शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Updated : गुरूवार, 18 जुलै 2019 (09:54 IST)

कुलभूषणप्रकरणी निर्णय पाकिस्तानसाठी नामुष्कीची बाब?

राजीव डोगरा
 
'पाकिस्तान सूर्याला चंद्र आणि चंद्राला सूर्य ठरवतो.' इंटरनॅशन कोर्ट ऑफ जस्टिसचा (आयसीजे) निर्णय नीट पाहिला तर पाकिस्तानसाठी ही अत्यंत नामुष्कीची गोष्ट आहे.
 
आयसीजेने इतिहासात पहिल्यांदाच कोणत्याही देशाबद्दल इतक्या खुलेपणाने आणि स्पष्ट पद्धतीने भाष्य केलं आहे. निर्णयाच्या ठराविक टप्प्यावर त्यांनी पाकिस्तानला चुकीचं ठरवलं आहे. पाकिस्तानसंदर्भात अपमानजनक शब्दांचा उल्लेख केला आहे.
 
या शब्दांनी त्यांना बरं वाटत असेल तर काय बोलणार?
 
मात्र आयसीजेचा हा निर्णय भारत आणि पाकिस्तान यांच्यापुरता मर्यादित नाही. जगभरातील मानवाधिकारांसंदर्भाच्या दृष्टीने हा निर्णय निर्णायक आहे.
 
याचं गांभीर्य समजण्यासाठी थोडा वेळ असं धरून चालू की, एखादा अमेरिकेचा नागरिक चीनमध्ये गेला आहे आणि चीनने त्याला अशा पद्धतीने अटक केली आहे. त्यावेळी आयसीजेच्या या निर्णयाचा उल्लेख केला जाईल. चीनला या सर्व गोष्टी मानाव्या लागतील.
 
चीनचा एखादा नागरिक अन्य देशात गेला आणि त्याच्याबाबत असं काही घडलं तर चीनही या निर्णयाचा संदर्भ देऊ शकेल.
 
म्हणूनच चीनच्या न्यायाधीशांनी बहुमताच्या बाजूने कौल दिला. पाकिस्तान संतुष्ट असेल तर त्यांनी आपल्या न्यायाधीशांना विचारावं की बहुमताबरोबर जाण्याचा निर्णय त्यांनी का घेतला? कुलभूषणप्रकरणी व्हिएन्ना कन्व्हे प्रमाण मानलं जाईल याच्याशी मी सहमत आहे असं ते म्हणाले.
 
भारत-पाकिस्तान दृष्टीने कुलभूषण एवढा मोठा मुद्दा का?
कुलभूषण यांच्याप्रमाणे अनेक प्रकरणं आहेत.
 
भारताचा तरुण हमीद अन्सारी याला कोणत्याही कारणाविना त्यांनी सहा वर्षं कैदेत ठेवलं होतं. नंतर उपकार केल्याच्या आविभार्वात त्याला सोडण्यात आलं.
 
याआधी सरबजीत सिंह, चमेल सिंह यांची न्यायालयाने सुटका केली होती. त्यांचा कैदेतच मृत्यू झाला होता.
 
अशा अनेक घटनांची पार्श्वभूमी कुलभूषण प्रकरणाला आहे.
 
दिल्लीस्थित हजरत निझामुद्दीन दर्ग्याचे प्रमुख मौलवी पाकिस्तानला गेले होते. त्यांना आयएसआयने ओलीस पकडून नेलं. त्यांना तीन ते चारदिवस मारहाण करण्यात आली.
 
भारतीय नागरिक पाकिस्तानात असुरक्षित आहेत. कुलभूषण यांच्या निमित्ताने अशा सगळ्या घटनांचे धागे तीव्रतेने समोर आले आहेत. कारण अनेकांच्या मते कट्टरवादी गटाने कुलभूषण यांचं इराणहून अपहरण करून त्यांना आयएसआयला विकल्याचं म्हटलं जातं.
 
भारतीय नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न आहे. चुकून किंवा काही कारणांमुळे पाकिस्तानच्या हद्दीत जाणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेचा मुद्दा आहे. म्हणूनच कुलभूषण यांच्या प्रकरणाला प्रचंड महत्त्व आहे.
 
पाकिस्तानचा विचार केला तर त्यांनी प्रपोगंडा (भारतविरोधी प्रचार) म्हणून याप्रकरणाचा वापर केला.
 
पाकिस्तानने सांगितलं, "हे कुलभूषण जाधव आहेत. कट्टरवादी गटाचे आहेत. त्यांनी अनेक ठिकाणी बाँबहल्ले केले आहेत. भारत आमच्यावर आरोप करतो परंतु आम्ही सगळे पुरावे दिले आहेत."
 
मात्र पाकिस्तान जगाला मूर्ख बनवू शकत नाही. कारण भारत गेल्या चाळीस वर्षांपासून कट्टरतावादाच्या समस्येशी दोन हात करत आहे. मुंबई, काश्मीर, पंजाब, दिल्ली कुठेही असो.
 
कुलभूषण यांनी कोणाला मारल्याचा कोणताही पुरावा पाकिस्तानने दिलेला नाही.
 
पाकिस्तानच्या आंतरराष्ट्रीय प्रतिमेवर परिणाम
आयसीजेसारख्या मोठ्या न्यायसंस्थेने पाकिस्तानला जितक बरं-वाईट बोलता येईल तितकं बोलून घेतलं आहे.
 
या न्यायालयाचा आजवरचा इतिहास पाहिला तर याआधी इतक्या कडक शब्दांमध्ये त्यांनी कोणत्याच देशावर टीका केलेली दिसत नाही.
 
यामुळे पाकिस्तानच्या आंतरराष्ट्रीय प्रतिमेवर नक्कीच परिणाम होईल. ब्रिटनचे एक माजी पंतप्रधान तर म्हणाले होते, "जगातील 70 टक्के दहशतवादी घटनांचे संबंध पाकिस्तानशी जुळल्याचे दिसून येईल. म्हणजेच प्रत्येक देश पाकिस्तानमुळे त्रस्त आहे."
 
योग्य मार्गाने चालण्यास पाकिस्तान नेहमीच नकार देतो या तक्रारीला आता एक कायदेशीर स्वरुप आलं आहे.
 
निर्णयातल्या महत्त्वाच्या बाबी
या निकालाचा विचार केला तर व्हिएना करारानुसार पाकिस्तानला 'कौन्सुलर अक्सेस' देणं भाग आहे. म्हणजेच इस्लामाबादमधल्या भारतीय उच्चायुक्तामधील एका अधिकाऱ्याला कुलभूषण यांना भेटता येईल. तशा भेटीच्यावेळेस तेथे आयएसआय आणि पाकिस्तान लष्करामधील लोकांना उपस्थित राहाता येणार नाही.
 
ही भेट लवकरात लवकर करण्याचा त्यांना अधिकार आहे. त्यामुळे कुलभूषण यांना, कोठडीत काही त्रास देण्यात आला का, त्यांना कोठे पकडण्यात आलं, पाकिस्तान करत असलेला प्रचार खरा आहे की ते सगळं खोटं आहे याबाबत विचारता येईल.
 
सर्व खटला पुन्हा नव्याने झाला पाहिजे असंही न्यायालयानं सांगितलं आहे. म्हणजेच आधीच्या खटल्यावर विचार होऊन त्याचं परीक्षण झालं पाहिजे.
 
याचा अर्थ हा खटला आता सिव्हिल कोर्टात चालवला जावा. तिथं त्यांना कायदेशीर मदत मिळेल. म्हणजेच त्यांना वकील मिळणं सोपं होईल आणि न्यायाधीशांसमोर आपली बाजू मांडता येईल.
 
यामुळे कूलभूषण भारतात परतण्याची आशा निर्माण झाली आहे?
 
पाकिस्तानच्या जागी दुसरा देश असता तर पहिल्या विमानाने कुलभूषण यांना परत पाठवलं असतं. पण पाकिस्ताननं ज्या पद्धतीनं कुलभूषण यांची आई आणि पत्नीला वागणूक दिली तशी मी गेल्या 45 वर्षांच्या माझ्या मुत्सद्दी कारकिर्दीत पाहिली नाही.
 
पाकिस्तान नीट वागेल का हे आता येणारा काळच सांगेल.