रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: गुरूवार, 4 फेब्रुवारी 2021 (19:11 IST)

ईशा सिंह : भारताची सर्वांत लहान वयाची नॅशनल शूटिंग चॅम्पियन

भारताची सर्वांत लहान वयाची नॅशनल शूटिंग चॅम्पियन ठरलेल्या ईशा सिंहला खेळाबद्दलचं प्रेम वारशातच मिळालं होतं. तिचे वडील सचिन सिंह हे मोटरस्पोर्ट्समध्ये नॅशनल रॅली चॅम्पियन होते.
 
ईशाला खेळाची गोडी लागली खरी...पण तिचा कल इतर कारपेक्षा बंदुकीकडे जास्त होता. 16 वर्षांच्या असलेल्या ईशाने नेमबाजीच्या सरावाला वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी सुरूवात केली होती.
 
बंदुकीचे बार हे मला संगीतासारखे वाटायचे, असं ती सांगते. या खेळामध्ये धाडसाची गरज होती आणि ही गोष्टही मला आवडली होती, असंही ईशा सांगते. या आवडीतूनच तिचा नेमबाजीचा प्रवास सुरू झाला.
 
2014 साली लहान वयातच तिने बंदूक हातात घेतली आणि 2018 मध्ये तिनं राष्ट्रीय शूटिंग स्पर्धेत विजेतेपद मिळवलं. 13 वर्षांच्या ईशाने या स्पर्धेत आंतरराष्ट्रीय स्तरावर पदक जिंकलेल्या मनू भाकेर आणि हिना सिधूसारख्या खेळाडूंचा पराभव करत युथ, ज्युनिअर आणि सीनिअर अशा तिन्ही वर्गांत खेळून तीन सुवर्णपदकंही जिंकली.
 
ईशा सिंहनं तिची गुणवत्ता सिद्ध केली आणि ती आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्येही खेळू लागली. ज्युनिअर वर्ल्ड कपमध्ये तिनं रौप्य पदक जिंकलं आणि एशियन शूटिंग चॅम्पियनशिपमध्ये तिनं सुवर्णपदक जिंकलं.
 
एखाद्या खेळाची केवळ आवड असून यश मिळवता येत नाही. यशापर्यंत पोहोचण्यासाठी अनेक अडथळे पार करावे लागतात. मूळ तेलंगणाची असलेल्या ईशाला जवळ कोणतंही शूटिंग रेंज नव्हतं.
 
एखादी स्पर्धा जवळ आली की तिला गच्चीबावली स्टेडिअमवर सरावासाठी जावं लागायचं. ते तिच्या घरापासून तासाभराच्या अंतरावर होतं. तिला मॅन्युअल रेंजवर प्रॅक्टिस करावी लागायची. अभ्यास, सराव आणि प्रवासातला येण्याजाण्याचा वेळ या तिन्हीचा मेळ साधणं हेच तिच्यासाठी सर्वांत मोठं आव्हान होतं.
 
नऊ वर्षांच्या लहान मुलीला तिच्या वयाप्रमाणे इतर अनेक गोष्टींचं आकर्षण वाटणं स्वाभाविक होतं. लहान वयातल्या छोट्यामोठ्या आनंदांपासून दूर राहून खेळावर लक्ष केंद्रीत करणं तितकं सोपं नव्हतं.
 
पण तिनं स्वतःसमोर एक लक्ष्य ठेवलं होतं. खेळाबद्दलचं प्रेम आणि समोर असलेलं उद्दिष्ट यांमुळे तिला या आव्हानांवर मात करता आली.
 
आव्हानांवर केली मात

नेमबाजीत करिअर घडवण्यासाठी ईशालाच आपल्या छोट्या-मोठ्या सुखांचा त्याग करावा लागला असं नाही. तिचं करिअर बहरावं म्हणून तिच्या वडीलांनाही त्यांच्या स्वप्नांचा त्याग करावा लागला. ईशासोबत राहण्यासाठी मोटार रॅलीमधला त्यांचा प्रवास थांबवला.
 
तिच्या दोन्ही पालकांनी आपल्या मुलीकडेच लक्ष द्यायला सुरूवात केली. एका तरूण खेळाडूला सतत प्रोत्साहनाची गरज असते आणि ईशाला ते नेहमीच मिळालं. तिचे वडील खंबीरपणे तिच्या पाठिशी होते.
 
या सगळ्या कष्टांचं फळ तिला मिळालं आणि नेमबाजी शिकायला सुरूवात केल्यानंतर अवघ्या चार वर्षांत ती नॅशनल चॅम्पियन बनली. आंतरराष्ट्रीय स्तरावरही आपण पदकं जिंकू शकतो, हा आत्मविश्वासही तिला मिळाला.
 
तिचा आत्मविश्वास अनाठायी नव्हता. कारण राष्ट्रीय स्पर्धेतील जेतेपदानंतर ईशानं पुढच्याच वर्षी म्हणजे 2019 साली जर्मनीत झालेल्या ज्युनिअर वर्ल्ड कपमध्ये रौप्य पदक जिंकलं.
 
त्याच वर्षी रिओ द जानिरो इथं झालेल्या सीनिअर वर्ल्ड कपमध्ये तिला कोणतंही पदक जिंकता आलं नाही, मात्र एवढ्या लहान वयात इतकी मोठी स्पर्धा खेळण्याचा अनुभव तिच्यासाठी मोलाचा ठरला.
 
पुढच्या वर्षी तिनं दोहा इथं झालेल्या एशियन शूटिंग चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकलं. 2024 साली पॅरिस इथं होणाऱ्या ऑलिंपिक स्पर्धेत पदक जिंकणं हे ईशा सिंहचं पुढचं लक्ष्य आहे. युथ ऑलिंपिक्स, कॉमनवेल्थ गेम्स आणि 2022 साली एशियन गेम्समध्ये उत्तम कामगिरी करण्याचीही तिची अपेक्षा आहे.
 
राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर भरीव कामगिरी करणाऱ्या ईशाला 2020 साली प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्काराने गौरविण्यात आलं आहे.
 
आपल्यासाठी हा अभिमानाचा क्षण होता, असं ईशा सिंह सांगते. पण खेळामधला महिलांचा सहभाग वाढावा यासाठी सरकारनं लक्ष घालण्याची गरज आहे, असंही तिला वाटतं. त्यांची दखल घेऊन सन्मानित करणं आवश्यक असल्याचंही ईशाचं म्हणणं आहे.