बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: बुधवार, 9 जून 2021 (19:06 IST)

Jitin Prasad यांचे वडील जितेंद्र प्रसादांनी थेट सोनिया गांधींविरोधात निवडणूक लढवली होती

नीलेश धोत्रे
असं म्हणतात की, काँग्रेसच्या नेत्यांना कायम सत्तेचीच भाषा कळते आणि त्यांचं राजकारण कायम त्याच दिशेने चालतं. त्यामुळेच मूळचे काँग्रेसी असलेले पण, गेल्या 2 लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या दारूण परभवानंतर मनात खूप चलबिचल असलेले अनेक नेते काँग्रेसमध्ये आहेत.
 
त्यातल्याच एकानं म्हणजे जितिन प्रसाद यांनी अखेर आज भाजपमध्ये जाऊन स्वतःला सत्तेशी जोडून घेतलं आहे.
 
पण याच सत्तेच्या राजकारणात जितिन प्रसाद यांच्या वडिलांनी थेट सोनिया गांधींना आव्हान दिलं होतं आणि तेही काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी, या गोष्टीची
2000 साली झालेल्या काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा निवडणुकीत जितेंद्र प्रसाद यांनी थेट सोनिया गांधींच्या विरोधात उमेदवारी अर्ज भरला आणि निवडणूक लढवली. पण त्यांचा दारूण पराभव झाला.
पण ही घटना फक्त 2 ओळीत मांडावी एवढी छोटी आणि सोपी तर त्याहून नाही. त्याला दर्प आहे तो खूप मोठ्या राजकारणाचा आणि जितेंद्र प्रसाद यांनी चुकवलेल्या राजकीय किमतीचा.
 
जितेंद्र प्रसाद यांनी राजकारणातली एन्ट्री तशी उत्तर प्रदेशातली. हेमवतीनंदन बहुगुणा यांनी त्यांना राजकारणात आणलं. त्यानंतर ते राजीव गांधी यांचे सचिव झाले.
 
नंतर ते पुढे नरसिंह राव यांचे राजकीय सल्लागार झाले. म्हणजे कालपरवापर्यंत जे पद आणि जो दरारा अहमद पटेलांचा काँग्रेसमध्ये होता ते पद आणि तसा दरारा जितेंद्र प्रसादांचा नरसिंह राव सरकारमध्ये होता. जितेंद्र प्रसाद हे नरसिंह राव यांच्या अत्यंत जवळचे मानले जात होते.
90च्या दशकाचा काळ देशताल्या राजकारणासाठी तसा बराच उलथापालथीचा ठरला. नरसिंहराव यांचं सरकार गेल्यानंतरची 4 वर्षं केंद्रात अस्थिरता होती. त्याच दरम्यान काँग्रेसमध्येही बरेच बदल घडत होते.
 
1998 च्या लोकसभा निवडणुकीत सिताराम केसरी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचा दारुण पराभव झाला होता. परिणामी काँग्रेसमधल्या गांधी कुटुंबाशी एकनिष्ठ असलेल्या नेत्यांनी सोनिया गांधी यांना पक्षात आणण्यासाठी जोरदार मोहिम चालवली आणि 14 मार्च 1998 रोजी सोनिया गांधी काँग्रेसच्या अध्यक्ष झाल्या.
या घटनेची आठवण सांगताना ज्येष्ठ पत्रकार सुनील गाताडे सांगतात, " सिताराम केसरी हे तसे फारसे प्रभावी काँग्रेस अध्यक्ष नव्हते. काँग्रेसच्या नेत्यांना कायमच पॉवरची भाषा कळते, त्यामुळे त्यांना सत्ता आणू शकेल अशा नेत्याची गरज वाटत होती. सिताराम केसरी ती आणू शकतील असं त्यांना वाटतं नव्हतं. सोनिया गांधींमध्ये त्यांना तसं नेतृत्व दिसलं. सोनिया गांधी सत्ता आणू शकतील असं त्यांना वाटलं. म्हणून सिताराम केसरी आणि तारिक अन्वर सोडून इतर नेते सोनिया गांधीकडे गेले आणि त्यांनी सोनियांना काँग्रेसमध्ये आणलं."
 
सुनील गाताडे यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेसाठी अनेक वर्षं काँग्रेस पक्षाचं वार्तांकन केलं आहे.
 
पण त्याच्याच पुढच्या वर्षी म्हणजे 1999 मध्ये झालेल्या मध्यावधी लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसचा आणखी दारुण पराभव झाला. शिवाय भाजप आणि अटलबिहारी वाजपेयी यांना एक प्रकारे कारगिल युद्धाचा फायदा झाल्याचंही राजकीय विश्लेषकांना वाटतं.
त्याच दरम्यान सोनिया गांधींना विरोध करत शरद पवार काँग्रेसमधून बाहेर पडले आणि सोनिया गांधी यांच्या जागी राजेश पायलट यांना अध्यक्ष केलं जाण्याच्या चर्चा रंगायला सुरुवात झाली.
 
"राजेश पायलट हे फार महत्त्वाकांक्षी नेते होते. आणि बातम्या छापून आणण्यात ते एक्सपर्ट होते," अशी आठवण गाताडे सांगतात.
 
पण 2000 मध्ये काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक लागण्याआधीच एका कार अपघातात राजेश पायलट यांचा मृत्यू झाला.
 
राजेश पाटलट आणि जितेंद्र प्रसाद हे तसे एकमेकांचे मित्र होते. नरसिंग राव सत्तेपासून दूर गेल्यानंतर जितेंद्र प्रसाद यांचंही महत्त्व कमी होत गेलं. ते पक्षात स्वतःचं अस्तित्व शोधत होते.
दरम्यान काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक लागली. सोनिया गांधी आधीच या पदावर होत्या, त्यांनी पुन्हा ती निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आणि जितेंद्र प्रसाद यांनी सोनियांना आव्हान देण्याचा निर्णय घेतला.
 
याबाबत सुनील गाताडे सांगतात, "जितेंद्र प्रसाद काही लोकनेते नव्हते. त्यांना काही उत्तर प्रदेशात खूप लोकांचा पाठिंबा नव्हता. पण सोनिया गांधींच्या काँग्रेसमधल्या उदयानंतर बाजूला फेकले गेलेल्या जितेंद्र प्रसाद यांना काँग्रेसमधल्याच अनेकांनी फूस लावून घोड्यावर बसवलं, पण नंतर कोणी त्यांच्या बाजूने उभं राहीलं नाही. एक प्रकारे त्यांना मामा बनवलं गेलं."
आपल्याला एक प्रकारे मोहरा करण्यात आलं आहे हे जितेंद्र प्रसाद यांच्या लक्षात आलं होतं. पण सन्मानानं माघार घेण्याची सोनिया गांधी विनंती करतील, असं त्यांना वाटत होतं, असं एका लेखात रशीद किदवई यांनी लिहिलं आहे.
 
त्यांच्या या लढतीबाबत त्यावेळी वृत्तपत्रं भरलेली असायची. त्यात लिहिण्यात आलेल्या लेखांचा आशय पुढील प्रमाणे आहे.
 
सोनिया गांधीकडून कुठलाच संदेश न आल्यानं त्यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. प्रचारासाठी त्यांनी देशभरातल्या काँग्रेस कार्यालयांना भेटी द्यायला सुरुवात केली. पण अनेक ठिकाणी ते पोहोचण्याआधीच काँग्रेस कार्यालय कुलूप लावून बंद केलेलं असायचं. स्थानिक काँग्रेसचे सर्व पदाधिकारी गायब असायचे. कुणीही जितेंद्र प्रसाद यांना भेटण्यासाठी तयार नसायचं.
 
मुंबईतल्या प्रचारादरम्यानही जितेंद्र प्रसाद यांना तसाच अनुभव आला होता. मुरली देवरा यांच्या गटानं त्यांचा त्यावेळी विरोध केला होता.
 
जितेंद्र प्रसाद मुंबईतल्या काँग्रेस कार्यालयात येण्याआधी तिथले सर्व काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते निघून गेले होते. रिकाम्या कार्यालयाचा त्यांना सामना करावा लागला होता, असं वृत्त तेव्हा सर्व वृत्तपत्रांमध्ये छापून आलं होतं.
पण हे असं का घडलं, याचं उत्तर देताना सुनील गाताडे सांगतात, "काँग्रेसमध्ये अध्यक्ष हा कायम एका हुकूमशहा सारखा असतो (सिताराम केसरींचा अपवाद), त्यामुळे तुम्ही त्यांना विरोध केला ही झिरो होत जाता. शरद पवारांसारखे नेते विरोध करू शकले. पण वेगळा पक्ष काढण्याशिवाय त्यांना फारसं काही करता आलेलं नाही. शिवाय नंतर त्यांना काँग्रेस अध्यक्षांशी जुळवूनच घ्यावं लागलं."
निवडणुकीत सोनिया गांधी यांना विक्रमी मतं मिळाली आणि जितेंद्र प्रसाद यांचा दारूण पराभव झाला. ज्याचा त्यांना प्रचंड धक्का बसला, असं संगितलं जातं. त्यानंतरच्या काही महिन्यांमध्येच ब्रेन स्ट्रोकमुळे जितेंद्र प्रसाद याचं निधन झालं.
 
तर मग जर काँग्रेसींचा जर सोनिया गांधी यांना एवढा पाठिंबा होता तर निवडणूकच का घेण्यात आली आणि त्यांनी जितेंद्र प्रसाद यांना अर्ज मागे घेण्यासाठी विनंती का केली नव्हती, हे प्रश्न कायम उरतात.
 
त्याचं एका ओळीत उत्तर देताना सुनील गाताडे म्हणतात, "त्यामुळे सोनिया गांधींना मी लादलेली नाही तर निवडून आलेली काँग्रेस अध्यक्ष आहे हे सांगता आलं."