रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: शुक्रवार, 11 सप्टेंबर 2020 (15:08 IST)

प्लाझ्मा थेरपी : कोव्हिड-19 आजारावर फायदेशीर नाही?

मयांक भागवत
कोव्हिड-19 विरोधात कुठलीही लस किंवा ठोस औषध उपलब्ध नाही. अशा परिस्थितीत गंभीर रुग्णांवर उपचारांसाठी "प्लाझ्मा थेरपी' कडे एक आशेचा किरण म्हणून पाहिलं जाऊ लागलं. पण, खरचं "प्लाझ्मा थेरपी' च्या मदतीने कोव्हिड-19 ग्रस्त रुग्णांचे मृत्यू कमी होण्यास मदत होते? मध्यम संसर्ग झालेल्या रुग्णाला प्लाझ्मा दिल्याने आजार गंभीर स्वरूपापर्यंत पोहोचत नाही?
 
या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्चने (ICMR) "प्लाझ्मा थेरपी" कोव्हिड-19 विरोधात प्रभावी आहे का नाही याची 'PLACID' ट्रायल केली. पण, ICMR च्या संशोधनात समोर आलं की प्लाझ्मा थेरपी कोव्हिड-19 मुळे होणारे मृत्यू कमी करण्यासाठी फायदेशीर ठरत नाही.
 
'प्लाझ्मा थेरपीचा' फायदा नाही?
इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या (ICMR) माहितीनुसार,
 
'प्लाझ्मा थेरपी' च्या वापरामुळे रुग्णांचा मृत्यू होण्याची संख्या कमी होत नाही किंवा मध्यम प्रमाणात संसर्ग असलेल्या व्यक्तीचा आजार गंभीर स्वरूपापर्यंत पोहोण्यापासून रोखण्यासाठी मदत झाली नाही.
 
प्लाझ्मा थेरपी : कोरोना व्हायरसवरचा हा उपचार कसा केला जातो? | #सोपीगोष्ट 110
 
'PLACID' ट्रायलचे परिणाम दर्शवतात की, प्लाझ्मा आणि सामान्य उपचारांच्या मदतीने 28 दिवसानंतर मृत्यूंची संख्या आणि आजाराचा संसर्ग गंभीर स्वरूपापर्यंत पोहोचण्यात काहीही फरक दिसून आला नाही
 
ICMR च्या ट्रायलचे परिणाम?
इंटरव्हेन्शन आर्ममध्ये 235 तर, कंट्रोल आर्ममध्ये 229 लोकांचा सहभाग घेतला. त्यापैकी इंटरव्हेन्शन आर्ममध्ये 34 लोकांचा (13.6 टक्के) मृत्यू झाला तर कंट्रोल आर्ममध्ये 31 जणांचा (14.6 टक्के) मृत्यू झाला. याबाबतची माहिती 'MedRXiv' या प्री-प्रिंट जर्नलमध्ये छापण्यात आलीय. या संशोधनाचा पीअर (peer review) रिव्ह्यू मात्र करण्यात आलेला नाही.
 
संशोधकांच्या माहितीनुसार, इंटरव्हेन्शन आर्म म्हणजे ज्यात रुग्णाला प्लाझ्मा थेरपीसोबत कोव्हिड-19 मध्ये देण्यात येणारे सामान्य उपचार देण्यात आले. तर कंट्रोल आर्म म्हणजे रुग्णाला प्लाझ्मा थेरपी न देता फक्त सामान्य उपचार देण्यात आले
 
या दोन्हीची तुलना केल्यानंतर प्लाझ्मा थेरपी देऊनही मृत्यू कमी झाले नाहीत असं समोर आलं आहे.
 
'प्लाझ्मा थेरपी'च्या ट्रायलची माहिती
 
देशातील 39 रुग्णालयात ही ट्रायल करण्यात आली. 29 सरकारी वैद्यकीय महाविद्यालयं आणि 10 खासगी रुग्णालयांचा त्यामध्ये सहभाग होता. देशातील 25 शहरात ही ट्रायल पार पडली. त्यात प्लाझ्मा थेरपीच्या ट्रायलसाठी 464 रुग्णांची नोंद करण्यात आली होती. 22 एप्रिल ते 14 जुलै दरम्यान ही तपासणी घेण्यात आली.
 
महाराष्ट्र सराकरचं प्रोजेक्ट प्लॅटिना
राज्य सरकारने प्लाझ्मा थेरपीबाबत अभ्यासाठी जून महिन्यात 'प्रोजेक्ट प्लॅटिना' सुरू केलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी वैद्यकीय शिक्षण विभागाच्या या प्रोजेक्टचं उद्घाटन केलं होतं.
 
यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 16.65 कोटी रूपये मंजूर करण्यात आले. जगातील सर्वांत मोठं प्लाझ्मा थेरपी ट्रायल आणि उपचार पद्धती म्हणून हे प्रोजेक्ट सुरू करण्यात आलं होतं.
 
प्लाझ्मा थेरपी कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी किती प्रभावी?
 
प्रोजेक्ट प्लॅटिनाच्या उद्धाटनेवेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले होते, "प्लाझ्मा दाते जीवनदान देणारे आहेत. गंभीर रुग्णांवर उपचार म्हणून प्लाझ्मा थेरपीचा वापर पहिल्यांदाच करण्यात येत आहे. आम्हाला अभिमान आहे की जगातील सर्वांत मोठी सुविधा आपण पहिल्यांदा आपल्या राज्यात सुरू करत आहोत."
 
प्लॅटिना ट्रायलमध्ये, राज्यातील 17 वैद्यकीय महाविद्यालयं आणि मुंबईतील पालिकेच्या चार वैद्यकीय महाविद्यालयांचा सहभाग आहे.
 
कोव्हिड-19 चा गंभीर स्वरूपाचा संसर्ग झालेल्या रुग्णांचा जीव वाचवणं हे या प्रोजेक्टचं प्रमुख उद्दिष्ट होतं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीही महाराष्टाला उद्देशून केलेल्या भाषणात अनेकवेळा प्लाझ्मा दान करण्यावर भर दिला आहे.
 
यावर बोलताना आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, "प्लाझ्मा थेरपीचा प्रयोग महाराष्ट्रात सुरू आहे. त्यामध्ये यशही मिळत आहे. साधारणपणे 10 पैकी 9 केसमध्ये प्लाझ्मा दिल्यानंतर रुग्ण लवकर बरे झाले असा त्यातील अनुभव आहे."
 
राज्यातील प्लॅटिना ट्रायलबाबत बोलताना वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचलनालयाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने म्हणाले, "ICMR कडून एक ट्रायल करण्यात आली होती. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातही प्लाझ्मा थेरपीबाबत प्लॅटिना ट्रायल सुरू आहे. राज्यातील ट्रायल डिसेंबरपर्यंत चालू राहील. यामध्ये 5000 रुग्णांना प्लाझ्मा देण्याचं आमचं लक्ष्य आहे."
 
ICMR च्या संशोधनाबाबत तज्ज्ञांचं मत
ICMR च्या संशोधनाबाबत बीबीसीशी बोलताना महाराष्ट्र सरकारने स्थापन केलेल्या टास्कफोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी म्हणाले, "ICMR च्या संशोधनाचे परिणाम निराशानजनक आहेत. हे ट्रायल पहिल्या टप्प्यात करण्यात आलं पाहिजे होतं असं माझं मत आहे. प्लाझ्मा व्हायरसला न्यूट्रलाइज करतो. त्यामुळे कोव्हिड-19 चा संसर्ग झाल्यानंतर पहिल्या नऊ दिवसात प्लाझ्मा फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे. पण, संसर्ग वाढला की याचा फायदा होणार नाही."
 
"राज्यातही प्लाझ्मावर प्लॅटिना ट्रायल सुरू आहे. त्याचे परिणाम समोर येणं अजून बाकी आहे. त्यामुळे प्लॅटिना ट्रायलच्या परिणामानंतर आपल्याला प्लाझ्माबाबत काही डेटा उपलब्ध होवू शकेल," असं डॉ. जोशी पुढे म्हणाले.
 
नायर रुग्णालय प्लाझ्या थेरपी ट्रायल
मुंबई महापालिकेच्या नायर रुग्णालयात आत्तापर्यंत कोव्हिड-19 मुक्त झालेल्या 229 रुग्णांनी प्लाझ्मा दान केलं आहे. तर रुग्णालयात उपचार घेत असलेल्या 42 रुग्णांवर प्लाझ्मा थेरपी आणि सामान्य उपचार पद्धतीने उपचार देण्यात आले. या रुग्णांचा समावेश ICMR च्या ट्रायलमध्ये करण्यात आला होता.
 
याबाबत बीबीसीशी बोलताना नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल म्हणाले, "प्लाझ्मा थेरपीचा फायदा कोरोना व्हायरसचा अत्यंत सोम्य संसर्ग असलेल्या रुग्णाचा आजार वाढण्यापासून रोखण्यासाठी होण्याची शक्यता आहे.
 
"मात्र रुग्णाचा आजार मध्यम स्वरूपाचा असेल, तो गंभीर होण्यापासून बचावासाठी फायदा होण्याची शक्यता फार कमी आहे. सोम्य संसर्ग झालेल्या रुग्णाच्या शरीरात व्हायरस वाढत असतानाच व्हायरसपासून लढण्यासाठी रेडिमेड अॅन्टीबॉडीज मिळतात. ज्याचा रुग्णाला फायदा होण्याची शक्यता असते."
 
"मात्र, रुग्णाचा आजार मध्यम स्वरूपाचा झाल्यास फुफ्फुसं, किडनी, हृदय यांवर परिणाम झालेला असतो. त्यावेळी प्लाझ्मा थेरपीचा फायदा होण्याची शक्यता कमी आहे. प्लाझ्मा थेरपीसोबत रुग्णांवर सामान्य उपचार पद्धतीनेही उपचार औषधोपचार सुरू असतात. त्यामुळे प्लाझ्मा थेरपीचा फायदा होतोच असं ठोस सांगता येणार नाही," असं डॉ. भारमल पुढे म्हणाले.
 
दिल्लीत प्लाझ्मा थेरपी सुरू ठेवणार
इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या संशोधनानंतरही दिल्लीत प्लाझ्मा थेरपी सुरू ठेवणार असल्याचं दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी स्पष्ट केलं आहे.
 
दिल्लीत पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, "दिल्लीत प्लाझ्मा थेरपी सुरू ठेवण्यात येणार आहे. प्लाझ्मा थेरपीचा फायदा कोरोना संसर्गाच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात असणाऱ्यांना होतोय. पण, तिसऱ्या टप्प्यात किंवा व्हेन्टिलेटरवर असलेल्या रुग्णांना याचा फायदा होत नाही."
 
सत्येंद्र जैन यांच्यावर कोरोनाबाधित असताना प्लाझ्मा थेरपीने उपचार करण्यात आले होते. "मला प्लाझ्मा थेरपीचा फायदा झाला," असं जैन पत्रकारांशी बोलताना पुढे म्हणाले.
 
प्लाझ्मा थेरपी काय असते?
मानवी शरीर व्हायरसविरोधात रोग प्रतिकारक शक्ती निर्माण करतं. म्हणजेच अँटिबॉडी तयार करतं. अँटिबॉडी म्हणजे कोव्हिड-19 विरोधात शरीरात लढाईसाठी तयार झालेले सैनिक. कोव्हिड-19 मुक्त झालेल्या व्यक्तीच्या शरीरात कोरोना व्हायरसविरोधात अॅंटिबॉडीज् (रोग प्रतिकार शक्ती) तयार झालेल्या असतात.
 
या अॅंटिबॉडीज रक्तातील प्लाझ्मामध्ये असतात. त्या काढून कोव्हिड-19 चा संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या शरीरात सोडल्या जातात.
 
जेणेकरून त्या रुग्णाचं शरीर कोरोना व्हायरसचा चांगल्या पद्धतीने मुकाबला करू शकेल.