शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: मंगळवार, 19 जानेवारी 2021 (18:49 IST)

86 व्या वर्षी ग्रामपंचायत निवडणूक जिंकणाऱ्या आजींना तुम्ही भेटलात का?

  • मयांक भागवत
  • बीबीसी मराठीसाठी
पंढरपूर तालुक्यातील देवडे गावात 86 वर्षाच्या आजींनी ग्रामपंचायत निवडणूक जिंकली आहे. कलावती शिंदेंनी या वयातही निवडणुकीच्या रिंगणात विरोधकांना चांगलीच धोबीपछाड दिली.
 
ग्रामपंचायत निवडणुकीत 253 मतांनी विजय मिळून कलावती शिंदे, ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आल्या.
 
कलावती शिंदे यंदाच्या निवडणुकीत राज्यातील निवडून आलेल्या बहुदा सर्वात जास्त वयाच्या ग्रामपंचायत सदस्य आहेत.
 
विजयानंतर काय म्हणतात कलावती शिंदे
 
बीबीसीशी बोलताना त्या म्हणतात, "या गावात माझी हयात गेली. मला गावाचा विकास करायचा आहे. गावात अनेक समस्या आहेत. त्या सोडवण्यासाठी मी प्रयत्न करणार."
 
ग्रामपंचायत निवडणुकीत पहिल्यांदाच रिंगणात असलेलया कलावती शिंदे, जय हनुमान पॅनलकडून निवडणूक लढल्या आणि विजयी झाल्या.
 
ज्या वयात ज्येष्ठ नागरीकांची इच्छा शांततेत जीवन जगण्याची असते. त्या वयात कलावती शिंदे गावाच्या विकासाचं ध्येय उरी बाळगून निवडणुकीच्या मैदानात उतरल्या.
 
कलावती आजी पुढे सांगतात, "गावात चांगले रस्ते नाहीत. मुलांच्या शाळेचा प्रश्न आहे. वीज आणि पाण्याचे प्रश्न आ-वासून पुढे उभे आहेत. या समस्या सोडवण्यासाठी मला काम करायचं आहे."
 
पण, या वयात प्रचार कसा केला? मतदारांपर्यंत कशा पोहोचलात? यावर बोलताना कलावती म्हणतात, 'वयाचं काय, मनात जिद्द असली पाहिजे. मी घरोघरी जाऊन प्रचार केला. लोकांमध्ये जाऊन गावाच्या विकासाबाबत चर्चा केली.'
 
'निवडणूक लढवण्याची इच्छा होती'

आजी पुढे सांगतात, "मला काही वर्षांपासून निवडणूक लढवण्याची इच्छा होती. पण, माझं नाव मागे पडायचं. यंदा मी निवडणूक लढवण्याचा निर्धार केला होता."
 
'गावाच्या विकासात आपला हातभार लागला पाहिजे.' असं कलावती आजी सांगतात.
 
कलावती शिंदे यांचे पुतणे भास्कर शिंदे बीबीसीशी बोलताना म्हणतात, "वयोमानानुसार थकवा तर येणारच. आजींनाही थकवा जाणवतोय. पण, त्यांची काम करण्याची खूप इच्छा आहे. त्यामुळे त्यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला."