शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By

धोनीने देश बदलला तर त्याला न्यूझीलंडच्या टीममध्ये घेऊ- केन विल्यमसन

न्यूझीलंड विरुद्धच्या पराभवामुळे भारत वर्ल्डकपच्या बाहेर फेकला गेला. या सामन्यामध्ये संथ खेळ केल्याची टीका धोनीवर होत आहे. न्यूझीलंडचा कॅप्टन केन विल्यमसननं मात्र धोनीची पाठराखण केली आहे.
 
बुधवारी मॅंचेस्टरच्या ऑल्ड ट्रॅफर्ड मैदानावर झालेल्या रोमहर्षक सामन्यामध्ये भारताचा 18 धावांनी पराभव करत न्यूझीलंडनं सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीमध्ये जागा पटकावली.
 
न्यूझीलंडनं दिलेल्या 240 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताच्या पाच धावांवर तीन विकेट्स पडल्या होत्या. सातव्या विकेटसाठी धोनी आणि जडेजाने 116 धावांची भागेदारी केली आणि भारतीयांच्या आशा पल्लवीत झाल्या.
 
जडेजानं 59 बॉलमध्ये 77 धावांची खेळी केली. धोनीनं दुसरी बाजू लावून धरली होती. पण त्याचा खेळ संथ होता. त्याने 72 बॉल्समध्ये 50 धावा केल्या. भारताला शेवटच्या 14 बॉलमध्ये 32 धावांची गरज असतानाच जडेजानं टोलावलेला चेंडू विल्यमसनने झेलला. जडेजा आऊट झाल्यावर बमार्टिन गप्टिलने धोनीला रन आऊट केलं. यानंतर भारतीय फलंदाजी कोसळली.
 
या पराभवानंतर पुन्हा एकदा धोनीवर टीका करण्यात येत आहे. लक्ष्याचा पाठलाग करताना त्यानं आपल्या खेळाचा वेग वाढवला नसल्याचं म्हटलं जातंय.
 
विल्यमसनकडून पाठराखण
भारताचा कर्णधार विराट कोहली आणि न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन या दोघांनाही मॅचनंतरच्या पत्रकार परिषदेत धोनीविषयी प्रश्न विचारण्यात आले.
 
केन विल्यमसनला एका पत्रकारानं विचारलं, की तो जर भारताचा कर्णधार असता, तर त्यानं धोनीला टीममध्ये घेतलं असतं का? यावर विल्यमसन हसत उत्तरला, "तो न्यूझीलंडसाठी खेळत नाही! पण तो एक आंतरराष्ट्रीय दर्जाचा खेळाडू आहे."
 
पत्रकारानं आपला प्रश्न परत सांगितल्यानंतर तो म्हणाला, "अर्थातच. त्याचा अनुभव महत्त्वाच्या क्षणी फायद्याचा ठरतो. त्याची कामगिरी नेहमीच महत्त्वाची राहील. जडेजासोबत त्यानं उत्तम भागीदारी उभी केली. धोनी एक वर्ल्ड क्लास क्रिकेटर आहे. तो राष्ट्रीयत्व बदलण्याचा विचार करतोय का? तसं असेल तर आम्ही त्याची टीममध्ये निवड करायचा विचार करू."
 
धोनी आक्रमकपणे खेळत नसल्याची टीका आधीच्या सामन्यांदरम्यानही झाली होती. इंग्लंडविरुद्ध झालेल्या पराभवानंतरही धोनीवर टीका करण्यात आली होती. पण विल्यमसननं मात्र धोनीची पाठराखण केली.
 
त्यानं म्हटलं, "शेवटच्या क्षणी धोनीने मॅच फिरवल्याचं आपण पाहिलेलं आहे. ही विकेट खूपच कठीण होती, इथे सोपं काहीच नव्हतं."
 
'टॉप ऑर्डरवर अवलंबून राहणं अयोग्य आहे'
सेमी फायनलमध्ये धोनी आणि जडेजाने ज्या पद्धतीने खेळ केला त्याचं कौतुक सचिन तेंडुलकरनेही केलं आहे. पण भारतीय टीम फलंदाजीसाठी नेहमी टॉप ऑर्डरवर अवलंबून राहू शकत नाही, असंही त्यानं म्हटलंय.
 
240 धावांसारखं टप्प्यातलं उद्दिष्टंही भारतीय फलंदाजांसाठी डोंगरासारखं ठरल्याचं त्यानं म्हटलं. सचिन म्हणतो, "मी निराश आहे. कारण 240 धावांचं लक्ष्य नक्कीच गाठण्याजोगं होतं. हे मोठं उद्दिष्टं नव्हतं. हो, हे खरं आहे की न्यूझीलंडने पाच धावांत तीन विकेट्स घेत आपल्या विजयाचा पाया रचला होता."
 
इंडिया टुडेसोबत बोलताना सचिन म्हणला, "नेहमीच रोहित शर्मा शानदार सुरुवात करेल किंवा विराट कोहली खेळेल अशी अपेक्षा आपण करू शकत नाही. बाकी खेळाडूंनीही जबाबदारी घ्यायला हवी. त्याचप्रमाणे नेहमीच कठीण परिस्थितीमध्ये धोनी मॅच जिंकून देईल अशी अपेक्षा करणं योग्य नाही. धोनीनं यापूर्वी असं अनेकदा केलेलं आहे."
 
धोनीबद्दल कोहली काय म्हणतो?
महेंद्रसिंह धोनीबद्दल बोलताना कोहलीनं म्हटलं, की त्याने गरजेनुसार योग्य फलंदाजी केली.
 
तो म्हणाला, "बाहेर बसून काहीही बोलणं सोपं आहे. पण धोनीनं एक बाजू लावून धरणं महत्त्वाचं होतं. दुसरीकडून जडेजा चांगला खेळत होता. माझ्या मते त्याचा खेळ गरजेनुसार योग्य होता."
 
शेवटी गरज लागली तर बाजी सावरण्यासाठी धोनी असावा याच उद्देशाने हार्दिक पांड्याला आधी बॅटिंग करायला पाठवलं होतं.
 
वर्ल्डकप नंतर भारतीय टीम वेस्ट इंडीजच्या दौऱ्यावर जाणार आहे. दरम्यान धोनीच्या निवृत्तीविषयी एका पत्रकाराने विचारलं. या दौऱ्याबाबतची आपली भूमिका धोनीने स्पष्ट केली आहे का, हे विचारल्यानंतर कोहली उत्तरला, "नाही, त्याने आम्हांला काहीही सांगितलेलं नाही."