिवसांनंतरच करण्याचा सल्ला दिला जातो.
 
यातले काही पॅरामीटर्स वाढल्यास ते शरीरातील इतर भागात गडबड सुरू झाल्याचे संकेत असतात. या रिपोर्टवरून कुठल्या रुग्णाला कधी हॉस्पिटलमध्ये भर्ती करायचं, हे ठरवलं जातं. यावरून शरीरातला कुठला भाग विषाणूच्या जाळ्यात ओढला जातोय, कोणतं औषध द्यायचं, हे ठरवलं जातं."
 
हृदयाची काळजी कशी घ्यावी?
डॉ. अशोक सेठ आणि डॉ. बलबीर सिंह दोघांनीही सारखेच उपाय सुचवलेत.
 
डॉक्टरांनी ब्लड थिनर आणि इतर जी काही औषधं लिहून दिली आहेत आणि जेवढ्या कालावधीसाठी लिहून दिली आहेत ती अवश्य घ्या.
धूम्रपान करत असाल किंवा ड्रिंकची सवय असेल तर कोव्हिडनंतर लगेच या सवयी सोडा.
आहाराकडे विशेष लक्ष द्या. फळं आणि हिरव्या भाज्या भरपूर प्रमाणात खा. घरचं आणि ताजं अन्न खा.
भरपूर पाणी प्या. शरीरात पाण्याचं प्रमाण कमी झाल्यास रक्तात गुठळ्या होण्याची शक्यता वाढते.
हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यावर दोन आठवड्यांनी डॉक्टरांकडे फॉलो-अप चेकअपसाठी जरूर जावे. गरज असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ईसीजी, इको-कार्डियोग्राम करून घ्यावा.
हॉस्पिटलमधून घरी आलेल्या रुग्णांनी हळू-हळू आणि हलके व्यायाम करावे.
दिवसभर बिछान्यावर पडून राहणेही योग्य नाही. जेव्हा बरं वाटेल तेव्हा आपल्या खोलीतच थोड्या चकरा माराव्या. योग करावा आणि सकारात्मक विचार करावा.
6 मिनिट वॉक टेस्ट
याशिवाय 6 मिनिट वॉक टेस्टही सगळेच सांगतात. हृदय आणि फुफ्फुसं निरोगी आहेत का की त्यांना उपचाराची गरज आहे, हे घरबसल्या जाणून घेण्याचा हा सर्वात सोपा आणि प्रभावी मार्ग आहे.
 
मेदांता हॉस्पिटलचे लंग स्पेशलिस्ट डॉ. अरविंद कुमार सांगतात, "ही टेस्ट करण्याआधी ऑक्सिजनची पातळी चेक करावी. त्यानंतर 6 मिनिटं तुम्ही सामान्यपणे जसे चालता त्याच गतीने चालायचं आहे. त्यानंतर पुन्हा ऑक्सिजन चेक करावं."
 
6 मिनिटं चालल्यानंतर ऑक्सिजनची पातळी कमी होत नसेल तर याचा अर्थ तुमची फुफ्फुसं आणि हृदय दोन्ही ठणठणीत आहेत.
 
तुम्हाला 6 मिनिटं चालता येत नसेल तर डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा. गरज असेल तर हॉस्पिटलमध्ये दाखल व्हा.
 
फुफ्फुसांची काळजी कशी घ्यावी?
डॉ. अरविंद कुमार कमी गंभीर लक्षणं असणाऱ्या रुग्णांना कमीत कमी 6 महिने 'ब्रेथ होल्डिंग एक्सरसाईज' करण्याचा सल्ला देतात. 25 सेकंदांपर्यंत श्वास रोखता येत असेल तर याचा अर्थ तुमचं फुफ्फुस उत्तमरित्या काम करतंय.
 
फुफ्फुस फुग्यासारखं असतं. आपण सामान्यपणे श्वास घेतो त्यावेळी फुफ्फुसाच्या बाहेरच्या भागापर्यंत श्वास पोहोचत नाही. मात्र, आपण अशापद्धतीचे व्यायाम करतो त्यावेळी श्वास फुफ्फुसाच्या सर्व भागांपर्यंत पोहोचतो आणि ते उघडतात. आकुंचत नाहीत.
 
डॉक्टर अरविंद सांगतात की गंभीर कोव्हिडमधून बरे झालेल्या रुग्णांमध्ये 6 महिन्यांनंतरही 'लंग फायब्रोसीस' म्हणजेच फुफ्फुस आकुंचन पावण्याची समस्या होऊ शकते. त्यामुळेच ब्रेथ होल्डिंग व्यायाम गरजेचा आहे.
 
सीटी स्कोअरवरूनही फुफ्फुसांमध्ये विषाणू संसर्ग किती पसरला आहे, याचा अंदाज बांधता येतो, असं बीएलके मॅक्स हॉस्पिटलचे वरिष्ठ संचालक डॉ. संदीप नायर सांगतात. कोरोना संसर्ग झाल्यानंतर 7 दिवसांनंतरच सीटी करण्याचा सल्ला ते देतात.
 
हा स्कोअर 10/25 पेक्षा जास्त असेल तर तुमच्या फुफ्फुसात मध्यम स्वरुपातील संसर्ग आहे. हा स्कोअर 15/25 पेक्षा जास्त असेल डॉक्टर हॉस्पिटलमध्ये जाण्याचा सल्ला देऊ शकतात.
 
डॉ. अरविंद सांगतात, "गंभीर लक्षणं असणाऱ्या रुग्णांनी फुफ्फुसातील इंफेक्शन चेक करण्यासाठी पल्मनरी फंक्शन चाचणी करायला हवी. हॉस्पिटलमधून सुट्टी मिळाल्यानंतर 2 महिन्यांनी पुन्हा टेस्ट करणं गरजेचं आहे."
 
मात्र, डॉ. अरविंद नॅचरल म्हणजेच नैसर्गिक उपचारांवरच भर देतात. ते सांगतात, रोज योग, श्वासाचे व्यायाम करायला हवे. रोज वाफ घ्यावी, गरम पाण्याने गुळण्या कराव्यात तसंच मास्कचा वापर करावा. या सर्व पद्धतींनी फुफ्फुसाचं आरोग्य उत्तम ठेवण्यास मदत होते, असं डॉ. अरविंद यांचं म्हणणं आहे. इतकंच नाही तर आहारात तिखट आणि मसाल्यांचं प्रमाणही कमी असावं, असंही डॉ. अरविंद सांगतात.