पुण्यात पहिली प्लाझ्मा थेरेपी यशस्वी
पुण्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असून येथे करोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाउनची कडक अंमलबजावणी केली जात आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी ससून रुग्णालयात एका करोनाग्रस्त रुग्णावर प्लाझ्मा थेरेपीद्वारे उपचार करण्यात आले होते. ही व्यक्ती या उपचारानंतर बरी झाली असल्याची माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.
मोहोळ यांनी रुग्णालयाच्या डॉक्टर्स आणि टीमचे अभिनंदन केलं आहे. दरम्यान, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीदेखील याबाबत माहिती दिली असून त्यांनी सर्वांचं अभिनंदन केलं आहे. ससून रुग्णालयात प्लाझ्मा थेरपीचा उपचार करण्यास भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं परवानगी दिली होती.
प्लाझ्मा थेरपीमुळे उच्च रक्तदाब आणि अतिस्थूलपणा असलेली कोरोनाबाधित व्यक्ती ठणठणीत बरी झाली आहे. १० आणि ११ मे या दिवशी थेरपी केलेल्या रुग्णाला आता कोविड वॉर्डमधून हलवण्यात आले आहे. ससूनच्या सर्व डॉक्टर्स आणि टीमचे अभिनंदन ! अशा आशयाचं ट्विट मोहोळ यांनी केलं आहे.